संत तुकोबांचा हरिपाठ – नामस्मरण आणि मानसपूजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नामदेव सदावर्ते

संत निवृत्तीनाथांच्या हरिपाठात योगसामर्थ्यसंपन्न असलेल्या सद्गुरूंचे दर्शन प्रतिबिंबित होते. ज्ञानराजांच्या हरिपाठात आत्मज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडून दिलेले दिसतात. नामदेवांच्या हरिपाठात भगवंतावरील एकनिष्ठ प्रेमभावाचे स्वरूप दिसते. एकनाथांच्या हरिपाठात कृष्णार्पण वृत्तीचे सोपे तंत्र, शिवाय द्वैताचे खंडन आहे. तुकोबांच्या हरिपाठात नामस्मरणाबरोबरच मानसपूजा सांगितली आहे. मानसपूजा हा नामस्मरण भक्तीचा कळस आहे. तुकोबांनी देवाकडे जे मागणे मागितले आहे तसेच मागणे सर्व संतांनी मागितलेले आढळते. संत मागतात ते देव त्यांना देतो. संतांना अहंकाराचा वारा कधीच लागत नाही. संत संपूर्ण विश्वाकडे समदृष्टीने पाहतात. नामस्मरणसामर्थ्याने समृद्ध जीवन जगतात… आजच्या तुकाराम बीजनिमित्त…

संत तुकाराम हे वारकरी संत पंचरत्नांतील एक तेजस्वी रत्न होय. संत नामदेवांनी पांडुरंगासह स्वप्नी येऊन तुकोबांना कवित्व करण्याची आज्ञा दिली होती. संत तुकोबांना वारकरी संप्रदायात नामदेवांचा अवतार मानतात. संसारात राहून ईश्वर नामस्मरणावर श्रद्धा ठेवून निष्ठापूर्वक नामभक्तीचा प्रसार करीत संत तुकोबांनी वैकुंठप्राप्तीसह जीवन सार्थकी लावले. नामस्मरणाचे सामर्थ्य जनसामान्याला पटवून देणाऱ्या तुकोबांनी अभंगरचना केली. नामस्मरण हीच देवपूजा आहे. भक्तिभावाने प्रेमपूर्वक देवाची ‘मानसपूजा’ कशी करावी ते तुकोबा सांगतात. तसेच भगवंताच्या नामस्मरणाचे माहात्म्य त्यांनी हरिपाठात प्रकट केले आहे.

आपल्या हरिपाठाच्या आरंभी संत तुकोबांनी गणराय, सरस्वती आणि गुरुदेवांना वंदन केले आहे. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत हरिपाठाची रचना केली आहे. 33 अभंगांच्या हरिपाठातील प्रथम अभंगात ते म्हणतात-

नमिला गणपती माऊली सारजा ।

आता गुरुराजा दंडवत ।।1।।

गुरुराया चरणी मस्तक ठेविला ।

आपुल्या स्तुतीला द्यावी मती ।।2।।

गुरुराया तुज ऐसा नाही सखा ।

कृपा करी रंका धरीं हातीं ।।3।।

तुका म्हणे माता पिता गुरू बंधु ।

तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ।।4।।

संध्येतील भगवंताची नावे उच्चारित तुकोबा म्हणतात- पहाटेच्या या प्रहरी सर्वांनी हरिनामाचा उच्चार करावा. त्यासारखे दुसरे सुख नाही. श्रीहरीच्या या एका नामावर श्रद्धा ठेवली असता तो पांडुरंग साह्यकर्ता होतो. भगवंताचे नाम एकवेळ मुखी येण्यासाठी अनेक जन्मांची पुण्याई असावी लागते.

बहुता सुकृताचि जोडी । म्हणोनि विठ्ठली आवडी ।।

हिंदुस्थानातील मोक्ष देणाऱ्या तीर्थक्षेत्रांचेही स्मरण करावे असे तुकोबा म्हणतात. अयोध्या, मथुरा, काशी, अवंतिका, कांची, द्वारका, पुरी या सात मोक्ष देणाऱ्या नगरी आहेत. तसेच नित्यनेमाने ‘रामकृष्णहरी’ असे नामस्मरण करणारा संसारसागर तरून जातो. ‘श्रीहरी’नामाचा महिमा जाणून नामस्मरणी दृढ व्हावे. नामधारकाच्या घरी भगवंत सतत असतो.

तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव । तेथे वासुदेव सर्वकाळ ।।

केवळ नामस्मरणाने मोक्ष देणाऱ्या तीर्थक्षेत्रांनंतर हिंदुस्थानातील पवित्र नद्यांचे स्मरण करताना तुकोबा म्हणतात-

यमुना, कावेरी, गंगा, भागिरथी, कृष्णा, सरस्वती, तुंगभद्रा, नर्मदा या पवित्र सरिता भगवंताचे स्वरूप असून त्यांचे स्मरण केल्यास प्राण्यांना भय राहत नाही. त्यांच्या दर्शनाने पुण्य मिळते.

