
>> भालचंद्र मगदूम
हॉकी हा आपला अस्सल हिंदुस्थानी खेळ. या खेळाच्या जोरावर एकेकाळी हिंदुस्थानने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवलं. मेजर ध्यानचंदसारख्या जादूगारापासून ते धनराज पिल्लेपर्यंतच्या अनेक हॉकी खेळाडूंनी या खेळातील सुवर्णयुग दाखविले. तरुणवर्गात हॉकीविषयीची ओढ कमी असली तरी या खेळातील काही हिरे आजही देशाचं नाव उंचावत आहेत. या खेळात सातत्य राखत विश्वविजय मिळवण्याचं स्वप्न बघणारी एक हॉकी खेळाडू म्हणजे विशाखा धुरी. जाणून घेऊया तिचा या खेळातील प्रवास.
दारिद्रय़ पाचवीलाच पुजलेलं, पण आपल्या एकुलत्या एक ‘लेकी’नं चांगल्या शाळेत शिकावं म्हणून पालकांनी ‘ति’ला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं, मात्र तिथं फक्त ‘हॉकी’ हाच हिंदुस्थानी खेळ. या खेळाची स्टीक हातात आली अन् तोच खेळ ‘ति’चं ध्येय बनलं… मग काय, गरिबी आणि परिस्थितीशी संघर्ष करत ‘ती’ पुढे पुढे धावत राहिली. एक-एक स्पर्धा जिंकत हा ‘तारा’ हॉकीच्या क्षितिजावर चमचमतोय..!
या ताऱयाचं नाव आहे विशाखा अरुण धुरी. धुरी कुटुंबीय मूळचे कोकणातले, वारी वरावडेचे (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग). तिथं त्यांचं घर आहे, पण राहत कुणीच नाहीत. इतर चाकरमान्यांप्रमाणेच पोट भरण्यासाठी धुरी कुटुंबीय ‘जिवाच्या मुंबईत’ दाखल झाले. अरुण आणि कल्पना या धुरी दांपत्याला एकच कन्यारत्न, ते म्हणजे विशाखा. कल्पना गृहिणी आहे तर अरुण दिवसभर बांधकाम व्यावसायिकाकडे प्लंबिंगचे आणि रात्री वॉचमन म्हणून काम करतात. मुंबईत आल्यापासून हे दांपत्य विशाखासोबत भाडय़ाच्या खोलीतच राहतात. वांद्रे येथे राहत असताना तिथल्याच डुरोल्हो कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये विशाखा शिक्षणाचे धडे गिरवायला लागली. या शाळेत ‘हॉकी’ हाच एकमेव खेळ होता. तिथंच चौथीला असताना तिच्या हाती पहिल्यांदा हॉकीची स्टीक आली.
इग्निशिएस डिसुझासारखा प्रशिक्षकाने तिच्यातील ‘स्पार्क’ शोधला अन् तिलाही आयुष्याचं ध्येय सापडले. पुढे बारावीचे शिक्षण होईपर्यंत विशाखाने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हॉकीचे धडे गिरविले. इयत्ता आठवीला गेल्यापासून त्यांचे बिऱहाड लोअर परळच्या ‘पारडीवाला’ या बैठय़ा चाळीत राहायला आले. सार्वजनिक शौचालयाशेजारी असलेल्या आठ बाय पाचच्या खोलीत त्यांनी संसार थाटला पण विशाखाची खेळाची हौस आणि आवड काही कमी झाली नाही. लोअर परळहून विशाखा वांद्रे येथे शाळेला जायची. तिथे जाऊन प्रॅक्टिस करायची. तिची जिद्द पाहून प्रशिक्षक डिसुझा यांनी तिला आपल्या टीमसोबत ठेवले. इग्निशिएस डिसुझांच्या नंतर तनाज मोहम्मद, कॉन रॉय या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तावूनसुलाखून निघालेल्या विशाखाने आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या आहेत, तर दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत ती चमकली आहे.
टीममध्ये ‘सेंटर फॉरवर्ड लेफ्ट आऊटर’ या ठिकाणी खेळणाऱया विशाखाने मुंबईतील विविध हॉकी क्लबकडूनदेखील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला असून त्यासाठी अनेक बक्षिसे तिला मिळालेली आहेत. हॉकीसोबत कॉलेजच्या आवश्यकतेनुसार ती फुटबॉल पण खेळते. तिथं ती ‘फुलबॅक’ या ठिकाणावरून आपला खेळ दाखविते. मात्र हॉकी हेच तिचं पहिलं स्वप्न आहे. अस्सल हिंदुस्थानी असलेल्या या खेळाच्या जोरावर एकेकाळी हिंदुस्थानने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवलं. मेजर ध्यानचंदसारख्या जादूगारापासून ते धनराज पिल्लेपर्यंतच्या अनेक खेळाडूंनी देशातील प्रत्येक माणसाला सुवर्णयुग दाखविले तो ‘विश्वविजय’ विशाखाला पुन्हा मिळवायचा आहे. हिंदुस्थानी हॉकी संघाचा माजी कर्णधार पुण्याचा धनराज पिल्ले आणि युवराज वाल्मीकी हे हॉकीतील आयडॉल असणाऱया विशाखाला एअर होस्टेस व्हायचे आहे मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीअभावी ते अशक्य आहे. वडिलांचे तुटपुंजे उत्पन्न, गृहिणी असलेली आई अन् छोटीशी भाडय़ाची खेली यामुळे तिची ‘गगनभरारी’ थांबेल याची भीती तिच्या कुटुंबीयांना वाटते. मुंबईच्या बैठय़ा चाळीत ‘अंगडाई’सुद्धा घेता येणार नाही अशा आठ बाय पाचच्या खोलीत हा ‘तारा’ झाकोळून जाईल, तिच्या हॉकीची स्टीक अडगळीत पडेल अन् कोंदणाविनाच हा ‘हिरा’ मातीत गाडला जाईल याचीच धास्ती त्यांनी घेतलीय. सध्या ती वांद्रे येथील श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदानी (एमएमके कॉलेज) महाविद्यालयात बी. कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. कुणाच्याही मदतीशिवाय हॉकीत आपली कारकीर्द करणाऱया विशाखाला एखाद्या खेळाच्या प्रायोजक कंपनीची किंवा राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे. तरच ही पोर आपल्या देशाचे नाव हॉकीमध्ये उंचावू शकते अन् हॉकीतील ‘विशाखा’ गरीब घरातूनही घडू शकते.




























































