मुद्दा : चाळ संस्कृती, झोपडपट्टी आणि पुनर्विकास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजन वसंत देसाई

काही दिवसांपूर्वी फ्रेंच महिला आर्किटेक्ट फेरोन फिलिप्स यांनी मुंबईच्या चाळ व झोपडपट्टी विकासावर रेखाटने काढली. एक परदेशी विद्यार्थिनी या विषयावर पीएचडी मिळवते हा कौतुकाचा भाग असला तरी त्यांनी चाळ व झोपडपट्टी या दोन वेगळ्या विषयांची सरमिसळ करून गल्लत करू नये. परदेशी पाहुणे मुंबईत आले की झोपडपट्ट्या, त्यातील बकालपणा, रस्त्यावर – उघड्यावर पेटलेल्या चुली, भीक मागणारी मुले याचे चित्रण करायला विसरत नाहीत. अशाच चित्रांमधून अनेक चित्रकार वाहवा मिळवतात व त्यातून पैसे कमवतात. मात्र त्यातून हिंदुस्थानचे एक विकृत चित्रण जगासमोर येते. यातील काही भाग खरा जरी असला तरी त्यामागचे अर्धसत्य झाकले जाते. विदेशी पाहुणे (जसे विदेशी फ्लेमिंगो पक्षी काही काळापुरते आपल्या देशात येतात आणि निघून जातात तसे हे पाहुणे) देशाचे, मुंबईचे, विकृतीकरण जगापुढे दाखवतात. या विदारक सत्यामागे दाहकता किती आहे. चाळ नावाची नुसती वस्ती नसून ती संस्कृती कशी आहे, त्याचबरोबर झोपडपट्टी नावाचे बांडगुळ या मुंबई शहराला कसे बकाल करीत आहे, खरा मुंबईकर कोण आणि मुंबईला बकाल करणारा कोण याचा अभ्यासही या विदेशी पाहुण्यांनी करण्याची गरज आहे.

आज जी मुंबई दिसते ती फार नाही, पन्नास ते साठ वर्षांपूर्वी अशी नव्हती. जरी ती सात तुकड्यांनी शिवलेली गोधडी असली तरी ती खूपच आश्वासक होती. मुंबई नगरीस एक नजाकत होती. समुद्रकिनारे होते, मऊ वाळू होती, ट्रामगाडी होती, घोड्यांची बग्गी होती, दुमजली बस होती, सगळे काही होते आणि यात एकमेकांत हात गुंफून मनसोक्त वावरणारी छोट्या छोट्या वाड्यांची आणि वाड्यांमधून गोडीगुलाबीने राहणारी जणू काही एकत्र कुटुंबपद्धतीने नांदणारी चाळ नावाची संस्कृती होती. या चाळीत दीडशे-दोनशे चौरस फुटांच्या खोलीतसुद्धा आठ-दहा माणसे दाटीवाटीने राहायची. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलंच्या ‘बटाट्याच्या चाळी’ने तर पुलंनाच अजरामर केले ते चाळ नावाच्या संस्कृतीने. पण अचानक काय झाले कुणास! एका जादूच्या कांडीने फरक पडावा किंवा फिरता रंगमंच बदलावा इतक्या वेगाने चाळ नावाची संस्कृती लयास जाऊ लागली. शहरे इतक्या झपाट्याने विकसित झाली आणि इलेक्ट्रॉनिक्स युगाने तर माणसे बदलली. दीडशे- दोनशे चौरस फुटांमध्ये राहणारी कुटुंबे वेगळी तर झालीच, उपनगरांमध्ये जाऊन पाचशे- हजार चौरस फुटांचे ब्लॉक घेऊन एकाकी राहू लागली आणि मनानेसुद्धा दुरावली.

मुंबईतील मराठी टक्का वेगाने बाहेर फेकला जात आहे. हे सर्व होताना काळोखाचा फायदा घेऊन यूपी, बिहार, बांगलादेश, केरळ येथील परप्रांतीय हळूहळू मुंबईत पसरले. ते इतक्या झपाट्याने विखुरले की सुंदर मुंबईचे बकालपण येथूनच सुरू झाले. हळूहळू झोपडपट्ट्या इतक्या विस्तारल्या की आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून उपहासले गेले. मुंबईची गणती बकाल शहरांमध्ये होऊ लागली. परप्रांतीयांचे लोंढे मुंबईवर आदळू लागले. वाहने, रहदारी, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, कचरा निर्मूलन हे वेगाने मुंबईच्या अंगावर वाढणारे चट्टे निर्माण झाले. म्हणूनच चाळ नावाच्या खर्‍या संस्कृतीला, जिला एक भावनिक वलय होते, नाते होते, ते संपुष्टात आले आणि झोपडपट्टी नावाच्या विकृत संस्कृतीचा उदय झाला. आता सध्या झोपडपट्टी पुनर्विकास नावाचा अत्यंत भयानक प्रकार चालू आहे. कालांतराने मुंबईच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा हा महत्त्वाचा ठळक विभाग ठरणार आहे. हे भाकीत नसून कटू सत्य आहे. आज आपल्या असे निदर्शनास येते की, झोपडपट्टी पुनर्विकास ही न संपणारी प्रक्रिया आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली अनधिकृत परप्रांतीय झोपडपट्टीधारकांना मुंबईत पक्की घरे दिली जात आहेत. यातून मुंबईत दररोज लोंढे आदळतच आहेत. हे थांबणार कधी? मुंबई कधीच झोपत नाही ही कौतुकाची बाब नसून मोठी मानसिक वेदना आहे, याची जाणीव आपल्याला होणार कधी? टोलेजंग इमारतीत फक्त कुटुंबेच्या कुटुंबे राहतील, पण ती दहशतीखाली, विकृतीच्या भयगंडाने स्वतःला सामावून घेणारी एक फक्त नागरी वस्ती म्हणून. तिथे चाळ नावाची संस्कृती नसेल. फक्त असेल ती मानवी देहांची वस्ती. या वस्तीमध्ये क्रूर कसाबची पिलावळ अनेक ठिकाणी जन्म घेत आहे. ठिकर्‍या उडवेल ती या मानवी देहांच्या… तेव्हा परदेशी पाहुणे त्याचे विकृत चित्रण करतील आणि आपल्या बकालपणाचे प्रदर्शन जगापुढे करतील. भविष्यात हे येणारे दाहक सत्य आहे. वेळीच हे चित्र बदलायला हवे. कॅनव्हास तयार आहे. मुंबईचे चित्रण करणार्‍या परदेशी पाहुण्यांनी चाळ नावाच्या संस्कृतीचा आणि झोपडपट्टी नावाच्या विकृतीचा निःपक्षपणे अभ्यास करावा. चाळ नावाच्या संस्कृतीने मुंबई कशी घडवली आणि परप्रांतीयांनी पसरवलेल्या झोपडपट्टीने कशी बिघडवली हे अधोरेखित करून रंग भरावेत.