श्रद्धेचा अतिरेक टाळा

>> शिरीष कणेकर

‘शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेऊन परतणाऱ्या मीरा रोड येथील ‘हब टाऊन’ या गृहसंकुलातील पाचजण अपघातात मृत्युमुखी पडले. पेपरातील बातमी.

या अशा बातम्या वारंवार वाचनात येतात. केवळ साईबाबाच नव्हेत तर देशभरातील विविध देवस्थानांना भेट देणाऱ्या भक्तांच्या वाट्याला भीषण अपमृत्यू येतो. मी देव-देव करणाऱ्यातला नसल्यामुळे मला हे कळूच शकत नाही. देव किंवा बाबा किंवा बुवा तुमचं दुष्ट शक्तींपासून रक्षण करतात अशी तुमची ठाम धारणा असते. देवाला याचं स्मरण द्यायला, त्यानं शब्दाविना दिलेला आयुर्विमा ‘रिन्यू’ करायला माणसं देवाच्या दारी जातात. तिथून निश्चिंत मनानं परतीच्या प्रवासाला निघतात. वाटेत दबा धरून बसलेला मृत्यू त्यांच्यावर झडप घालतो. सगळा खेळच संपतो.

नुसतेच फिरून येणारे व देवदर्शनाने पावन होऊन येणारे यांच्यात मृत्यू काहीच भेदाभेद करीत नाही. सारख्याच निर्विकारपणे तो दोघांवरही घाला घालतो. लग्नानंतर कुलदेवतेच्या दर्शनाला मोठ्या उमेदीनं गेलेलं नूतन परिणित जोडपंदेखील प्राणाला मुकल्याचे दुर्धर किस्से वाचायला मिळतात. मग देवच आपल्याला तारतो, आपत्तीपासून वाचवतो, गंडांतर टाळतो, मुलाबाळांचं रक्षण करतो व एकूणच आयुष्य निर्वेध करतो यावर एवढी ठाम, अविचल निष्ठा कशाच्या बळावर असते? प्रतिदिन या निष्ठेच्या ठिकऱ्या उडविणाऱ्या दुर्घटना गावोगावी घडत असताना माणसं पूजा-अर्चा, भक्तिमार्ग, उपासतापास, पोथ्यापुराणं, अंगठय़ा-ताईत, अंगारे-धुपारे हे सोपस्कार का करतात?

तुम्ही त्यांना ‘सामने से’ विचारा. चेहऱ्यावर बापुडवाणे भाव आणून ते म्हणतील – ‘आम्ही साधीसुधी देवभोळी माणसं, आम्हाला तुमचं ते बुद्धिनिष्ठ, तर्कशुद्ध, काटेरी विश्लेषण झेपत नाही.’

‘देव-देव न करणारी माणसं साधीसुधी असू शकत नाहीत का?’ असं तुम्ही विचारून पहा, ते पुन्हा तीच बचावाची ढाल पुढे करतील व वादातून अंग काढून घेतील. काहीजण तर इतक्या टोकाला पोहोचलेले असतात की विरोधी भूमिका नुसती ऐकली तरी ती त्यांच्या (अंध)श्रद्धेशी प्रतारणा ठरते व त्याचा त्यांच्यावर कोप होऊ शकतो, अशी त्यांची अतिरेकी भावना असते. मी एक दृश्य पाहिलंय. एकजण ‘अंगात येणं’ या गोष्टीवर तोंडसुख घेत होता. घरातील बाई कावरीबावरी होऊन म्हणाली, ‘हे असलं काही आमच्या घरात बोलू नका. आम्हाला पाप लागेल. आम्हाला भोगावं लागेल.’

बोलणारा आणि मी दोघंही अवाक् झालो. देवभोळेपणाला अडाणीपणाची जोड मिळाली की वर्तुळ पूर्ण होतं. एकदा एखाद्या गोष्टीवर श्रद्धा बसली की वादाचा प्रश्नच निर्माण होत नाही. काही माणसं बाबांना आणि बुवांना घरात आणून ठेवतात, कारण त्यांच्या अमर्याद शक्तीवर त्यांची श्रद्धा बसलेली असते. जिथे श्रद्धा, तिथे समर्पण!

बहुसंख्य माणसं कमकुवत मनाची असल्यामुळे भवसागर तरून जाण्यासाठी त्यांना देव, बाबा, बुवा यांच्या कुबडय़ा लागतात. आल्या प्रसंगाला आपणच तोंड द्यायचं असतं ही भूमिका या भित्र्या माणसांना मानवणारी नसते. उदी लावून पोथी उघडून बसलं की त्यांच्या जिवात जीव येतो. प्रत्यक्षात काही होवो, पण त्यांचा तेवढा वेळ तरी आशेवर जातो. घरातलं कोणी खूप आजारी असेल तर डॉक्टराला बोलवायच्या आधी त्याच्या उशीखाली अंगारा ठेवणं, त्याच्या कपाळावर उदी लावणं, त्याच्या बेडवर पोथी ठेवणं, त्याच्या बिछान्याची ठरावीक दिशा ठेवणं, घरात मंत्रजागर व स्तोत्रपठण करणं या जालीम दैवी उपचारांपुढे डॉक्टरी उपचार किस झाड की पत्ती? शेवटी तो डॉक्टरही तुमच्या आमच्यासारखा मर्त्य मानवच नाही का?

