मुद्दा – लोअर परळचा पूल गैरसोयीचाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकृष्ण हरचांदे

पूर्वी  असलेला मध्य व पश्चिम रेल्वेचा लोअर परळचा पूल रेल्वेमार्गावरील बाजू कमकुवत झाल्याने पाडून त्या जागी नवीन पूल उभारणीचे काम पूर्ण होण्यास अंदाजे पाच वर्षांहून अधिक काळ लोटला असून या कालावधीत मध्य व पश्चिम रेल्वेचे लाखो प्रवासी विद्यार्थी व स्थानिक रहिवासी यांची झालेली गैरसोय व वाहतुकीवर झालेला अधिकचा खर्च ही विचार करण्याची बाब होय. लोअर परळचा पूल पाडताना तो का पाडला जात आहे व तो कोणत्या बाजूने कमकुवत आहे याचा विचार केला गेला का ? जर पूल रेल्वेमार्गावर कमकुवत होता तर करी रोड, वरळी, दादर दिशेला जाणारा भरीव असलेला पूल का पडण्यात आला? असा प्रश्न आज अनेक जण विचारीत आहेत.

या पुलावरून यापूर्वी वरळी, दादर, करी रोड या तीनही दिशांना जाणारे मार्ग तसेच खासगी वाहने व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व मध्य व पश्चिम रेल्वेचे लाखो प्रवासी तसेच स्थानिक जनतेची वर्दळ लक्षात घेऊन हा पूल का बांधला गेला नाही, याचीही विचारणा आज अनेक लाखो जनता करीत आहे. अजूनही हा पूल पूर्ण झालेला नसून एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न झालेला आहे.

या पुलावर पूर्वीप्रमाणे दोन्ही बाजूला असलेला फुटपाथ उपलब्ध करून देणे तसेच पुलावरून रेल्वेकडे जाण्यासाठो मार्ग उपलब्ध करून देणे, बस स्टॉप दोन्ही मार्गावरून सुरू करण्याची व्यवस्था असावी अशा नागरिकांच्या आवश्यक असलेल्या मागण्या सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने संबंधितांकडे केल्या आहेत व त्याचा ते पाठपुरावादेखील करीत आहेत. लोअर परळच्या परिसरातील चाळ कमिटय़ा व सोसायटीमधील रहीवाशांनी एकत्रित येऊन स्थापलेल्या फेडरेशनच्या माध्यमातून या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

ज्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली या पुलाचे बाधकाम पाडण्याचे व हा पूल नव्याने बाधण्याचे काम सुरू झाले व ज्यांनी या पुलाचे नव्याने आराखडे तयार केले व ज्यांनी त्याला मान्यता दिली त्या संबंधितांनी या विभागातील दुतर्फा दादर-करी रोड व वरळीकडे जाणाऱ्या स्थानिक रहिवासी तसेच मध्य व पश्चिम रेल्वेचे लाखो प्रवासी व पुलावरून जाणारे इतर पादचारी व वाहनांच्या गरजांचा व फुटपाथचा विचार केला का ? लोअर परळ रेल्वे स्थानकावरून बाहेर आल्यानंतर लालबाग, काळाचौकी व भायखळा तसेच वरळी व प्रभादेवीच्या दिशेने जाणाऱ्यांना टॅक्सी व बस कुठे मिळणार? एखादा हायवेवरून जाणारा पूल हे ध्येय लक्षात घेऊन हा पूल बांधला गेल्याने अनेक गैरसोयी झाल्या आहेत.

एखादा पूल पाडून नव्याने बांधताना पूर्वीच्या असलेल्या सुविधा तशाच नव्याने उभ्या करून त्यात भर म्हणून नवीन सुविधा उपलब्ध करणे हे गरजेचे असताना लोअर परळचा पूल बांधताना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष व जनतेला संबंधितांकडे न्याय मागण्याची वेळ आली. जनहिताच्या दृष्टीने लोअर परळच्या या पुलावरील आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्थानिक जनता, विद्यार्थी, मध्य व पश्चिम रेल्वेचे लाखो प्रवासी यांच्या होत असलेल्या गैरसोयींचा कधी विचार करणार व त्या सुविधा लवकरात लवकर कधी उपलब्ध होणार?