शैलगृहांच्या विश्वात – भदंत इंद्ररक्षिताची शैलगृहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव

[email protected]

कामशेतजवळच्या पाले गावाजवळ असलेल्या डोंगरातील ही लेणी. इथे असलेल्या शिलालेखातील ‘भयंत इदरखित’ (भदंत इंद्ररक्षित) हे व्यक्तिनाम व नमो अरहंताणं…’ अशी लेखाची सुरुवात यावरून ही जैन लेणी असल्याचे प्रतिपादन अभ्यासकांनी केले असून महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन जैन शिलालेख म्हणून या शैलगृहाचे महत्त्वही दर्शवले आहे.

भारतातील शैलगृहांचा इतिहास अभ्यासत असताना बहुतेक उल्लेखनीय शैलगृहे मुख्यत धार्मिक उपयोगासाठी कोरली होती हे आपण आतापर्यंतच्या लेखांमध्ये पाहिले. बरेच वेळा तेथील शिलालेखांमुळे त्या शैलगृहाचे उपयोजन नेमके काय होते हे स्पष्ट होते. पुण्यापासून 50 कि.मी. वर असणाऱया कामशेतजवळच्या पाले नावाच्या गावाजवळ असलेल्या डोंगरातील एका शैलगृहातील असाच एक शिलालेख 1960 साली रामचंद्र भिडे यांनी उजेडात आणला. पुढे सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ ह. धी. सांकलिया आणि डॉ. शोभना गोखले यांनी 1969 साली याचा परत एकदा अभ्यास करून हा इसवी सन पूर्व 2 रे ते 1 ले शतक या काळातील असल्याचे प्रतिपादन केले. महाराष्ट्रातील प्राचीन जैन शिलालेख म्हणून याचे महत्त्व दाखवून दिले.

‘नमो अरहंताणं…’ अशी सुरुवात असल्याने हे जैन लेणे आहे असे साधारणपणे मानले जाते. या शैलगृहाच्या रचनेच्या अभ्यासानंतर हे एक ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार झालेले नैसर्गिक विवर पुढे भिक्षू निवासाकरिता वापरले गेल्याचे दिसते. त्यामुळे या शैलगृहाचे मुखदर्शन, भिंती हे एखाद्या नैसर्गिक बोगद्यासारखे दिसते. उजव्या भिंतीलगत एक दगडी बाक, पाण्याचे टाके आणि त्याच्या वरती ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेतील शिलालेख आहे- ‘भयंत (भदंत) इदरखित (इंद्ररक्षित) याने इतरांबरोबर लेणे आणि टाके दान दिले.’ आचार्य इंद्ररक्षित याने दिलेले हे दान नोंदवणारा शिलालेख शैलगृहात प्रवेश केल्यावर लगेच उजव्या बाजूला दिसतो. तिथेच एक मीटर खोल पाण्याचे टाके आहे.

पाले लेण्याच्या आतील बाजूस उजवीकडे एक छोटीशी खोली कोरली आहे, तर समोरच्या भिंतीत एक कोनाडा पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त कोणतेही कोरीव काम, नक्षीकाम इथे दिसत नाही. अनेक  अभ्यासकांनी हे जैन नसून बौद्ध लेणे असावे असे मत प्रतिपादन केलेलं आहे. अर्हंत हा शब्द बौद्ध लेखांमध्ये आणि ग्रंथांमध्ये आढळतो. त्यामुळे हे बौद्ध लेणेही असू शकेल असे त्यांचे मत आहे. इसवी सनाच्या 5 व्या शतकानंतर तयार झालेली जैन लेणी ही मुख्यत मंदिरे किंवा पूजा स्थाने आहेत. त्यामध्ये त्यात राहायला वेगळ्या खोल्या केलेल्या आढळत नाहीत. मोठे मंडप आणि गर्भगृह अशी त्यांची रचना असते. त्यामुळे पाले येथील लेणे कदाचित जैन नसेल असा एक मतप्रवाह अभ्यासकांमध्ये दिसतो. मात्र या काळातील उदयगिरी खंडगिरी येथेही अशा प्रकारच्या सोयी केलेल्या दिसतात. त्यामुळे सुरुवातीच्या जैन शैलगृहांमध्ये अशी राहायची सोय करायची परंपरा होती असे म्हणता येऊ शकते. दुसरा एक पुरावासदृश योगायोग म्हणजे या स्थळाचे आजचे नाव. पल्ली किंवा बसदी असा अनेकदा जैन मठांचा अभिलेखामध्ये उल्लेख येतो. आजही या गावाचे नाव पाले आहे हे महत्त्वाचे आहे. त्यावरून कदाचित इथे पूर्वी एखादी मोठी जैन वसाहत असावी असे वाटते.