श्रद्धा असणे यात काही गैर नसेलही, पण तिचा अतिरेक भोवतो. बघता बघता ती फोफावते व श्रद्धेच्या आहारी गेलेल्या माणसालाच अजगरासारखी गिळून टाकते. आजूबाजूच्या (अश्रद्ध) माणसांना भरपूर उपद्रव होतो. पुढे पुढे मी श्रद्धा सांभाळण्यासाठीच तो जगतोय असं वाटायला लागतं. अनेक केसेसमध्ये तो नोकरीत असतो, संसार करीत असतो. त्यात भर या खचाखच भरलेल्या श्रद्धा. त्याची ससेहोलपट होते. एवढय़ा साऱ्या गोष्टी करण्यासाठी तो जन्माला आलेला नसतो. वर म्हणणारे म्हणतात, देवाचंच करतोय ना? दारू पिऊन पडत तर नाही ना? त्यांच्या लेखी तासन्तास देवापुढे बसणे याला एकमेव पर्याय म्हणजे दारू पिऊन पडणे.

सुदैवाने माझ्यावर हे संस्कार झाले नाहीत (देवाची कृपा). एकदा सकाळी उठल्यावर व एकदा रात्री झोपताना मी माझ्या आईवडिलांच्या फोटोला मनोभावे नमस्कार करतो आणि मनातल्या मनात कुजबुजत्या आवाजात विचारतो, ‘आहे ना माझ्याकडे लक्ष?’ ते फोटोतून गालातल्या गालात हसतात. मला एवढे पुरेसं आहे. त्यानंतर दिवसभर दहा देवळांच्या उंबऱ्यांवर माथा टेकण्याची मला गरज भासत नाही. माझ्या आईवडिलांपेक्षा ते मोठे आहेत?

माझ्या दीर्घ आयुष्यात मी एकही उपास केल्याचं मला स्मरत नाही. उपासाच्या दिवशी खातो शाकाहारीच, पण खातो महाशिवरात्रीलादेखील. ही असली पापं मी बुटानं ठोकरतो. माझे वडील म्हणायचे, ‘घरात सगळ्यांचाचा उपास असेल तर आपणही उपास करायचा. घरात कोणी जेवणार असेल तर आपणही मस्त जेवायचं. सिंपल. कसं बोललात अण्णा!

मी ढोपराएवढा होतो. तीन वर्षांचा असेन. तेव्हा अण्णा दर शनिवारी संध्याकाळी आठवणीनं मला भिकारदास मारुतीला घेऊन जायचे. सोबत भोकाच्या पैशांची विणलेली माळ असायची. एकेका भिकाऱ्याच्या कटोरीत मी वाकून वाकून एकेक पैसा टाकायचो. पाठीला रग लागायची. आज त्या आठवणीनंही खूप खूप बरं वाटतं. मग अण्णा म्हणायचे, ‘मिस्टर शिरीष, चला घरी. भिकारी संपले, पैसेही संपले.’ आम्ही सायकलवरून डबलसीट घरी जायचो आईकडे. थोडय़ाच दिवसांत आई घरातून व जगातून गेली. अण्णांनी भिकारदास मारुतीला जाणं सोडलं. नंतरही मी त्यांना कधी देवळात गेल्याचे पाहिले नाही. ते नाहीत म्हणून मीही नाही. आम्ही दोघांनी न ठरविता देवाशी कट्टी घेतली. मला त्याची गरज नव्हती, मला अण्णा होते. त्यांना कोण होतं कुणास ठाऊक. मी असू शकेन का? आय डाऊट. कोणाचा आधार बनू शकेन असा मी माणूसच नव्हतो. आजही नाही. स्वतःला आधार देता देता आयुष्य सरलं. आता मी ताठ मानेनं वर जाईन. अण्णांच्या पश्चातही मी गंडेदोरे बांधले नाहीत, कपाळाला शेंदूर फासला नाही, उरावर पोथ्या घेतल्या नाहीत, देवळाचे उंबरे झिजवले नाहीत, स्तोत्रपठण केलं नाही, पूजा घातल्या नाहीत. गोमूत्र सिंचन केले नाही, गायत्री मंत्राचा जयघोष केला नाही.

धुतल्या तांदळासारखं चारित्र्य घेऊन आयुष्यभर नाकासमोर चाललो हीच माझी देवपूजा, भक्ती आणि परमार्थ. बघा पटतंय का? पटलं तर म्हणेन की देव पावला!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या