निरागस नात्याची घट्ट वीण…

575

काल भाऊबीज झाली असली तरी रविवारपर्यंत भावाबहिणीचा हा सोहळा सहज चालेल. पाहूया या निःस्वार्थ… निर्लेप नात्याविषयी काय बोलतेय आजची तरुणाई…

prathmesh11एकमेकांना समजून घ्या…

भाऊबीजेचा खरा अर्थ बहीण-भावामधील असणाऱ्या प्रेमळ नात्याला उजाळा देण्याचा दिवस… खरं तर हा दिवस म्हणजे बहीण-भावाचे अनोखे नाते असेच आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. पण आजच्या काळात स्त्री-पुरुष दोघेही बरोबरीने काम करत असताना कोणी कोणाच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. गरज आहे ती एकमेकांना समजून घेण्याची आणि एकमेकांना समान दर्जा देण्याची. पुरुषप्रधान संस्कृती खोलवर रुजलेल्या समाजात स्त्रियांना कमकुवत समजले जाते. त्यामुळे तिच्या संरक्षणाची जबाबदारी पुरुषांवर आहे असा भ्रम शतकानुशतके आपल्या समाजात आहे. पुरुषांना संरक्षण करायचेच असेल तर ते स्त्रीच्या मताचे, वैचारिक स्वातंत्र्याचे, तिच्या प्रतिष्ठेचे केले पाहिजे. हीच प्रत्येक बहिणीसाठी आपल्या प्रिय भावाकडून खरी भेट ठरेल.

प्रथमेश गीते, मुंबई विद्यापीठ

shruti-shetyeएकमेकांवर विश्वास हवा

बहीण-भावाच्या प्रेमाचा मंगल दिवस म्हणून भाऊबीजेकडे पाहिले जाते.  कारण नात्यात प्रेम आणि जिव्हाळा असला की त्या नात्याचे संरक्षण हे आपोआपच होते. भावाकडे फक्त आपला एक संरक्षणकर्ता म्हणून न पाहता आपला जवळचा एक मित्र म्हणून पाहावे. ज्याच्यासोबत आपण सर्वकाही खुलेपणाने बोलू शकू व तोही आपल्यासोबत प्रत्येक गोष्टीत खंबीरपणे उभा राहील. नात्यात प्रेम आणि जिव्हाळा हवा असल्यास एकमेकांवर दृढ विश्वास असणे आवश्यक असते. असा विश्वास नात्यात निर्माण करणे ही बहीण म्हणून मी माझी जबाबदारी समजते व भाऊबीजेसारखा सण भाऊ बहिणीला अधिक जवळ आणण्यास नक्कीच मदत करेल.

श्रुती शेटे,  सिडनेहॅम कॉलेज

manali011बंधन हवेय जिव्हाळ्याचे

रक्षण करायला आजकाल भाऊ जवळ असेलच असे नाही. मग बहिणीची अपेक्षा असते की त्याने प्रेमाचे उरलेले बंधन जिव्हाळ्याने बांधून ठेवावे. एका मुलीला हवा असतो तो ‘बाबांची लाडकी मुलगी’ असे चिडवणारा आणि तिला न आवडलेल्या स्थळाबाबत तिला पाठिंबा देणारा भाऊ. बहीण घरी आल्यावर तिच्याकडे टीव्हीचा रिमोट देणारा भाऊ प्रत्येक बहिणीला हवा असतो. स्त्री… मग ती वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावरील असो, भाऊबीजेला तिच्या मनाला माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तिच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, तेथील ऋणानुबंध ती आपल्या हृदयात कायम जपून ठेवत असते. व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहेर पडावे लागत असल्याने भावंडे एकाच शहरात असणार याची खात्री नसते. बहीणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे भाऊबीजेस प्रत्यक्ष भेट होतेच असे सांगता येत नाही.

 मनाली शेळके, सोमय्या कॉलेज

janardan11दुसऱ्याच्या बहिणीलाही मान द्या

भाऊबीज म्हणजे छान गेटटुगेदर. सगळी भावंडे एकत्र येऊन मजा-मस्ती चालते. बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन असणारा हा दिवस विशेष असतो. ओवाळून भावाचे आयुष्य वाढावे यासाठी बहीण प्रार्थना करते. ज्या समाजात महिलांना बहीण समजून पुरुष वर्ग त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे या महिला समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेला बहिणीने भेटवस्तू म्हणून ‘तू मला जो मानसन्मान देतोस तो दुसऱ्यांच्या बहिणीलाही दे’ असे वचन घेतले पाहिजे.

जनार्दन येडगे,  हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स

आपली प्रतिक्रिया द्या