पाले येथील शिलालेखासारखाच अजून एक शिलालेख 2019 मध्ये लोहगड किल्ल्याच्या लोहगडवाडी या भागात असलेल्या काही लेण्यांपैकी एका पुढचा भाग तुटलेल्या लेण्यात आढळून आला. विवेक काळे, साईप्रकाश बेलसरे, निनाद बारटक्के, अमेय जोशी, अभिनव कुरकुटे आणि अजय ढमढेरे यांचा या संशोधनात सहभाग होता. या शोधामुळे पाले येथील लेखाचा पुनर्विचार करावा लागला. कारण दोन्ही लेखांमधील ‘भयंत इदरखित’ (भदंत इंद्ररक्षित) हे व्यक्तीनाम आहे. या लेखाची सुरुवातही पाले येथील लेखाप्रमाणे ‘नमो अरहंताणं…’ अशीच केलेली आहे. फक्त या लेखात ‘गोसाल’ नावाच्या अजून एका दानकर्त्याचा उल्लेख आहे. या दोन्ही लेखांची अक्षरवटिका अगदी सारखी आहे. त्यामुळे दोन्ही लेखांचा काळही एकच असावा असे वाटते. यातील मुख्य दानकर्ता भदंत इंद्ररक्षित हाही एकच असावा असाही कयास यातून करता येतो.

लोहगडवाडीतील लेखात दोन आसने, पाण्याची टाकी, वेदिका आणि पथ यांचे दान दिल्याचा उल्लेख आहे. पाले येथील लेखात भदंत इंद्ररक्षित याने इतरांबरोबर लेणे आणि टाके दान दिल्याचा उल्लेख आहे. त्या इतर लोकांची नावे त्यात नाहीत. कदाचित त्यापैकी एक हा गोसाल असू शकेल. या सर्व मुद्दय़ांबरोबरच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे चर्चिला गेला पाहिजे तो म्हणजे भदंत इंद्ररक्षित या जैन आचार्याने दिलेले दान. जर सर्वसंगपरित्याग करून त्याने संन्यास घेतला होता, अपरिग्रह हे त्याच्या धर्मपरंपरेतले एक अतिशय महत्त्वाचे तत्त्व होते, तर त्याच्याकडे एवढी मोठी दाने देण्यासाठी पैसे कुठून आले? बौद्ध भिक्षूंनी दाने दिल्याची बरीच उदाहरणे आपल्याला प्राचीन काळापासून पाहायला मिळतात, पण जैन मुनी किंवा साध्वी यांनी दिलेल्या दानाचे लेख हे अत्यंत दुर्मिळ आहेत. मथुरा येथील कुषाण कालीन लेखांमध्ये गृहस्थाश्रमी भक्तांच्या वतीने दिलेल्या दानांचे उल्लेख आहेत, पण त्यांनी एकटय़ांनी दिलेली दाने दिसत नाही. पुढे काही काळाने काही ग्रंथ, काही मूर्ती यांच्या दानाचे क्वचित पुरावे आहेत,

ज्या परिसरात हे शिलालेख असलेली शैलगृहे आहेत, त्या परिसरात त्या काळात नेमके कशा प्रकारचे वातावरण होते हे आज सांगणे खूप अवघड आहे. भाजे, बेडसे, कार्ले या महत्वाच्या बौद्ध स्थळांच्या जवळच ही दोन्ही स्थळे असल्याने बौद्ध आणि जैन असे दोन्ही परंपरांचे भिक्षू संघ इथे राहत होते असे अनुमान काढता येते. त्यांच्यामध्ये काही स्पर्धा किंवा संघर्ष होत होता का हे आज सांगणे अवघड आहे. साधारणपणे जैन मुनींनी पावसाळ्यात त्यांच्या भक्तांच्या घराच्या परिसरात वस्ती करण्याची परंपरा आहे, तर मग या लेणी त्यांच्यासाठी कोरण्याचे नेमके कारण काय होते? भारतात काही अपवाद वगळता इतर ठिकाणी अशा जैन लेणी का नाहीत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज मिळणे अवघड आहे, पण भदंत इंद्ररक्षित याने दान दिलेल्या आणि ते नोंदविलेल्या शिलालेखांमुळे प्राचीन भारतातील जैन परंपरेकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहता येते व या विषयाचा अजून खोलवर अभ्यास करण्याची किती गरज आहे हे लक्षात येते.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)