
>> नीलेश कुलकर्णी
नोटाबंदीचा पोपट केव्हाचाच मरून पडला होता. काँगेस नेते आणि संसदेच्या अर्थविषयक संसदीय समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली यांनी या नोटाबंदीच्या मेलेल्या पोपटाच्या शेपटाला धरून त्याला पिंजऱ्याबाहेर काढले आहे. संसदेतील अहवाल ही संसदेची प्रापर्टी असते. तिला असे ‘सार्वजनिक पाय’ लावायचे नसतात. त्यामुळे मोईलींची कृती ही लोकशाहीविरोधी आहे. तिचे समर्थन मुळीच करता येणार नाही. मात्र जिथे सत्तापक्षच लोकशाहीला खुंटीला बांधून कारभार करतो आहे, तिथे गलितगात्र विरोधकांकडून कोणती अपेक्षा ठेवायची? नोटाबंदीमुळे देशातील शेतकरी देशाधडीला लागला हे ढळढळीत वास्तव मोईलींनी जगापुढे आणले आणि ‘नोटाबंदीचा पोपट मेला’ हे सांगण्याचे धारिष्टय़ दाखवले हेही नसे थोडके!
नोटाबंदीमुळे देशात अर्थक्रांती आली, मोदी हे क्रांतिदूतच आहेत असे ढोल वाजविणाऱ्या भक्तमंडळींचा ढोल केव्हाच फुटले आहेत. नोटाबंदीमुळे 2016 मध्ये राष्ट्रीय बीज महामंडळातील 1 लाख 36 हजार क्विंटल गव्हाचे बियाणे विक्रीला गेले नाही, शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आणि सगळे शेतीचक्रच बिघडून गेल्याचा कृषी मंत्रालयाचा अहवाल वीरप्पा मोईलींनी संसदेच्या समितीतील ब्रीफिंगमध्ये ऐकून घेतला आणि टिव्टरद्वारे सार्वजनिक करून एकच खळबळ उडवून दिली आहे. विशेषतः मध्य प्रदेशात भाजपला शेतकऱ्यांच्या रोषाचा मुकाबला करावा लागत असताना मतदानाच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या संतापात तेल ओतण्याचे काम मोईलींनी इमानेइतबारे केले आहे. त्याचा राजकीय फायदा काँग्रेसला कितपत होईल हा भाग अलाहिदा ! मात्र त्यामुळे मूळ प्रश्नापासून सत्तापक्षाला पळ काढता येणार नाही. नोटाबंदीमुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक युवकांच्या स्वप्नांचा ‘पकोडा’ झाला, लघुउद्योजक देशोधडीला लागले. बँकिंग व्यवहार ठप्प झाले, अर्थव्यवस्थेची तब्येत बिघडली. दहशतवाद आणि नक्षलवाद संपला नाही. एका अपरिपक्व निर्णयाने देशाला किमान वीस वर्षे मागे नेले. तरीही नोटाबंदीची चूक मान्य करायला सत्ताधारी तयार नाहीत. नोटाबंदीचा पोपट मेला आहे हे मोईली जाहीर करत असताना दिल्लीत दोन कुख्यात दहशतवादी घुसल्याची बातमी आली. थोडक्यात नोटाबंदीचा सर्जिकल स्ट्राईक दहशतवाद्यांवर किती परिणामकारक झाला हे दिसून येते. नोटाबंदी हा आततायीपणामुळे केलेला आपल्याच अर्थव्यवस्थेवरचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ होता. नोटाबंदीच्या मुद्दय़ाने मध्य प्रदेशात काँग्रेसला तारले तर आगामी लोकसभा निवडणुकीत नोटाबंदी हा प्रमुख मुद्दा ठरू शकतो. नोटाबंदीच्या निर्णयाचा भाजपवरच ‘सर्जिकल स्ट्राईक’ होण्याची वेळ आली आहे. त्यापूर्वी ‘मन की बात’मध्ये ‘‘होय, नोटाबंदीचा पोपट मेला आहे’’ हे जाहीर केले तर सत्तापक्षासाठी ते बरे राहील.
