
>>कमलाकर जाधव<<
सध्या वाहनांची वाढती संख्या चिंतेचे कारण बनले आहे. शहर, निमशहर तसेच उपनगरात दिवसेंदिवस वाहतूककोंडीच्या समस्या वाढत आहेत. वाढती लोकसंख्या, त्या प्रमाणात दुचाकी व चारचाकींचे वाढते प्रमाण प्रदूषणात भर घालत आहे. हवेमध्ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होते. म्हणजे वायुप्रदूषण. वायुप्रदूषणामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवतात. मुंबई-पुणे तुलनेत 34 लाख वाहनांपैकी साधारण 11 लाख खासगी वाहने आहेत आणि ती 85 टक्के रस्ते व्यापतात. हा आकडा पाहिला की, वाहतुकीच्या प्रश्नाचे गांभीर्य जाणवते. वाहने वाढली तरी रस्ते तेच असतात. आपल्याकडे मुळातच वाहतुकीच्या नियमांची पालन करावे अशी मानसिकता आढळत नाही. शिवाय वाहतुकीच्या नियमांची कठोर कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात, परंतु या प्रयत्नांचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. वाढती बेशिस्त वाहतूक करण्याची रोजची सवय लागली आहे. त्याच्यावर त्या कारवाईचा कसलाही परिणाम होत नाही. पोलिसांनी केलेल्या जुजबी दंडाची रक्कम भरून ते पसार होतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रशासनाने याबाबत नियोजन करण्याची गरज आहे. शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी अतिक्रमणे काढून टाकावीत, फुटपाथ मोकळे करावेत, वन वे वाहतुकीची व्यवस्था करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी. योग्य नियोजन करावे, तर वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल.



























































