
>> दिलीप जोशी
या वर्षाच्या सुरुवातीला खूप दूरचे खूप सुहृद भेटले. कोणी परदेशात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, कोणी नोकरीनिमित्त तिथेच ‘सेटल’ झालेले अशी विविध देशांत वसलेली मंडळी आठवणीने भेटायला आली. त्यातल्या काही जणांचा तर 15-20 वर्षांचा काळ तिकडे गेलेला आहे. केव्हातरी फोनवर बोलणं होतं, त्यांची खबरबात समजते. तरीसुद्धा इथे आल्यावर त्यांची प्रत्यक्ष भेट अधिक सुखावून जाते. दूरध्वनी, दृश्य ध्वनी वगैरे सोयी उत्तम आहेतच. घरातलं कोणी बाहेरगावी किंवा परदेशी गेलं तर व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून संपर्क साधताना तिथलं वातावरणही ‘दिसतं’. परवा एक मित्र अमेरिकेहून आला. आमच्या खगोल संस्थेत सुमारे तीस वर्षांहून एकत्र काम केलं. त्याच्याकडे त्यावेळी असलेल्या व्हीएचएस कॅमेऱ्यावर ‘लोणार’ सरोवराचं चित्रीकरणही केलं होतं. या सगळ्या आठवणी क्षणात जाग्या झाल्या. मुख्य म्हणजे आपण बऱ्याच काळाने भेटत आहोत असं वाटलंच नाही. कालपरवाच भेल्यासारख्या गप्पा रंगल्या. एक विद्यार्थी, जो आता मध्यमवयीन संसारी ‘गृहस्थ’ झालाय तो असाच 12-13 वर्षांनी भेटला. मधल्या काळात तर त्याचा संपर्कही नव्हता, पण प्रत्यक्ष भेटल्यावर त्याच्या नजरेत जो उत्साह दाटून आला तो कमालीचा होता. सगळ्या मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटल्यावर चेहऱ्यातले बदल जाणवत होते. मग काही जुने फोटो बघितले. हायकिंग-ट्रेकिंगचे, खगोल कार्यक्रमातले वगैरे आणि पुन्हा तो काळ क्षणकाल का होईना, परतल्यासारखं वाटलं.
मग त्याने तिकडचे अनुभव सांगितले. आपण चांगलेच रुळलोय तरीसुद्धा तुम्हा सर्वांना ‘मिस करतो’ असं भावुक होऊन म्हणाला. एखाद्या जंक्शनवर दोन प्रवाशांची भेट व्हावी तसंच वाटत होतं. तासा-दोन तासांच्या गप्पांनंतर सारे पुन्हा आपापल्या मार्गाने जाणार होते. परत भेट कधी ते निश्चित नव्हतं. खरं तर दूरच्या अनेकांची फोनभेट वारंवार होतच असते. काही जण तर रोजच्या संपर्कात असतात. त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी सारे जाणतात. तरीही ‘प्रत्यक्ष’ भेट झाल्यावर अधिक आनंद का होतो? कारण आपण माणसं आहोत. समाजशील प्राणी आहोत. गॅझेटचा कितीही वापर केला तरी आपली मनं यांत्रिक होत नाहीत. त्यामुळे यांत्रिक संपर्क ही उत्तम सोय असली तरी प्रत्यक्ष भेट झाल्याने खूप बरं वाटतं. रोज व्हिडीओ फोनवर बोलणं दिसत असलं तरी प्रत्यक्ष भेटणं ‘पोचतं’ तितकं ते शक्य नाही. अशा भेटी जगाच्या विविध भागांतले किंवा अगदी आपल्याकडच्या गावातलेसुद्धा वेगळे अनुभव समोर आणतात. एका विद्यार्थ्याने अमेरिकेतल्या मराठी शाळेत चांगलं काम केलं. ते फोनवरून कळलं होतंच, पण प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा त्यामागची कळकळ समजली. असंच शैक्षणिक काम पंचवीस वर्षांपूर्वी अमेरिकेत केलेल्या एका दांपत्याची मुलाखत घेतली होती असं सांगितल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. त्या दांपत्याचा पुतण्याही माझा मित्र. परवाच्या भेटीत त्यांचा तेव्हाचा फोटो त्याला दिला. आता खरं तर ‘स्कॅन’ करून पाठवलेले फोटो क्षणात बघता येतात, पण तो जुना फिल्मवर घेतलेला रंगीत फोटो आणि त्याची ‘प्रिंट’ यात काही वेगळेपण होतं. तो नुसता फोटो नव्हता. त्याबरोबर अनेक आठवणींचा गोफ विणला गेला. त्या काळात काका तिकडे कसे गेले, तेव्हा ‘पत्र’ हाच एक संदेशवहनाचा मार्ग कसा होता या गोष्टींची उजळणी झाली.
