साहित्यजगत – गवाणकरांची धमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये लेखन करणाऱया लेखकांच्या हितासाठी कार्यरत असणारी संस्था म्हणजे ‘मानाचि’ लेखक संघटना! या संस्थेचा आठवा वर्धापन दिन संपन्न झाला. त्यावेळी अनेक लेखकांचा सन्मान करण्यात आला. त्यामधला गंगाराम गवाणकर यांना लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार हा विशेष होता. विशेष याअर्थी की त्या वेळी गवाणकरांची मुलाखत विवेक आपटे यांनी घेतली. आता गवाणकर म्हटलं की गजाली रंगवण्यात त्यांचा हात धरणं मुश्किल इतकी धमाल ते उडवतात. त्यात पुन्हा ‘वस्त्रहरण’ नाटकाचा विषय निघाला की ते सुसाट सुटतात. किती सांगू आणि किती नको असं त्यांना होऊन जातं. एका मुलाखतीत हे सगळं आवरणं अशक्यच. त्यात वेळेचं नियोजन नव्हतं. त्यामुळे गवाणकरांची मुलाखत आवरती घ्यावी लागली.

पण गवाणकरांच्या बाबतीत सगळं काही सरळसोट झालं असं कधीच घडलेलं नाही. अगदी ‘वस्त्रहरण’च्या पहिल्या खेळापासून हे घडत आलंय. पहिल्या खेळाला मुख्य नटच आला नाही तेव्हा गवाणकर यांनाच तो रोल करायला लागला. दुसऱया खेळापासून हिरो आला. 60 प्रयोग झाले, पण सगळे तोटय़ात. शेवटी शेवटचा प्रयोग पुण्यात करून थांबायचं ठरलं. त्या खेळाला पु. ल. देशपांडे आले होते. पुलंनी भरभरून दाद दिली आणि नाटकाचं भाग्य बदललं. ‘वस्त्रहरण’ भरभरून चालू नव्हे, पळू लागलं. जणू काही गंगाराम गव्हाणकर एका रात्रीत स्टार नाटककार झाले. एकेकाळी या नाटकाची ‘कसला मालवणी रोंबाट’ म्हणून हेटाळणी झाली. त्याच नाटकाने गवाणकर ‘वस्त्रहरण’कार म्हणून ओळखले जाऊ लागले. ही सगळी कहाणी गवाणकरांनी लिहावी यासाठी त्यांच्या मागे कोण लागलं असेल? -जतीन रांगणेकर!

त्यांची एक प्रकाशन संस्था होती. हरि नारायण आपटे सहकार्याधारित प्रकाशन संस्था. खरं तर रांगणेकरांचा आणि ह. ना. आपटे यांचा तसा काहीही संबंध नव्हता. पण एका मोठय़ा लेखकाचं ऋण मानण्याचा तो एक वेगळाच प्रकार होता. दुर्मिळच गोष्ट होती ती. गंगाराम गवाणकरांनी आपल्या आयुष्याचा प्रवास लिहायला सुरुवात केली. त्याला त्यांनी नाव दिलं, ‘व्हाया वस्त्रहरण!’

दुर्दैवाने जतीन रांगणेकरांवर काही अरिष्ट आलं आणि त्यांना प्रकाशनाचा व्याप आवरता घ्यावा लागला. गवाणकर मग लिहायचे थांबले ते थांबले. एक दिवस त्यांची गाठभेट त्यावेळी ‘सकाळ’मध्ये असलेल्या मंगेश विश्वासराव यांच्याशी झाली. त्यांनी गवाणकरांना संपादक अरुण टिकेकर यांच्याकडे नेलं. सध्या काय चाललंय असं त्यांनी गवाणकरांना विचारलं तेव्हा ‘व्हाया वस्त्रहरण’चा विषय निघाला. टिकेकर म्हणाले, “थांबता कशाला, आमच्याकडे लिहायला सुरुवात करा.” अशा रीतीने गवाणकरांनी ‘व्हाया वस्त्रहरण’ पूर्ण केलं.

याचं पुस्तक व्हावं म्हणून नाटकातले नारायण जाधव यांनी हे हस्तलिखित त्यांचा मित्र प्रकाशक नितीन हिरवेकडे दिलं. पण व्यवहार जमला नाही. मग हे पिप्ट डिंपल प्रकाशनाच्या अशोक मुळे यांच्याकडे आलं. त्यांनी मोठय़ा हौसेने ‘व्हाया वस्त्रहरण’ छापायला घेतलं. छपाई पूर्ण झाली. पुस्तक तयार झालं. त्यावेळी मी डिंपल प्रकाशनच्या गिरगावातील ऑफिसात होतो. ही गोष्ट गवाणकरांना कळविण्यात आली. ते खुश झाले. त्यांच्या आवाजात खुशी होती. लगेच ते म्हणाले, तुम्ही तेथेच थांबा. मी हा आलोच. खरं तर रात्र झाली होती. गवाणकर ऑफिसात आले. त्यांचा चेहरा उजळलेला होता. नाटक वेगळं आणि पुस्तक वेगळं हे खरंच झालं होतं. त्यांची खुशी त्यांना लपवता नाही आली. त्या रात्री आम्ही आनंदोत्सव साजरा केला. अर्थात मग ‘व्हाया वस्त्रहरण’चा जंगी प्रकाशन समारंभ झाला. याच्या जोडीलाच गंगाराम गवाणकर ‘व्हाया वस्त्रहरण’चा एकपात्री प्रयोग करू लागले. मालवणी रंगाचा आणि ढंगाचा हा कार्पाम तुफान गाजू लागला. त्यामुळे ‘व्हाया वस्त्रहरण’ पुस्तकाचा खप वाढू लागला. सध्या या पुस्तकाची पाचवी आवृत्ती निघाली आहे. त्यानंतर गवाणकर यांचे ‘ऐसपैस’ हे व्यक्तिचित्रांचं पुस्तक आलं. त्याचंही चांगलंच स्वागत झालं.

आता गवाणकरांनी सहस्र चंद्रदर्शनाचा टप्पा पार पाडला आहे. मुंबईची दगदग नको म्हणून ते त्यांच्या गावी माडबनला जाऊन राहिले आहेत. अर्थात तेथून ते मुंबईवर डोळा ठेवून आहेत… तरीदेखील अजून बरंच काही सांगण्याचं राहून गेलेलं आहे. ‘वस्त्रहरण’ नाटक चालू आहे, पण त्याचं पुस्तक का मिळत नाही? अशा कितीतरी गजाली गवाणकरांच्या पोतडीत अजून शिल्लक आहेत. शिवाय डिंपलचे मुळे बंधू त्यांना थोडीच स्वस्थ बसू देणार आहेत?

त्यामुळेच ताजी बातमी अशी आहे की, गंगाराम गवाणकरांचे ताजे फडफडीत माशासारखे पुस्तक येत आहे. त्याचं नाव आहे ‘गांजले ते गाजले!’

गवाणकरांचा हाही खेळ गाजणार हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही.