
>> अॅड. सतीश देशपांडे
मोदी सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नुकताच वंगबंधू शेख मुजिबूर रहेमान यांना 2020 चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर केला. दक्षिण आशियाचा भूगोल बदलणारे अशी जरी त्यांची ख्याती असली तरी 16 ऑगस्ट 1947 रोजी बंगाल प्रांतात जो रक्तपात झाला त्यात मुजिबूर यांचा सहभाग होता हा इतिहास नाकारता येत नाही. या कोलकाता किलिंग्स हत्याकांडाचे शिंतोडे मुजिबूर यांच्यावरदेखील उडालेले आहेत. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून बंगालचा मित्र हा ’किताब’ मिरवणाऱया मुजिबूर रहेमान यांना हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱया मोदी सरकारकडून हा पुरस्कार जाहीर झाल्याने बंगालसाहित देशभरातील हिंदूंना जबर धक्का बसला आहे.
मोदी सरकारने नुकतेच ‘वंगबंधू’ शेख मुजिबूर रहेमान यांना 2020 चा गांधी शांतता पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हे वाचून फारच आश्चर्याचा धक्का बसला. शेख मुजिबूर रहेमान यांना गांधी शांतता पुरस्कार कशासाठी दिला जात आहे हे मात्र मोठेच गूढ आहे. यासाठी इतिहासाचा थोडा मागोवा घेतला पाहिजे. सन 1920 मध्ये बंगाल प्रांतात एका सामान्य कुटुंबात जन्मलेले मुजिबूर रहेमान हे सन 1943 मध्ये सुरुवातीस काही काळ मुस्लिम नॅशनल गार्ड व मुस्लिम लीगचे अतिशय सक्रिय सदस्य होते. बंगाल प्रांतामध्ये मुस्लिम लीगचे सर्वेसर्वा सुऱहावर्दी यांचे ते घनिष्ठ सहकारी होते. मुस्लिम लीगचाच भाग म्हणजे मुस्लिम नॅशनल गार्ड होते व 16 ऑगस्ट 1946 रोजी देश विभाजनसाठी मुस्लिम लीगचे सर्वोच्च नेता जीना यांनी प्रत्यक्ष कृती दिवस (direct action day) पाळण्याचे आव्हान केले. त्यानंतर लागलीच डॉ. सुऱहावर्दी हे संयुक्त बंगालचे मुस्लिम लीगचे मुख्यमंत्री होते व त्यांनी एका भाषणामध्ये डायरेक्ट अॅक्शन आणि देश विभाजन यामध्ये पोलीस अथवा लष्कर यांचा काहीच संबंध असणार नाही असे जाहीररित्या सांगितले व दंगेखोराचे मनोधैर्य उंचावले. इतकेच नाही तर सुऱहावर्दी यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी (प्रत्यक्ष प्रति दिवस) या दिवशी बंगाल पोलीस यांना सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली व तत्कालीन ब्रिटिश बंगालचे गव्हर्नर फेडरिक बरोज हेदेखील सुऱहावर्दी यांना सर्व सहकार्य करत होते. शेख मुजिबूर रहेमान हे सुऱहावर्दी यांचे अत्यंत निकटचे सहकारी असल्यामुळे आणि मुस्लिम नॅशनल गार्डचे सदस्य असल्यामुळे या दिवशी झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडामध्ये त्यांचादेखील पूर्ण सहभाग होताच. यावेळी झालेले हिंदूंचे हत्याकांड इतिहासामध्ये ‘कलकत्ता किलिंग्स’ म्हणून प्रसिद्ध आहे. वरील हिंदूंचे हत्याकांड तत्कालीन बंगालमधील मुस्लिम लीग सरकार तसेच ब्रिटिश सरकार यांच्या आशीर्वादाने झालेले होते व यामध्ये मुजिबूर रहेमान यांचाही सहभाग होता. पुढे जेव्हा हिंदूंनी प्रतिकार सुरू केला त्यावेळी हिंदू नेते महोपाध्याय यांना प्रतिकार थांबवण्याची मुस्लिम लीगतर्फे विनंती करण्यासाठी मुजिबूर रहेमान यांनाच पाठविले होते. हा सर्व इतिहास उपलब्ध असून आजही बंगाल अथवा देशभरात याची जाण सर्वांनाच आहे. मुजिबूर रहेमान हे देश विभाजनाचे समर्थक होते व पुढे ते पाकिस्तानात राहिले. नंतर ते पाकिस्तान विभाजन करून बांगलादेशची निर्मिती करणारे नेते आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले गेले. मुजिबूर रहेमान यांना ‘वंगबंधू’ म्हणूनदेखील ओळखले जाते आणि याचा अर्थ ‘बंगालचा मित्र’ असा आहे. वंगबंधुत्वमध्ये कदाचित हिंदू अभिप्रेत नसावेत असे वाटते.
बांगलादेश निर्मितीनंतरदेखील मुजीबूर यांनी सर्व लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आवश्यक त्या दुरुस्त्या करत सर्व सत्ता हुकूमशाहीप्रमाणे चालविण्याचा प्रयत्न केला व शेवटी त्यातूनच 1975 मध्ये त्यांची हत्या झाली.
‘गांधी शांतता पुरस्कार’ देण्यापूर्वी मोदी सरकारने कोणत्या वास्तवतेचा विचार केला हे मात्र कळत नाही. हा पुरस्कार दिल्यामुळे बंगालसहित देशभरातील हिंदूंच्या भावनांना मात्र जबर धक्का बसला आहे एवढे मात्र खरे.
deshpandesatish238&gmail.com



























































