ठसा – डॉ. जब्बार पटेल

2430

>> प्रशांत गौतम

प्रख्यात दिग्दर्शक, अभिनेते डॉ. जब्बार पटेल यांची नुकतीच 100 व्या अ.भा. मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. यंदाचे नाटय़संमेलन हे 100 वे असल्याने त्याचे यजमानपद मुंबईतील नाटय़ परिषदेकडेच आहे. त्यामुळे शतकमहोत्सवी संमेलनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. पटेल यांची ओळख सकस आणि दर्जेदार चित्रपट, नाटक आणि लघुपटांचे दिग्दर्शक अशी सांगता येईल. दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचा समांतर प्रवास सुरू आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे 23 जून 1942 साली जन्मलेले जब्बार रझाक पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षीच शालेय नाटकात भूमिका करण्याची आणि नाटय़ दिग्दर्शन करण्याची संधी प्राप्त झाली. सोलापुरातील श्रीराम पुजारी हे त्या काळातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व़  बालपणी पटेल यांना पुजारी यांच्याच घरी राहण्याचा योग आला. तेथील वास्तव्यात साहित्य, संगीत, नाटय़ अशा तिन्ही क्षेत्रांतील कलावंतांना जवळून अनुभवता आले. पटेल यांना या क्षेत्राची आवड अगदी मनापासून असल्याने ते पडेल ती कामे करीत असत. पुजारींकडे येणाऱया कलावंतांसाठी चहा देण्याचे काम असो की स्नानासाठी पाणी काढून देण्याचे काम असो, जब्बार ते प्रामाणिकपणे करीत असत. हा प्रवास खडतर असला तरी जे काम सांगितले ते व्यवस्थित पार पाडले. मात्र याचवेळी त्यांना तिन्ही क्षेत्रांतील कलांचा बारकाईने अभ्यासही करता आला. यातून जे काही मिळत गेले ते जब्बार यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरकच ठरले. शाळेत असताना चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू हे मूकनाटय़ आणि महाविद्यालयात असताना तुझे आहे तुजपाशी यामधील श्याम अशा भूमिका त्यांच्या वाटय़ाला आल्या. पुण्यात बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात असतानाच्या प्रवासात विजय तेंडुलकर आले. पटेल यांनी त्यांची नाटके वाचली व प्रयोगशीलतेने बसवलीह़ी त्याचे उदाहरण म्हणून बळी ही एकांकिका आणि श्रीमंत या नाटकाचे देता येईल. जब्बार पटेल यांनी दिग्दश्&िात केलेली नाटके नाटय़ स्पर्धेत गाजली व पारितोषिकप्राप्त ठरल़ा ‘अशी पाखरे येती’ हे विजय तेंडुलकर यांचे त्यातीलच एक महत्त्वाचे नाटक़ त्यानंतर माणूस नावाचे बेट, वेडय़ाचे घर उन्हात ही नाटके आली. मात्र ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर आपला दबदबा निर्माण केला. हेही नाटक कमालीचे गाजले. ज्यांनी घाशीराम बघितला असेल त्यांच्या या नाटकाचा प्रभाव काय होता हे लक्षात येऊ शकते. ब़ा ज़े वैद्यकीय महाविद्यालयात असताना अनिल अवचट, कुमार सप्तर्षींसारखी लेखक, पत्रकार मंडळी त्यांना भेटली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पटेल पती-पत्नींनी प्रॅक्टिससाठी दौंड हे गाव निवडले. पती-पत्नी दोघेही व्यवसायाने डॉक्टर. जब्बार बालरोगतज्ञ, तर पत्नी मणी स्त्र्ााrरोगतज्ञ़ व्यवसायात जम बसवणे आणि साहित्य, नाटय़ कला या क्षेत्राची आवड जोपासणे यात जब्बार यांनी लीलया मेळ साधला. असेच एकदा जब्बार यांना चित्रकलेचे शिक्षक असणारे वात्रटिकाकार रामदास फुटाणे भेटले आणि या भेटीत फुटाणे यांनी ‘सामना’ चित्रपटाची पटकथा ऐकवली. 1974 साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘सामना’ हा चित्रपट गाजला व याच निमित्ताने पटेल यांची चित्रपटसृष्टीकडे वाटचाल सुरू झाली. त्यानंतर सिंहासन, उंबरठा, गो.नी. दांडेकर यांच्या कथेवर आधारित जैत रे जैत, मुक्ता, पु.ल. देशपांडे लिखित एक होता विदूषक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पथिक, मुसाफीर असे चित्रपट आले. नाटय़ चित्रपटांच्या दिग्दर्शन प्रवासानंतर पटेल यांनी अनेक लघुपटांचे दिग्दर्शनही केले. इंडियन थिएटर, कुसुमाग्रज, मी एस.एम., लक्ष्मणराव जोशी, कुमार गंधर्व (हंस अकेला) अशी नावे सांगता येतील. त्यांनी स्थापन केलेल्या थिएटर अकॅडमी या संस्थेच्या माध्यमातून प्रायोगिक नाटकांसाठी भरीव काम केले. या तिन्हीही क्षेत्रांतील योगदानाचा सन्मान म्हणून 2014 साली त्यांचा विष्णुदास भावे पदकाने सन्मान झाला. पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव प्राप्त झाला आणि महत्त्वाचे म्हणजे दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

आपली प्रतिक्रिया द्या