स्वागत दिवाळी अंकाचे

278

स्वागत दिवाळी अंकाचे

चिंतन आदेशchintan-adhesh

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही छंद हे असतातच. छंद हे अनेक प्रकारचे असतात. या छंदामुळे मनुष्य आनंदी राहतो. म्हणूनच या वर्षीचा अंक ‘छंद विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. या अंकामध्ये शंकरराव कोल्हे, उत्तम कांबळे, अरविंद गोखले, अनुराधा औरंगाबादकर, रेणु गावस्कर, मधु पोतदार, नंदिनी आत्मसिद्ध, प्रतिमा इंगोले, अनिल लचके, सुरेश बांदिले, संदीप खरे, श्रीकांत नरुले, सदानंद गोखले आदी मान्यवर लेखकांनी आपापल्या छंदावर लिखाण केले आहे. अंकातील कविताही छंद याच विषयावर आहेत. शिवाय अंकातील व्यंगचित्रेसुद्धा याच विषयावर आधारित आहेत. छंदाचे वेगवेगळे प्रकार असू शकतात हे अंकातील लेखातून वाचकांना कळेल.

संपादक : अभिनंदन थोरात

पृष्ठे : 286, किंमत 100 रुपये

marathi-vignanमराठी विज्ञान परिषद पत्रिका

या अंकाचे यंदाचे हे 54वे वर्ष! नामवंत लेखकांचे विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख हे अंकाचे वैशिष्टय़ यंदाही कायम राखले आहे. गोंदणाचे स्वप्नरंजन (डॉ. उदय खोपकर), चवींची जाणीव (प्रा. भालचंद्र भणगे), कचरा नव्हे… संपत्ती! (दिलीप हेर्लेकर), सुखाचे जैवरसायनशास्त्र (डॉ. सुरेश भागवत), फुलपाखरांसाठी बाग (मकरंद कुलकर्णी), एशरची गणिती चित्रे (डॉ. विवेक पाटकर) तसेच प्लॅस्टिकच्या वापराविषयी तज्ञांच्या मुलाखतींचाही समावेश अंकात आहे विज्ञानकथा या दिवाळी अंकाची जमेची बाजू असून ‘गंमतजंमत’ या लहान मुलांच्या सदरात ‘प्रश्न पडलेत? निसर्गाला विचारा!’ (प्रा. मोहन मद्वाण्णा), जादूचा चौरस (दिलीप गोटखिंडीकर) यांचा समावेश आहे.

संपादक : संपादक मंडळ

पृष्ठे : 176, मूल्य : 150 रुपये

granthjagatमेहता मराठी ग्रंथजगत

यंदाचा हा दिवाळी अंक ‘पत्र विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. उत्तम भाषेतील उत्तम आशय असलेल्या ‘पत्रां’ना एक वाङ्मयीन आकृतीबंध असतो. सोशल मीडियाच्या काळात संवादाचं सशक्त माध्यम असणारी पत्रं काळाच्या ओघात हरवू लागली आहेत. ‘पत्र’ याच माध्यमाचं सामर्थ्य दर्शवणारी वैविध्यपूर्ण पत्रं या अंकात समाविष्ट आहेत. इंदिरा गांधी, महात्मा गांधी, किशोर कुमार, स्मिता पाटील आदी नामवंतांच्या पत्रांचा समावेश या अंकात केला आहे. वामन देशपांडे यांनी साहित्याच्या आणि साहित्यातील पत्रव्यवहाराबद्दल लिहिलं आहे. विश्वास पाटील, उमा कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, कांचन घाणेकर, नेहा पुरव, यशोधरा काटकर यांनी पत्रांचे महत्त्व सांगणारे लेख लिहिले आहेत. याशिवाय अनेक दुर्मीळ पत्रांचं लेखन, तसेच ‘झाकोळ’, पोस्टमन या कथांमधूनही पत्रांचं स्थान अधोरेखित केले आहे.

संपादक : सुनील मेहता

पृष्ठे : 160, किंमत : 100 रुपये

aksharbhetअक्षरभेट

‘वेध भविष्याचा’ या संकल्पनेतून यंदाचा ‘अक्षरभेट’चा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. यातील साहित्य विभागात साहित्य संमेलन (दत्ता कुलकर्णी), गुऱहाळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे (सुधीर सुखटणकर) हे लेख वाचनीय आहेत. याशिवाय रूढीपंरपरा (डॉ. द. ता. भोसले), जगातील अद्भुत व चमत्कारिक गावे (प्रा. चंद्रकुमार नलगे) यांचा लेख, 2019च्या लोकसभा निवडणुकांवर अभय मोकाशी, वसंत देशपांडे यांनी मतदारांच्या मनातील संभ्रमाचा वेध घेतला आहे. आरोग्य विभागात मधुमेहमुक्त अभियान, पर्यावरणाचा समतोल, सरोगसी मदर्स या ज्वलंत विषयांवर माहितीपूर्ण लेख आहेत. तसेच समाजमाध्यमे आणि शिवराळपणा (अलोक जत्राटकर), वैदर्भीय लोकभाषा, झाडीपट्टी रंगभूमी या वेगळय़ा विषयांवरील लेख वाचकांना नक्की आवडतील.

संपादक : सुभाष सूर्यवंशी

पृष्ठे : 180, किंमत : 120 रुपये

grahvedhग्रहवेध

या अंकाचे हे 28वे वर्ष आहे. नावाप्रमाणेच या अंकात ज्योतिषशास्त्र्ाावरील लेखांचा समावेश असतो. या वर्षीच्या अंकात स्वरशास्त्र (डॉ. निमाई बॅनर्जी), टॅरोरीडिंग मधुकर लेले), लाल किताबमधून घेतलेली विशेष माहिती (ऍड. महेश वाघोलीकर), उपासना व आरोग्य (प्रकाश प्रसादे), पुष्पौषधी (भारती काळे), ज्योतिष एक मार्गदर्शन विज्ञान (विजय पालवे) हे अभ्यासपूर्ण लेख आहेत. मद्राशास्त्राचे तज्ञ नादीर गोरीमार यांचा माहितीपूर्ण लेख व हस्तरेषावरील मंगेश महाडिक यांचे लेख या अंकात आहेत. आपल्या आहारात खनिजांचे महत्त्व सांगणारा प्रफुल्ल पवार यांचा लेख वाचनीय आहे. वाचकांसाठी भारती काळे यांचे वार्षिक भविष्य आहे.

संपादक : डॉ. उदय मुळगुंद

पृष्ठे : 148, किंमत : 125 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या