आशेचे दीप, तेवू द्या मनी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रार्थना बेहरे, अभिनेत्री

दिवाळी म्हटलं की चमचमीत फराळ, दिव्यांच्या रोषणाईनं उजळलेला परिसर, रांगोळ्यांनी दारोदारी केलेली सजावट, पारंपरिक आकाश कंदिलांचा राजेशाही थाट, नातेवाईकांच्या गाठीभेटी असं चित्र डोळ्यापुढं उभ राहतं. कोरोनामुळे अर्थातच यंदाच्या दिवाळीचं स्वरूप काहीसं वेगळं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात हा सण आपल्या आयुष्यात आनंद घेऊन आलाय आणि तो आपल्याला खूप सारा आनंद देऊन जाणार आहे. त्यामुळं आपणही नकारात्मक विचार बाजूला सारून या सणाचं आनंदानं स्वागत करूया.

यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. योगायोगाने दिवाळीच्या दिवशी आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असल्यानं यंदा सेलिब्रेशनचा डबल धमाका असणार आहे. दरवर्षी अॅनिव्हर्सरीला आम्ही परदेशात ट्रीपला जातो. यंदा आम्ही हा प्लॅन रद्द करून कुटुंबीयांसोबत एकत्र दिवाळी साजरा करण्याचं ठरवलंय. दिवाळीनिमित्त फ्लॅशबॅकमध्ये रमायला सगळ्यांनाच आवडतं. बालपणीच्या दिवाळीची बात काही औरच असते. दिवाळीच्या सुट्टीत आजीच्या घरी आम्ही सर्व भावंड एकत्र यायचो. भावाला उटणं लावून आंघोळ घालणे, एकत्र फराळाचा बेत, विविध खेळ खेळणे अशी सगळी धम्माल असायची. छोट्या छोट्या गोष्टींतूनही खूप आनंद मिळायचा. मोठं झाल्यावर आपल्यावरच्या जबाबदाऱ्यामुळे बालपणीसारखी दिवाळी आपण साजरी करू शकत नाही. तरीही या सणाचं दरवर्षी मी उत्साहाने स्वागत करते.

सध्या घराघरात खमंग फराळाची लगबग सुरूय. मला फराळ बनवता येत नाही. माझ्या मामीने तयार केलेला चिवडा मला खूप आवडतो. यंदा सासूबाई माझ्यासाठी चिवडा तयार करणार आहेत. घरातल्या सजावटीची सगळी जबाबदारी मी उचललीय. लंडनवरून येताना मी काही कॅण्डल घेऊन आलेय. दिवे, कॅण्डल आणि लायटिंग सिरीजची सांगड घालून सजावट करण्याचं माझं प्लॅनिंग आहे. कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी होतेय तरीही आपण काळजी घ्यायला हवी. शॉपिंगसाठी बाहेर पडताना गर्दीच्या वेळा टाळल्या पाहिजे. फॅमिली गेट टुगेदर यंदा रद्द केलं पाहिजे. मीदेखील सर्वांना व्हिडिओ कॉलिंगवरून शुभेच्छा देणार आहे. येत्या काही महिन्यांत आपल्या जीवनातून कोरोनारूपी अंध:कार कायमचा दूर होईल, असे आशेचे दीप यानिमित्ताने मनात तेवत ठेवूया. आरोग्यदायी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा.