लेख – चीनकडून ‘सलामी स्लाइसिंग’चे दबावतंत्र!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

चीन सलामी स्लाइसिंग या डावपेचाचा वापर अनेक वर्षांपासून करत आहे. यामध्ये नेमके काय केले जाते? चीन जमिनीवर आणि समुद्रामध्ये हळूहळू काही वेळा सांगून आपली सीमा पुढे सरकवतो, थोडी थोडी जमीन बळकावत राहतो. पहिल्या झालेल्या सलामी स्लाइसिंगचे  पुढे अजून मोठय़ा सलामी स्लाइसिंगमध्ये रूपांतर केले जाते. अशा प्रकारे चीनने अक्साई चीनवर पूर्णपणे कब्जा केला आहे आणि साऊथ चायना समुद्रामध्ये 80 टक्के समुद्रावर आता चीनचे अधिपत्य आहे.

गेल्या काही दिवसांपासून अडीचशे चिनी मच्छीमार बोटी फिलिपाईन्सच्या    समुद्री हद्दीमध्ये घुसल्या आहेत आणि तिथून परत जायचे नाव घेत नाही. फिलिपाईन्सने त्यांना परत जाण्याकरिता सांगितले आहे, परंतु चीन ऐकायला  तयार नाही. 2016 मध्ये जागतिक कोर्टाने असा निर्णय दिला होता की, ज्या भागात चीन आता घुसला आहे तो समुद्र पूर्णपणे फिलिपाईन्सचा आहे, परंतु चीन जागतिक कोर्टाचा हा निर्णय मानायला तयार नाही.  दुसऱ्या महायुध्दानंतर चीन ही एकमेव मोठी शक्ती आहे, जी इतर देशांच्या सीमारेषांमध्ये  घुसखोरी करून सतत आपल्या सीमा वाढवत असते. हिंदुस्थान-चीनदरम्यान सीमा तणावाची परिस्थिती सोडविण्यासाठी लडाखमध्ये दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असताना जनरल बिपिन रावत यांनी चीनच्या सलामी स्लाइसिंग रणनीती विषयी भाष्य केले.

सैन्याच्या भाषेमध्ये सलामी स्लाइसिंग या धोरणात बऱ्याच छोटय़ा कृती केल्या जातात. जमीन बळकावत  राहणे, धमकावणे, ऐतिहासिक किंवा इतर पुरावा देऊन नवीन प्रदेश ताब्यात घेणे, पुनः पुन्हा निष्फळ चर्चा करत राहणे हा खेळ खेळला जातो. सीमा विवाद कधीच सोडवला जात नाही. कारण अजून जास्त जमीन बळकावणे जास्त महत्त्वाचे असते. जमिनी सीमांवर चीनने या डावपेचाचा वापर हिंदुस्थान, नेपाळ, भूतान, पाकिस्तान या देशांच्या विरुद्ध केलेला आहे. नेपाळमध्ये चीनच्या बाजूने असलेले कम्युनिस्ट सरकार असूनसुद्धा चीनने जमीन बळकावली आहे. समुद्रामध्ये साऊथ ईस्ट एशियामधल्या सगळ्या देशांच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये चीनने सलामी स्लाइसिंगद्वारे प्रवेश केलेला आहे.

सलामी स्लाइसिंग केल्यानंतर दुसऱ्या राष्ट्राला चीन वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव देतो. अनेक प्रकारची दमदाटी करून आपण केलेली घुसखोरी त्यांना मान्य करायला भाग पाडतो. जर त्या देशाचा दबाव फारच वाढला तर जिथे चार पावले आत आले होते, तिथून ते दोन पावले मागे जातो. जसे हिंदुस्थानच्या बाबतीत घडले, परंतु काही घुसखोरी ही कायमची होऊन जाते. हिंदुस्थान एक एकुलता एक देश आहे, ज्याने चिनी सलामी स्लाइसिंगला  लष्करीरीत्या थांबवण्याचा प्रयत्न केला आणि चीनला गलवान खोऱ्यात, पेन्गोंसो तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर आणी कैलाश पर्वतावर एक मोठा धक्का दिला. मात्र ही हिंमत इतर कुठल्याही देशाने दाखवलेली नाही. सलामी स्लाइसिंग केलेल्या भागात चीननंतर अजून नवीन दावे तयार करतो.