प्रत्यक्ष भेटीत सूर लवकर जुळतात. मग कालच्या, आजच्या, उद्याच्या अशा अनेक गोष्टींवर गप्पा होतात. संभाषण ‘कट’ होण्याची किंवा करण्याची घाई नसते. कामाचा धबडगा नसलेला निवांतपणा असतो. त्यातून एक जाणीव होते की, आपण सारे दूरदूर राहत असलो तरी जवळच आहोत. अन्यथा अनेकदा माणसं जवळ असूनही दुरावलेली असतात त्याचं काय! ‘ग्लोबलायझेशन’ने आज जग जवळ आणलंय. त्यामुळे दूरस्थ सुहृद त्यांच्या सुट्टीच्या काळात दरवर्षी नेमाने भेटतात. स्थलांतरित पक्ष्यांसारखे ठरावीक मोसामात येतात आणि आनंद देतात, परंतु कित्येक वेळा जवळचीच माणसं प्रत्यक्ष भेटत नाहीत. बालपणीच्या, तरुणपणीच्या मित्रमंडळींची भेट क्वचितच होते. एकेका टप्प्यावर आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्या की, जवळ राहूनही वर्षवर्षात भेटणं होत नाही. बरं, खूपच जवळ राहत असलेल्यांना फोनही करण्याची वेळ येत नाही. ‘‘इथेच तर आहोत, भेटू केव्हाही किंवा केव्हातरी’’ असं वाटतं, पण घडत काहीच नाही.
गेल्या महिन्यात आम्ही जवळचे काही मित्र असेच भेटलो. खूप गप्पा रंगल्या. आयुष्याने दाखवलेले विविध रंग सामोरे आले. काही वेळा खदखदून हसू आलं तर काही वेळा डोळे पाणावले, पण मनं मात्र पिसासारखी हलकी झाली. या जगात आपण ‘एकटे’ नाहीत या भावनेने सर्वांनाच बरं वाटलं. आमच्या गप्पा सुरू असताना एक तरुण विद्यार्थी आला. ‘‘हे तुमचे जुने मित्र ना?’’ त्याने सहज विचारलं. सारे हसले. ‘‘मित्र जुने आहोत, पण मैत्री ताजी तरुण आहे’’ आमच्यापैकी एकाने समर्पक उत्तर दिलं. ‘‘हो, एवढय़ा वर्षांत मुरलेली मैत्री आहे. त्यामुळे अधिक चविष्ट.’’ मग तोही थोडा वेळ गप्पांत सामील झाला आणि जाता जाता म्हणाला, ‘‘सर, आमच्या वयाची तरुण मंडळीही आता क्वचित भेटतात. कामाचं स्वरूप, वेळ यातून जमतच नाही. फोन असतोच, पण प्रत्यक्ष भेट होत नाही. आता मीच ठरवतो एक दिवस आणि सर्वांना बोलावतो’’… आणि पंधरा दिवसांतच त्याने आपण असं ‘गेटटुगेदर’ केल्याचं कळवलं. सोय म्हणून फोन संपर्क आता टाळता येणारच नाही. त्याचे फायदे आहेतच, पण आसपास माणसं असताना निवांत वेळीही त्यातच वेळ घालवण्यापेक्षा चार शब्द बोलावेत. बरं वाटतं. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असेलही, पण प्रत्यक्ष ते प्रत्यक्षच. त्यातला जिव्हाळा आणि ओढ ‘यांत्रिक’ कशी होणार?





























































