अवती / भवती – आनंदमेळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कही दूर जब दिन ढल जाए, सांज की दूल्हन बदन चुराए चुपकेसे आए…’ पहिल्या दिवशी हेच शब्द होते ते, दिवस मावळतीकडे सरकत असतानाची तशीच सुंदर संध्याकाळ. ठाण्याच्या मासुंदा तलावाजवळून जात असताना दूरवरून पाण्याच्या संथ लाटेबरोबर तेव्हा ही गाण्याची लकेर ऐकू आली.  

हो, गाणंच होतं ते, पण हे रेडिओवरचं नव्हतं की कुठलं रेकॉर्ड केलेलं वाटत नव्हतं. कुठे ऑर्पेस्ट्रा असेल असंही वाटत नव्हतं. अर्थात आपण गाणी खूप ऐकत असतो, पण त्या आवाजाने तिथे ओढून नेले मला. कुणीतरी सुंदर लाइव्ह गात होतं. संगीताची, विशेषत जुन्या गाण्यांची आवड असल्यामुळे सापडला एक आनंदमेळा, कराओकेमेळा. कलाकार आणि रसिकश्रोत्यांचा आनंदी सोहळा. घाईत असूनही तिथे थोडा वेळ रमलो.

रोज सायंकाळी सूर्य पश्चिमेकडे झुकत चालला की, इथे तलावाला लागून असलेल्या पुष्पवाटिकेत एका बाजूला हा आनंदमेळा भरतो. एक दिलखुलास गायक, रसिक, कलाकार स्वखर्चाने माइक व स्पीकरचे आयोजन करून लहान-मोठय़ा सर्व दर्दी रसिकांसाठी खजिना खुला करून ठेवतो. इथे वयस्कर मंडळी आपले वय विसरून आपल्या तरुणपणीच्या रम्य आठवणींत रमतात. कुणीही यावे आणि वय विसरून गायनाची आपली सुप्त इच्छा पूर्ण करून घ्यावी. गाता येत नसेल तर श्रवणभक्तीचा आस्वाद घ्यावा अशी इथे माफक इच्छा असते.

अलीकडे मुंबई-ठाण्यासारख्या शहरांतून नव्याने आलेले हे फॅड. नानानानी पार्क, पालिकेचेच गार्डन, कुठे शाळेच्या मोकळय़ा पटांगणात, तर कुठे सुंदर वातावरणात तलावाशेजारी, बस स्टॉपजवळ, कुठे समुद्रकिनारी वाळूत…जिथे मिळेल तिथे. छान जागा मिळेल तशी आनंद व्यापून टाकताना दिसते ही कराओके संध्याकाळ. लहान-मोठे, स्त्राr-पुरुष, गरीब-श्रीमंत…कुणीही यावे, गावे, ऐकावे आणि निघून जावे. ज्यांना गाणे गायची आवड असेल त्यांनीही आणि ज्यांना गाणी ऐकायला आवडतात त्यांनीही तिथे हजेरी लावून चारचांद लावावेत.

असे आनंदमेळे खरंच ठिकठिकाणी व्हावेत. आता जरी हौशी कलाकारांनी असे गुप स्वखर्चाने उभे केलेले असले तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण यामुळे निखळ आनंद मिळतो. त्याचे आरोग्यासह सर्वांनाच अनेक फायदे आहेत.

ते खुले व्यासपीठ आहे, अशा ठिकाणी वयाचे बंधन नसते. आपल्याला गाता येते असे वाटत असेल तर तो प्रयोग इथे चारचौघांसमोर करून बघता येतो. काही जण खूप छान गातात, तर काही जण चुकीचेही गातात. मात्र त्यांची तल्लीनता मनमोहक असते. इथे आपले आवडते सिनिअर्स आनंदाने मार्गदर्शन करतात. तिथे कोणीही लहान-मोठा नसतो. तुमचे गाणे चांगले झाले की, त्वरित उत्कृष्ट दाद मिळते. तुम्हाला जर खरेच चांगले गाता येत असेल तर इथून पुढे बरेच मार्ग आहेत.

या सोहळय़ात जुनी गाणी नवोदितांना परिचयाची होतात. जुनी-नवी गाणी नव्याने समोर येतात. इथे सुंदर सांस्कृतिक वातावरणात वेळ जातो. एकूण वातावरण खेळीमेळीचे असते म्हणून त्याला कराओकेचा आनंदमेळा म्हणायला कुणाची हरकत नसावी.