ठसा – प्रा. अरुण गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश उपदेव

महाराष्ट्रातील प्रख्यात क्रीडा मंडळाचे व महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे संस्थापक सदस्य, नागपूर शारीरिक शिक्षण मंडळाचे सचिव, महाराष्ट्र आटय़ापाटय़ा महामंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी, नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे माजी असिस्टंट डायरेक्टर, विदर्भातील नामवंत खो-खोपटू, क्रीडापटू व क्रीडा संघटनांचे लोकप्रिय ज्येष्ठ क्रीडा संघटक प्राध्यापक अरविंद ऊर्फ अरुण दिवाकरराव गडकरी सर यांचे नुकतेच देहावसान झाले.

खेळाडूंच्या मनावरील तणाव त्वरित दूर करणारे हसतमुख व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. अनेक खेळाडूंना बीपीएड, एमपीएड करायला लावून त्यांना रोजगार मिळवूण देण्याचे काम गडकरी सरांनी केले आहे. 19 जुलै 1973 रोजी नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण व रंजन मंडळात त्यांनी सहसंचालक पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्या अगोदर त्यांनी 1961 ते 63 पर्यंत एसबी सिटी महाविद्यालयात पीईटीचे कार्य केले. 1965 पर्यंत त्यांनी नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयात लेक्चरर पद हाताळले.

1965 ते 73 पर्यंत त्यांनी वायुसेना नगरातील केंद्रीय विद्यालयात पीईटी म्हणून लोकप्रियता मिळविली. याच काळात त्यांनी नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयात लेक्चरर पदावर कार्य केले होते. एक दशकाहून अधिक काळ त्यांनी नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागातील पदव्युत्तर विभागात लेक्चररचे कार्यसुद्धा केले होते. अमरावती विद्यापीठ नसताना नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे सहसंचालकपद सांभाळताना त्यांनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ हँडबॉल, बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. 1973 मध्ये आंतरविद्यापीठ लॉन टेनिस स्पर्धा झाली, त्या स्पर्धेत हिंदुस्थानचा विख्यात टेनिसपटू विजय अमृतराज खेळला होता व त्याने सुंदर आयोजनाबद्दल गडकरींचे आभार मानले होते.

अरुण गडकरींच्या कार्यकाळातील ती पहिलीच स्पर्धा होती. 27 वर्षे सहसंचालकपद हाताळताना आंतरविद्यापीठ टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन (प्रत्येकी दोनवेळा), बुद्धिबळ, हॉकी, फुटबॉल, कुस्ती, महिला क्रिकेट, पुरुष कबड्डी,खो-खो, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण, क्रॉस कंट्री यासह अन्य क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन त्यांच्या मार्गदर्शनात झाले होते. ऍथलेटिक्सची आंतरविद्यापीठ स्पर्धा विद्यापीठाच्या ट्रकवर व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यात त्यांना यश मिळू शकले नाही ही खंत ते खासगीत व्यक्त करायचे. अरविंद गडकरी यांनी 1960 व 61 मध्ये कबड्डी व खो-खोत नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. याच क्रीडा प्रकारात त्यांनी नागपूर जिह्याचे कर्णधारपद भूषविले होते.

1980 मध्ये एमपीएडच्या पहिल्या बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरल्याबद्दल उपराष्ट्रपती हिदायतुल्ला यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. 1 मे 1965 रोजी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशातील नामवंत अशा महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. चाळीसच्या वर एमपीएडच्या विद्यार्थ्यांना त्यांनी लघुशोध प्रबंधासाठी मार्गदर्शन केले होते. 23 मार्च 1986 रोजी नवी दिल्लीत झालेल्या ऑल इंडिया फिजिकल एज्युकेशन ऍंड अलाईड टीचर्स फेडरेशनच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी नागपूर विद्यापीठाकडून भाग घेतला होता. ‘रोल ऑफ फिजिकल एज्युकेशन ऍंड स्पोर्टस् डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस’ या विषयावर पेपर सादर करून लक्ष वेधून घेणारे अरुण गडकरी यांचा क्रीडा संस्था-संघटना, बालजगत, विवेकानंद केंद्र व क्रीडा मंडळ या संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. इंग्रजी-मराठी- हिंदी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

श्री शिवछत्रपती पुरस्काराचे ते प्रबळ दावेदार असायचे, पण शासन दरबारी मी अर्ज सादर करणार नाही यावर ते अखेरच्या श्वासापर्यंत ठाम असायचे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘खेल खिलाडी खेल’ या अंकात त्यांच्या सासू इंदुमती देशपांडे (पूर्वाश्रमीच्या इंदुमती पुरोहित, पुणे) या लॉन टेनिसच्या चॅम्पियन होत्या, त्यांच्या छायाचित्रासह जे वृत्त प्रकाशित झाले ते पाहून आणि वाचून अरुण गडकरी यांना अत्यानंद झाला होता. एकोणवीस-एकवीस हे वर्ष क्रीडा क्षेत्राला जबरदस्त धक्का देणारे ठरत आहे. हॉकीचे धर्मराज कनोजिया, आरिफ खान, पुरुषोत्तम ऊर्फ शाम शर्मा, केवलरामानी महिला कॉलेजच्या एचओडी यग्या ठाकूर, यवतमाळचे भटकर सर, भंडाऱयाचे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी प्राध्यापक अशोक राजपूत, वर्ध्याचे छत्रपती पुरस्कारप्राप्त प्राध्यापक सुरेश भोंगाडे या दिग्गजांच्या पाठोपाठ क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी अरविंद ऊर्फ अरुण गडकरी यांच्या निधनाने संपूर्ण क्रीडाक्षेत्र हादरून गेले आहे.

[email protected]