प्रातःकाळी नाम पवित्रचि घ्यावे । तेणे विसरावे जन्ममृत्य ।।

पहाटेच्या पवित्र वेळी पवित्र हरिनामाचे संकीर्तन करणारा जन्म-मृत्यूपासून मुक्त होतो. नल, युधिष्ठर, जनक आणि जनार्दन यांच्या स्मरणाने प्राणी धन्यता मानतात. मुखाने नामस्मरण करण्यास आळस करू नका. ज्याचा नामस्मरणावर ठाम विश्वास आहे अशा भोळ्या भाविकाजवळ सतत वासुदेव राहतो. एका हरिनामोच्चाराने देव आपलासा होतो.

अहिल्या, द्रौपदी, सीता आणि तारा तसेच पतिक्रता मंदोदरी या पंचमहापतिक्रतांच्या स्मरणाने, नामोच्चाराने वाणी पवित्र होते. त्यामुळे कुळगोत्राचा उद्धार होतो. संकल्पविकल्पांना दूर लोटून श्रीहरीचे नामस्मरण करावे. असे नामस्मरण करणाऱ्याला संसाराचे भय-बंधन राहत नाही. शुद्ध मनाने ईश्वरस्मरण केल्यास जन्माचे सार्थक होते.

व्यास अंबरिष वशिष्ठ नारद ।

शौनक प्रल्हाद भागवत ।।

नित्यस्मरण करी यांचे जरी प्राणी ।

पुन्हा नाही खाणी चौऱ्यांशीची ।।

शुक, पाराशर हे मुनी तसेच पुंडलिक, अर्जुन, वाल्मीक, बळी, बिभीषण, भीष्म, रुक्मांगद, महर्षी बगदाल्भ्य यांची नावे जो उच्चारील तो प्रत्यक्ष देवासमान होय. तुकोबा सांगतात-

गीता भागवत वेद उच्चारितां ।

पापाची ती वार्ता कोठे आहे ।।

सकळ वासना नामे जे रंगली ।

साधने राहिली मग कैंची ।।

गीता, भागवत व वेदांचा उच्चार केल्याने सर्व पापांचा नाश होतो. मग देहाच्या वासना नामसंकीर्तनात रंगल्यावर निराळी साधने कशाला करायची? म्हणून हरिनामाचा नेम जीवाला तारतो. नियमित नामस्मरण करणारा मनुष्य देवाला आवडतो. उगवलेला दिवस क्षणातच नाहीसा होतो. याचा विचार करून मनुष्याने आपले हित त्वरित साधावे. वेळ न दवडता भगवंताचे नामस्मरण करावे.

सुरवर चिंतनी मुनियांचे ध्यानी ।

सगुणी निर्गुणी तोचि एक ।।

सर्व तीर्थांचे जे मूळ, सर्व क्रतांचे जे फळ, जे एक ब्रह्म, तेच पंढरपुरात विटेवर उभे आहे. ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि आमच्या नेत्रांचे पारणे फिटले. सर्व प्राणिमात्रांचे जीवन आणि सर्व सुखांचा आश्रयदाता पांडुरंग, तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. जगनिर्माता आणि करुणासागर, गरीबांवर लोभ करणारा आणि दुष्टांचा काळ श्री पांडुरंग आहे. तोच देवादिकांच्या चिंतनात, मुनींच्या ध्यानात सगुणनिर्गुण रूपाने राहतो. वेदांनाही जे सापडले नाही ते आम्हाला नामस्मरणाने मिळाले आहे.

संत तुकोबा देवाकडे पसायदान मागतात. माझा अभिमान जाळून टाक. ते देवाला विनवणी करतात, मी तुला सर्वत्र समदृष्टीने पाहीन असे कर, संतसज्जनांच्या चरणधुळीचे वंदन घडेल असे कर, माझ्या हृदयात रात्रंदिवस पंढरीनाथ राहील असे कर. मी सर्वस्वी तुला शरण आलो आहे.

इतुकें करी देवा ऐकावी हे गोष्टी ।

सर्व सम दृष्टी तूज देखूं ।।

इतकें करी देवा ऐकावी हे खूण ।

संत चरण रज वंदूं आता ।।

भलतिया भावें तारी पंढरीराव ।

तुका म्हणे भावे शरण आलो ।।

संत निवृत्तीनाथांच्या हरिपाठात योगसामर्थ्यसंपन्न असलेल्या सद्गुरूंचे दर्शन प्रतिबिंबित होते. ज्ञानराजांच्या हरिपाठात आत्मज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडून दिलेले दिसतात. नामदेवांच्या हरिपाठात भगवंतावरील एकनिष्ठ प्रेमभावाचे स्वरूप दिसते. एकनाथांच्या हरिपाठात कृष्णार्पण वृत्तीचे सोपे तंत्र, शिवाय द्वैताचे खंडन आहे. तुकोबांच्या हरिपाठात नामस्मरणाबरोबरच मानसपूजा सांगितली आहे. मानसपूजा हा नामस्मरण भक्तीचा कळस आहे. तुकोबांनी देवाकडे जे मागणे मागितले आहे तसेच मागणे सर्व संतांनी मागितलेले आढळते. संत मागतात ते देव त्यांना देतो. संतांना अहंकाराचा वारा कधीच लागत नाही. संत संपूर्ण विश्वाकडे समदृष्टीने पाहतात. संत नामस्मरणसामर्थ्याने समृद्ध जीवन जगतात.