
>> रविप्रकाश कुलकर्णी
चांगल्या नेत्याचे लक्षण काय असते? तो आपल्याबरोबर येणाऱयाचे मनोधैर्य टिकेल असे वागत, बोलत असतो. शेवटी आशावाद टिकवणे हे महत्त्वाचे असते.
आओ फिर से दिया जलाये
भरी दुपहरीमें अंधियारा, सुरज परछाई से हारा
अंतरमयका नह निछोडे,
बुझी हुई बाती सुलगाए
हा आशावाद जागवला आहे अटलबिहारी वाजपेयी यांनी आणि ते जातिवंत कवी असल्यामुळे त्यांनी तो काव्यरूपात मांडला आहे, जो सार्वकालिक आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ही आठवण मी जागवत आहे. या कवीचा विशेष म्हणजे त्यांनी हे आपण वेगळे काही सांगतोय असा आविर्भाव ठेवला नाही, तर उलट त्यांनी म्हटले की, मी तुमच्यातलाच एक आहे.
त्यांच्या मूर्तिमंत आशावादाचा एक साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आहे. जनता पक्षाचे सरकार पत्त्याचा बंगला कोसळावा तसे कोसळले. इंदिरा गांधी यांनी विरोधकांचा धुव्वा उडवला, होत्याचे नव्हते झाले. भल्याभल्यांचे मनोधैर्य खचले होते. लोकांसाठी सर्वस्वाचा त्याग करूनसुद्धा लोकांना त्याचे काही पडले नसेल तर यापुढे राजकारणात राहायचे तरी कशाला? अशा मनोवृत्ती दिसायला लागलेल्या होत्या. अशा पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर अटलबिहारी यांची जाहीर सभा ठरलेले होती. सकाळी एका कार्यकर्त्याकडे वाजपेयी उतरलेले होते. विषय अर्थात एकच, जनतेने केलेला दारुण पराभव! खुद्द वाजपेयीदेखील गप्प गप्प होते. त्यामुळे वातावरण अधिकच गंभीर आणि काळजी वाटण्यासारखे वाटत होते. संध्याकाळ झाली, वाजपेयी शिवाजी पार्क मैदानात उभारलेल्या स्टेजवर आले. एरवी वाजपेयी आलेत आणि टाळ्या पडल्या नाहीत असे कधी झाले नव्हते. ते त्या दिवशी घडले. वातावरण किती तंग झाले होते त्याचीच ती खूण होती. वाजपेयींनाही हे जाणवले असावे. ते त्यांच्या पेटंट स्टाईलमध्ये माइकपुढे उभे राहिले. आता ते काय बोलतात याकडे साऱया श्रोत्यांचे लक्ष लागले होते.
“हम चुनाव जरूर हारे है…” सुरुवात एकून काही जणांच्या हृदयाचा ठोका चुकला, पण लगेच वाजपेयी यांचे पुढचे वाक्य होते, “हम चुनाव जरूर हारे है, लेकिन हिम्मत नही हारे है!” या एका वाक्याने लोकांच्या मनावरचे मळभ दूर झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला. वातावरणात चैतन्याचा संचार झाला. अर्थात त्यानंतर वाजपेयींनी सभा जिंकली हे सांगायला नकोच. नेतृत्व काय असते, आपल्या सहकाऱयांचे मनोधैर्य कसे टिकवायचे याचा हा मूर्तिमंत वस्तुपाठ होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या उत्कृष्ट व्याख्यानांपैकी ते एक होते. त्यांनी स्थापन केलेले सरकार औट घटकेचे म्हणजे तेरा दिवसांत कोसळले होते. त्यांनी केलेले भाषण अविस्मरणीय झाले होते.
अटलबिहारी यांचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांची विनोद बुद्धी! लोकप्रिय माणसाने लग्न केले नाही की, तो चर्चेचा विषय असतो. अटलजींच्या बाबतीत हे नेहमीच व्हायचे. कधी हसून तर कधी मूक राहून ते या प्रश्नाला बगल देत. एकदा एका महिला पत्रकाराने त्यांना हाच प्रश्न विचारला. तेव्हा वाजपेयी म्हणाले, “करायचं होतं, पण मी एका आदर्श स्त्राrच्या शोधात होतो.” तेव्हा ती पत्रकार म्हणाली,“मग अशी स्त्राr कोणी मिळाली नाही का?”, “मिळाली ना!” वाजपेयी म्हणाले. “मग अडलं कुठे?” पत्रकाराने विचारले. “ती मुलगीसुद्धा आदर्श पुरुषाच्या शोधात होती. तो क्या करे?” तर वाजपेयी असे होते.
असाच दुसरा एक प्रसंग. दिलीप कुमारचे लग्न सायराबानूशी ठरल्याची बातमी तेव्हा आकाशवाणीवरून सांगितली गेली. अटलबिहारी यांनी “हे असे कसे झाले?” हा प्रश्न संसदेत विचारला. एकच गहजब झाला. यावर तेव्हाचे नभोवाणी मंत्री राज बहादूर समयसूचकतेने म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी यांनी जर लग्न केले तर ती बातमीसुद्धा रेडिओवरून सांगितली जाईल.” अर्थात राज बहादूर यांच्या समयसूचक उत्तराला अख्ख्या सभागृहाने हसून दाद दिली. अर्थात त्यात अटलबिहारी वाजपेयीदेखील सामील होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने या जरा वेगळ्या आठवणी मुद्दाम सांगितल्या.































































