लेख – आभाळमाया – अवकाशातील लपंडाव

>> वैश्विक 

परवा म्हणजे 17 तारखेच्या संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत चंद्र आणि मंगळ यांचं पिधान (ऑकल्टेशन) पाहायला मिळेल. सध्याच्या कोविड काळात घराबाहेर जाऊन समूहाने या विधानाचं निरीक्षण करणं अशक्यच, परंतु ज्यांना आपल्या घराच्या खिडकीतून 17 एप्रिल रोजी सायंकाळी पश्चिमेकडे उगवलेला पंचमीचा चंद्र पाहता आला, तर मंगळ ग्रहाला घडविलेले पिधान अनुभवता येईल.

अवकाशातील एका वस्तूने दुसऱया वस्तूसमोरून जाताना प्रेक्षकाच्या दृष्टीने मागची वस्तू पूर्णपणे झाली तर त्याला  पिधान असे म्हणतात. चंद्र ग्रहाला, ताऱयांना पिधान घडवतोच, पण काही लघुग्रह आणि खुजे ग्रहसुद्धा दूरस्थ वस्तूंना पिधान घडवू शकतात. खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱयांना असं पिधान म्हणजे एक महत्त्वाची घटना वाटते. दुर्बीण असेल तर पिधान अधिक स्पष्ट दिसतं आणि जमलं तर त्याचे फोटोही घेता येतात.

गेले अनेक महिने मंगळ संध्याकाळच्या आकाशात स्पष्ट दिसतोच. तसे शनी-गुरूही नुसत्या डोळय़ांनी छान दिसतात. या तीन ठसठशीत ग्रहांपैकी मंगळासमोरून पंचमीला चंद्र सरकणार आहे. त्यामुळे चंद्रकोरीच्या विरुद्ध वरच्या बाजूने मंगळ ग्रह झाकला जाईल आणि साडेसातच्या सुमारास चंद्रकोरीच्या खालच्या बाजूने प्रकटताना दिसेल. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास चंद्राच्या अप्रकाशित गोलाच्या जवळ असलेला मंगळ बघता बघता चंद्रबिंबाआड दडेल. मात्र चंद्राचा भ्रमणवेग जास्त असल्याने काही काळाने त्याच्या प्रकाशित भागापासून (कोर) लालसर मंगळ पुन्हा दिसू लागेल तेव्हा खगोली छायाचित्रण करणाऱयांना आनंद वाटेल. 21 डिसेंबर 2020 रोजी गुरू आणि शनी ग्रह परस्परांच्या अतिनिकट आले होते. अशी घटना सुमारे 400 वर्षांनी घडत असल्याने आम्ही दुर्बिणीतून हे ग्रह किती जवळ आलेत ते पाहू शकतो. नुसत्या डोळय़ांनी मात्र एकटा गुरूच दिसत होता.

यावेळीही ज्यांच्याकडे दुर्बीण आहे, त्यांना योग्य फिल्टर वापरून मंगळाचं चंद्राच्या अप्रकाशित भागामागे लुप्त होणं सहज पाहायला मिळेल, पण पिधान संपल्यावर नुसत्या डोळय़ांनी चंद्रकोरीजवळचा मंगळ सहज बघता येईल.

जेव्हा एखादी अवकाशस्थ वस्तू दुसऱया वस्तूला काही काळासाठी पूर्णपणे ‘अदृश्य’ करते ते पिधान. यामधली एखादी वस्तू चंद्रासारखी मोठी असेल, तर एरवी चंद्राच्या कैक पट मोठे असलेले, परंतु दूरस्थ अंतरामुळे लहान भासणारे ग्रह चंद्राआड दडतात. आता चंद्र आणि मंगळाच्या पिधानाविषयी हे लक्षात घेतलं पाहिजे की, चंद्र पृथ्वीपासून अवघ्या 3 लाख 94 हजार किलोमीटर अंतरावर आहे, तर मंगळ त्याच्या कक्षाभ्रमणानुसार कधी पाच तर कधी सात कोटी किलोमीटर अंतरावर असतो.

गेले काही महिने मंगळ पृथ्वीच्या जवळ आल्याने तो तांबूस टिकलीसारखा दिसतोय. 17 तारखेला तो चंद्रकोरीआड जाईल ते पाहणे मनोरंजक असेल. काही वेळा तर गुरू आणि शुक्रासारखे तेजस्वी ग्रह एका रेषेत आणि चंद्राची बारीक कोर त्यांच्या खाली दिसून त्याला अवकाशस्थ ‘स्मायली’चं स्वरूप येतं. अर्थात हे ग्रह आणि चंद्र परस्परांपासून कोटय़वधी किलोमीटर दूरच असतात, परंतु ते एका प्रतलात असल्यासारखे भासतात.

तर परवाची घटना पिधानाची असेल. यापूर्वीचं मंगळ-चंद्र पिधान 10 मे 2008 रोजी घडलं होतं. काही वेळा आपल्या सूर्यमालेतील ग्रह खूप दूरच्या ताऱयांना असंच दडवतात. त्यावेळी या ताऱयांचा अभ्यास करणाऱयांना चांगली संधी असते. मात्र हे पाहण्यासाठी शक्तिशाली दुर्बिण हवी. जी अवकाशस्थ वस्तू दुसऱया वस्तूला पिधान घडवते ती प्रेक्षक आणि पलीकडच्या वस्तूच्या मध्ये यायला पाहिजे. शिवाय ती दूरची वस्तूही नुसत्या डोळय़ांनी स्पष्ट दिसणारी असणं गरजेचं. तरच सर्वसामान्यांना पिधान दुर्बिणीविना अनुभवता येतं.

परवाचं पिधान त्यादृष्टीने उत्तम योग म्हणावा लागेल. ते आणखी थोडा अंधार पडण्याच्या वेळेत घडलं असतं तर मंगळ दोन्ही वेळा आपण चांगला पाहू शकलो असतो, परंतु पिधान सुटताना मंगळ चंद्रकोरीआडून प्रकटताना पाहणंही महत्त्वाचं. त्यावेळी आकाशात ढग नसले म्हणजे झालं. नाहीतर अशा कितीतरी खगोलीय घटना ढगाआड जातात. खगोल मंडळाचे सचिव डॉ. अभय देशपांडे यांनी या पिधानाचं वैशिष्टय़ सांगताना म्हटलं, ‘‘अशा पिधानातून सर्वसामान्यांना एका उत्तम खगोलीय घटनेच्या निरीक्षणाचा आनंद आणि अभ्यासकांना यातून मंगळाचा व्यास, त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर जाणून घेता येते.’’ यावेळचं हे पिधान सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी पश्चिमेला पाहिल्यास साडेपाचला मंगळ चंद्रामागे जाऊन 7 वाजून 19 मिनिटांनी पुन्हा चंद्राच्या प्रकाशित बाजूने बाहेर येईल. शक्य झाल्यास हे दृश्य (घरातूनच) जरूर पाहण्याचा प्रयत्न करूया.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या