आता 650 गावे चीन-हिंदुस्थान, भूतान आणि नेपाळच्या सीमांजवळ निर्माण करत आहे. आधी कुठेही लोकसंख्या राहत नसलेल्या सीमांवर नवीन गावे वसवली जात आहे, ज्यामध्ये तिबेटचे नागरिक आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरिता चिनी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते इथे वसवले जातील. नंतर या नागरिकांना आपल्या जनावरांना घेऊन पुढच्या भागात घुसखोरी करायला सांगितले जाते आणि असा दावा केला जातो की, ही चराऊ जमीन ऐतिहासिक दाव्याप्रमाणे आमचीच आहे. म्हणजे एक सलामी स्लाइसिंगच्या पुढे पुन्हा एकदा दुसरी सलामी स्लाइसिंग केली जाईल.

सलामी स्लाइसिंगमध्ये सीमा हळूहळू पुढे गेल्यामुळे कुठलाही देश एकदम लढाई करायला तयार नसतो. हायब्रिड युध्दाचा वापर करून चीन जगाला या सीमांवर लष्करी पर्याय वापरण्यापासून थांबवतो. म्हणजे लढाई न करता, एकसुद्धा गोळी फायर न करता चीनने अनेक देशांच्या जमिनी सीमांचा नकाशाच बदली केलेला आहे. एवढेच नव्हे तर हेच डावपेच चीन यापुढे मध्य आशिया आणि रशियाच्या बाबतीतसुध्दा वापरणार आहे. सलामी स्लाइसिंगचे  डावपेच मोठय़ा प्रमाणामध्ये साऊथ चायना समुद्रामध्येसुद्धा वापरले जात आहेत. सलामी स्लाइसिंगबरोबर अपप्रचार, दुष्प्रचार, मानसिक युद्ध, धमक्या देऊन देशांना घाबरवणे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा गैरवापर करणे हेसुद्धा केले जाते.

साऊथ चायना समुद्रामध्ये चिनी कोस्ट गार्डच्या मदतीने सिव्हिलियन मच्छीमार बोटी घेऊन पुढे सरकतो आहे. हेच वेगवेगळ्या समुद्री भागांमध्ये केले जात आहे, परंतु केवळ सलामी स्लाइसिंग केलेल्या भागामध्ये गस्त घालून किंवा पेट्रोलिंग करून आपली सीमा पुढे सरकणार नाही हे माहीत असल्याने  तिथे कायमचे वर्चस्व प्रस्थापित करणे गरजेचे आहे.

समुद्रामध्ये गावांच्या ऐवजी कृत्रिम बेटे तयार केली जात आहेत. उदाहरणार्थ खडकांच्या वर भर टाकून तिथे कृत्रिम बेटांची निर्मिती केली जाते आणि नंतर तिथे स्वतःच्या मिलिटरी पोस्ट निर्माण करणे, शस्त्रे तैनात करणे किंवा कृत्रिम हेलिपॅड किंवा विमानांच्या धावपट्टय़ा तयार करणे असे प्रकार सुरू आहेत.

साऊथ चायना समुद्रात सलामी स्लायसिंगचे डावपेच वापरून चीनने आपल्या समुद्री सीमा पुष्कळ पुढे नेल्या आहेत. आता चीनने कृत्रिम बेटांवर मानवी वस्ती स्थापन करणे, भाज्या लावणे, मच्छीमारांना तिथे वेळोवेळी आणणे असे सुरू केले आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने समुद्रामध्ये दोन नवीन जिल्हे प्रस्थापित केले आणि त्यांची नावे आहेत आणि पारसल आणी स्पार्टली   जे याआधी इतर देशांच्या ताब्यात होते. चीनने लगेच कायदा पास करून आपल्या कोस्ट गार्ड म्हणजे तटरक्षक दलाला कायदेशीररीत्या या समुद्रामध्ये आलेल्या इतर देशांच्या बोटीवर फायरिंग करण्याचे अधिकार दिलेले आहेत. चीनने शस्त्रांचा वापर न करता, बंदुकीचा वापर न करता सलामी स्लाइसिंगद्वारे जगाविरुद्ध एक नवीन प्रकारचे युद्ध सुरू केले आहे आणि त्याला प्रत्युत्तर देणे हिंदुस्थान सोडून इतर कुठल्याही देशाला जमलेले नाही. हिंदुस्थानचे सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले आहे की, आम्ही चीनच्या सलामी स्लाइसिंग डावपेचांना पराभूत करू, परंतु सगळ्या देशांच्या सीमांवर त्यांचे सैन्य तैनात नसल्यामुळे सलामी स्लाइसिंग थांबवणे तितकेसे सोपे नाही.

[email protected]