
>>प्रशांत गौतम
‘ए भाय, जरा देखके चलो’, ‘जीना यहाँ मरना यहाँ’ यांसारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे गीतकार, प्रख्यात कवी पद्मभूषण गोपालदास नीरज यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक तारा अस्ताला गेला आहे. नीरज यांनी चित्रपटांसाठी शंभरहून अधिक गीतांचे बहारदार लेखन केले. गीतलेखनासोबतच उत्तम कवितांचीही निर्मिती केली. अनेक हिंदी कविसंमेलनांत व्यासपीठावरूनही नीरज यांनी दर्जेदार, अभिजात कवितांचे सादरीकरण केले. हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन केलेली कविता वेगळी, कवितासंग्रहामधील कविता वेगळी आणि व्यासपीठावरून सादर केली जाणारी कविता वेगळी असल्याने त्यांचा वाचक आणि चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात होता. तिन्ही माध्यमांतले लेखन वेगळे असले तरी त्यांची नाळ कायम अभिजात दर्जाशीच निगडित होती. आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात खडतर झाली, त्यात गरिबी, बेकारी यांचीही भर पडली. आयुष्यभराच्या प्रवासात जे दुःख त्यांच्या वाट्याला आले, जी वेदना वाट्याला आली तीच त्यांनी आपल्या काव्यलेखनात व्यक्त केली.
उत्तर प्रदेशातील इटवा जिल्ह्यात पुरवली गावात ४ जानेवारी १९२५ साली त्यांचा जन्म झाला. बालपणातच आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात कष्टप्रद झाली. सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. १९४२ च्या सुमारास कष्ट, अभ्यास, मेहनत या बलस्थानावर त्यांनी दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्यापुढील काळात इटवा या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी सरकारी कार्यालयात टायपिस्टची नोकरी लागली. सिनेमागृहाच्या दुकानावरही काम केले. १९५१ साली बी.ए. आणि हिंदी साहित्याची प्रथमश्रेणी संपादन केली. मेरठ येथे हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी प्राध्यापकी सोडली. पुढील काळात अनेक हिंदी चित्रपटांचे बहारदार गीतलेखन कवी नीरज यांनी केले, जी गाणी आजही सिनेरसिकांच्या ओठावर सदैव असतात.
फुलों के रंगसे (पुजारी), लिखे जो खत तुझे तेरी यादमें (कन्यादान), खिलते है गुल यहाँ खिलके बिखडने को (शर्मिली), शोखियों में घोला जाय, फुलों का शबाब (प्रेम पुजारी), रंगीला रे मेरे रंग में (प्रेम पुजारी), दिल आज शायर है, गम आज नगमा है, शब ये गझल हौ ये सनम (गॅम्बलर), ए मैने कसम, तुने कसम ली (मेरे सपने), कैसे कहे हम, प्यार के गम को क्या क्या खेल दिखाले (शर्मिली), बस यही अपराध है हर बाद करता हूँ । आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ (पहेचान) ही गाणी खूप गाजली, लोकप्रिय झाली. ‘मेरा नाम जोकर’ हा असाच एक सुपरहिट चित्रपट. त्यातील ए भाय, जरा देख के चलो, जीना यहाँ मरना यहाँ ही नीरज यांचे गीतलेखन सुपरडुपर झाले. एवढेच कशाला नीरज यांच्या आर. के.मधील दमदार प्रवासाची सुरुवात याच चित्रपटाने झाली.
राज कपूर यांनी नीरज यांना लोणी काळभोर येथील राजबागेत बोलावले होते. राज कपूर रात्री उशिरापर्यंत जागणारे, सकाळी उशिरा उठणारे होते. एके दिवशी राज कपूर यांनी नीरज यांना पहाटे चार वाजताच उठवले. राजबागेत चक्कर मारत नीरज यांच्यासोबत गाण्याची चर्चा सुरू केली. नीरज घाबरले. शेतात भरपूर साप असल्याचे त्यांना कळले होते. या भीतीने, चर्चेने त्यांचे लक्ष नव्हते. राज कपूर यांना नीरज यांची अडचण समजली. परत बंगल्यावर आले तेव्हा या प्रसंगात सुचलेले गाणे ‘ए भाय जरा देखके चलो’ हे होते. इंदूर येथील एका कविसंमेलनप्रसंगी कवी नीरज यांनी आपल्या आयुष्याचा खडतर प्रवास उलगडून सांगितला होता. ते म्हणत ‘‘गंगाकिनारी आमचे घर होते, घरी खूप दारिद्र्य होते. लोक गंगेच्या पाण्यात चिल्लर नाणी टाकायचे. आम्ही भावंडं ते जमा करीत. घरी त्या पैशातून आम्हाला अन्न, पाणी मिळत असे. एकवेळेची भूक भागात असे.’’ अनुवादाच्या माध्यमातून त्यांची कविता जगभरात पोहचली. हिंदीतील प्रख्यात कवी भदन्त आनंद कौसल्यायन त्यांना हिंदी साहित्यातील अश्वघोष मानतात, तर कवी दिनकर त्यांचा उल्लेख ‘हिंदी साहित्यातील वीणा’ असा करतात. ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ हे दोन महत्त्वाचे नागरी सन्मान प्राप्त झाले. त्यांच्या निधनाने गीतलेखन आणि अभिजात कविता परंपरेतील दुवा निखळला आहे.































































