आगळं वेगळं- आपलं पाटणा त्यांचं पाटणा

>> मंगल गोगटे

हिंदुस्थानातील पाटणा आणि स्कॉटलंडमधील पाटणा जरी एकमेकांपासून 11 हजार किमी दूर असले तरी इतिहासाने जोडले गेले आहेत. हे नातं घट्ट टिकवण्यासाठी तिथल्या शाळांमध्ये आपल्या पाटण्याबद्दलची माहिती शिकवली जाते. इथली शाळकरी मुलं जर आपल्या देशात आली तर इतर मुलांसारखी त्यांना सर्वप्रथम ताजमहाल नाही, तर पाटणा शहराला भेट द्यायची असते, ज्यावरून त्यांच्या गावाचं नाव ठेवलं आहे.

आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की, पाटणा नावाचं गाव बिहार या राज्यात आहे, पण किती जणांना माहीत आहे की, याच नावाचं एक गाव स्कॉटलंडमध्ये आहे? आपल्यापैकी अनेकांना स्कॉटलंडमधील पाटणा माहीत नसेल, परंतु तिथल्या सगळ्या लोकांना आपलं पाटणा माहीत आहे आणि इथली भाषा हिंदी आहे हेदेखील माहीत आहे. या गावाला पाटणा असं नाव मिळण्याला एक भावनिक कारण आहे.

विल्यम फुलरटन या एका स्कॉटिश सैनिकाने या गावाचं नाव पाटणा ठेवलं. कारण फुलरटन यांचा जन्म (1774) पाटण्याचा आहे, जिथे त्यांच्या वडिलांनी आर्मी ऑफिसर म्हणून ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करताना काही वर्षे काढली. विल्यम स्कॉटलंडमधे परत गेले तेव्हा त्यांनी कोळशाचा व चुन्याच्या दगडाचा उद्योग सुरू केला. या दोन्हींच्या खाणीत काम करणाऱयांसाठी त्यांनी जिथे घरं बांधली (1802), त्या वसाहतीला विल्यम यांनी आपल्या जन्मगावाची आठवण म्हणून पाटणा असं नाव दिलं.

पाटणा हे स्कॉटलंडच्या 32 कौन्सिलपैकी एक आहे. या गावाच्या मधून डून नदी वाहते. 1896 पर्यंत या गावात एक रेल्वे स्टेशन होतं, जे 1964 मधे पाडून टाकण्यात आलं. आता फक्त कोळसा वाहतुकीसाठी तिथली रेल्वेलाइन वापरली जाते. आपलं पाटणा मोठं आहे आणि माणसांनी ते गजबजलेलं आहे. त्याच्या तुलनेत हे स्कॉटलंडचं पाटणा खूप शांत आहे आणि शिवाय भीडभाडही नाही. कारण इथली लोकसंख्या फक्त सुमारे 3000 आहे. गाव तर इतकं छोटं आहे, काही थोडेच रस्ते आहेत इथे आणि तेदेखील थोडं चाललं की संपतात.

पाटणा अयर्शायर परगण्याच्या आग्नेय दिशेला ए 713 यावर डग्लस किल्ल्याच्या जंक्शनपासून कर्कमायकलकडे जाणाऱया रस्त्यावर डालमेलिंग्टनच्या उत्तरेला आहे. ते पोल्नेस्सान आणि वॉटरसाईड या दोन खेडय़ांच्या मध्ये आहे.

इथे काही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, एक लहान वाचनालय, एक फिटनेस हॉल, एक हेल्थ सेंटर, काही दुकानं, एक बेकरी, ‘व्हीटशेफ इन’ नावाचा एक बार, एक गॉल्फ क्लब, चालण्यासाठी अनेक निसर्गरम्य रस्ते आणि एक फुटबॉलचं मैदान आहे. मासे पकडण्यासाठी इथले लोक डून नदीवर जातात. माणसांना व वाहनांना नदी ओलांडण्यासाठी दोन पूल आहेत. यापैकी एक अगदी जुना तर दुसरा अलीकडे बांधलेला आहे.

2018 मध्ये तर स्कॉटलंडच्या या पूर्व अयर्शायर भागातील पाटण्यात ‘बिहार दिवस’ पहिल्यांदाच साजरा केला गेला. हायकमिशनर वाय. के. सिन्हा हे त्या दिवशी अध्यक्ष होते. अनेक हिंदुस्थानी व बिहारी कुटुंबे या समारंभाला उपस्थित होती. याप्रसंगी सिन्हा यांनी आपल्याकडील पाटण्याच्या (प्राचीन शहर पाटलिपुत्र) इतिहासाला उजाळा दिला आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील व आधुनिक विकासातील पाटण्याचं योगदान याबद्दलच्या आठवणी जागृत केल्या. शिक्षणाच्या सर्वात मोठय़ा व सर्वात प्राचीन नालंदा विद्यापीठाचाही उल्लेख केला. सिन्हा यांना दोन्ही पाटण्यातील दुवा भक्कम करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी या दोन्ही जागांना जोडणाऱया दोन संस्थांना – पाटण्याची शाळा आणि तिथलं समुदाय केंद्र  लागेल ती मदत करण्याचं सिन्हा यांनी यावेळी घोषित केलं. या समारंभात त्यांनी एक प्रदर्शन आणि एक पर्यटनस्थळ,  संस्कृती, छटपूजा, तीज इत्यादी सण व खाद्य संस्कृती तसंच गुरू गोविंदसिंग, महावीर, बुद्ध यांचं जीवन याबद्दल दृकश्राव्य सादरीकरण केलं. स्कॉटलंड यथील पाटण्याबद्दलचा इतिहास रॉबर्ट स्टीवन्सन यांनी विशद केला. ही माहिती कळल्यावर तरी आपल्याकडील बिहारी मंडळींना स्कॉटलंडचं नयनरम्य पाटणा पाहावंसं नक्की वाटेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या