मध्य प्रदेशातला ‘चपलाहार’
जनतेला एकवेळ तुम्हाला बनवता येते. मात्र वारंवार तीच ट्रिक वापरली तर काय होते याचा प्रत्यय सध्या भाजप मध्य प्रदेशात घेत आहे. वास्तविक, शिवराजसिंग चौहान यांच्यासारखा सक्षम मुख्यमंत्री असतानाही चौथ्यांदा सत्तेत येताना भाजपची दमछाक होताना दिसत आहे. जनतेचा रोष शिवराज यांच्याविरोधात कमी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात अधिक असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मध्य प्रदेश धुमसत आहे तर ऍट्रॉसिटी कायद्याविरोधात सवर्णांनी भाजपविरोधात ‘धनुष्य’ उचलले आहे. त्यामुळे मजबूत केडर नसताना तसेच गटातटांमध्ये विभागलेला असतानाही काँग्रेसला फायदा होत असल्याचे चित्र आहे. भाजपसाठी केवळ आता मायावतीच ‘संकटतारिणी’ ठरल्या तर तो ‘बुडत्याला काडीचा आधार’ ठरू शकेल. भाजपविरोधातला जनरोष इतका भयंकर आहे की, महांकालेश्वराच्या पवित्र उज्जैनजवळ खेडावदा गावात भाजपचे उमेदवार दिलीपसिंग शेखावत यांना जनतेनेच चपलांचा हार घातला. जागोजागी भाजप उमेदवारांना रोषाचा मुकाबला करावा लागत आहे. शिवराजसिंग चौहान यांच्या पत्नी आणि चिरंजीवांनाही जनतेने हुसकावून लावले. इतकी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्या सभांकडे जनतेने साफ पाठ फिरवली आहे. ‘‘अरे भाईसाब, मोदीजी को सुनने के लिए कोई आने को तैयार नही है. दारू और पैसे दिये तो भी लोग मोदीजी की रॅली मे नही आ रहै है. मैं क्या कर सकता हूं?’’ हे टंडन नावाच्या एका उमेदवाराचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेशसिंगांसोबतच संभाषण सध्या ‘व्हायरल’ झाले आहे. त्यामुळे भाजपचा ‘पार्टी विथ डिफरन्स’चा चेहराही उघड पडला आहे. एकेकाळी स्वयंस्फूर्तीने आपल्या सभा ऐकायला येणारी मंडळी आता आपल्या भाषणांना का विटली याचा विचार पंतप्रधानांनी करावा इतकेच.
जयंत सिन्हांचा साधेपणा 
केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरात एक साधेपणाची लाट सुरुवातीच्या काही काळात आली होती. साधेपणाच्या खोकल्याच्या साथीला अरविंद केजरीवालांनी मफलर टाकत दिल्लीतून सुरुवात केली. नंतर मोदींनी त्यावर कडी वगैरे करून मंत्र्यांचे लाल दिवेच गुल करून टाकले. मोदी सरकारात एकतर मंत्र्यांना कोणतेही काम नाही. त्यातच दिवे काढून घेतल्यामुळे मंत्रीमहोदयांना अनेक सार्वजनिक ठिकाणी कोणी ओळखही देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मंत्र्यांवर अपमानास्पद प्रसंग गुदरल्याचेही अनुभव आहेत. सगळा कारभार ‘पीएमओ’ हाकत असल्याने आणि पक्षाध्यक्ष सांगतील ते करावे लागत असल्याने मोदींचे मंत्री आणि काही राज्यांचे मुख्यमंत्री अधूनमधून विनोदी विधाने करून जनतेचे मनोरंजन करत असतात. वेळच वेळ असल्याने मध्यंतरी त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव आणि केंद्रीय नभोवाणी मंत्री राजवर्धन राठोड यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात अर्धाएक तास पुशअप वगैरे केले. मात्र अशा थिल्लर प्रकारांना फाटा देत केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी साधेपणाचे एक उदाहरण दाखवून दिले आहे. एका खासगी विमानाने सिन्हा रांचीला जात होते. प्रवासापूर्वी त्यांनी ब्रेकफास्टसाठी आर्डर दिली. मात्र, प्रत्यक्षात त्यांना इडलीऐवजी वेगळाच पदार्थ खायची इच्छा झाली. ‘‘मला तो पदार्थ मिळेल काय?’’ अशी आदबशीर विचारणा हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री असलेल्या सिन्हांनी केल्यानंतरही खासगी कंपन्यांनी आपल्या माजुरड्या धोरणानुसार सिन्हा यांच्या पदाचा कोणताही सन्मान न ठेवता चक्क नकार दिला. ‘‘तुम्ही ऑर्डर साऊथ इंडियन पदार्थांची दिली आहे. ती बदलता येणार नाही. दुसरा पदार्थ हवा असेल तर पैसे मोजा’’, असे सांगितले गेले. सिन्हा यांनी जाकिटातून पैसे काढून आपल्या आवडत्या पदार्थावर ताव मारत रांची गाठली. सिन्हा यांच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशाने हा किस्सा सांगितल्यामुळे सिन्हा यांचा साधेपणा जगापुढे आला. मोदी सरकारातील मंत्री बेताल धरत असताना जयंत सिन्हा यांनी ‘व्हीआयपी कल्चर’ला मुरड घालत ‘नम्रतेचा ताल’ धरला हेही नसे थोडके!































































