लेख – सर्वांना समजून घेणारा नेता

>> सुरेंद्र मुळीक

जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर आपण काय करू शकतो, हे एका शेतकरी कुटुंबातील सुभाष सावंत यांनी सर्वांना दाखवून दिले. सावंत हे बँक युनायटेड फोरमचे नेते आणि इंटकप्रणीत इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस होते. सर्वांच्या अडचणी समजून घेणारा नेता म्हणून बँकिंग क्षेत्रात त्यांची ओळख होती. कोरोनाच्या संसर्गामुळे बँक कर्मचाऱयांचा मृत्यू होतोय, यासाठी मागील चार महिन्यांपासून व्यवस्थापनाशी लढणाऱया कॉम्रेड सावंतांचा अखेर कोरोनानेच बळी घेतला आणि एक लढवय्या नेता लढता लढता काळाच्या पडद्याआड गेला.

कोरोना महामारीच्या जाळ्यात सापडलेले कॉम्रेड नेते सुभाष सावंत यांचे नुकतेच निधन झाले. ते अखेरच्या श्वासापर्यंत बँक कर्मचाऱयांच्या समस्यांसाठी लढले. अगदी काल-परवापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे बँक कर्मचाऱयांना मृत्यूला सामोरे जावे लागते, यावर ठोस उपाययोजना करावी यासाठी ते लढत होते. मागील चार महिन्यांपासून लेखी निवेदनाद्वारे सरकारकडे सातत्याने न्याय मागत होते. हे करीत असताना 70 वर्षीय कॉम्रेड सावंत यांनी स्वतःच्या वयाचा विचार केला नाही. अखेर तेच कोरोना विषाणूच्या जाळ्यात सापडले आणि स्वतःच संसर्गाचे बळी ठरले. एक प्रामाणिक, साधा पण कणखर असा कामगार नेता काळाच्या पडद्याआड गेला. सावंत यांच्या जाण्याने बँक कर्मचाऱयांचा एक हक्काचा आपला माणूस गेला.

जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर आपण काय करू शकतो, हे एका शेतकरी कुटुंबातील सुभाष सावंत यांनी सर्वांना दाखवून दिले. कोकणातील सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ येथील आवळेगाव हे सावंतांचे मूळ गाव. आपले शालेय शिक्षण आवळेगाव येथे पूर्ण करून वयाच्या 19 व्या वर्षी सावंत यांनी मुंबई गाठली आणि एक-एक प्रांत काबीज करीत बँकिंग क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व निर्माण केले. 25 वर्षांपूर्वी माझी आणि सुभाष सावंत यांची ओळख झाली. मराठी आणि इंग्रजी भाषेतही मालवणी बोलीभाषेचा टच असल्याने मी चटकन ओळखले की, ही व्यक्ती सिंधुदुर्गातील असावी आणि माझी त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली. आम्ही सिंधुदुर्ग जिह्यातील असल्याने कधी जवळचे मित्र बनलो, हे समजलेच नाही. कोकणातील मुलांनी आता नोकऱया न मागता व्यवसायाकडे वळावे, असे ते आवर्जून सांगायचे. दैनिक ‘सामना’ मध्ये कामगार वृत्त लिहिण्याची जबाबदारी माझ्याजवळ असल्याने अनेक कामगार नेत्यांशी माझा जवळून परिचय होत असे. मग ते डॉ. दत्ता सामंत असो, विजय कांबळे असो, भाई जगताप, गुलाब जोशी, सूर्यकांत महाडिक इथपासून आजपर्यंतच्या किरण पावसकरपर्यंत. या साऱया युनियन नेत्यांमध्ये एखाद् दुसरा अपवाद वगळता सारे कामगार नेते हे कोकणातीलच होते. म्हणूनच ते आक्रमक होते, लढवय्ये होते आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे होते. कामगाराला न्याय देणे हेच या सर्वांचे ध्येय होते.

कॉम्रेड सुभाष सावंत यांचे नेतृत्व याच आक्रमकतेमुळे पुढे आले. त्यांनी आपल्या आक्रमकपणाला अभ्यासाची जोड दिली. कोणत्याही आक्रमकवृत्तीला अभ्यासाची जोड असेल तर यश मिळतेच मिळते, हा मूलमंत्र त्यांनी आत्मसात केला होता. म्हणूनच ते कायमस्वरूपी म्हणायचे की संघर्षाशिवाय कामगार चळवळ नाही आणि संघटना नसेल तर संघर्ष नाही आणि अभ्यासूवृत्ती नसेल तर व्यवस्थापनाशी चर्चा यशस्वी होत नाही. याच जिद्दीने त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईत आल्यावर ते लालबाग येथील कामगार वस्तीत राहू लागले आणि वर्षभरातच ते सेंट्रल बँकेत कामाला लागले. नोकरी करीत असताना टाळ हातात घेऊन गावातील गोष्टी कुटत बसण्यापेक्षा त्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालयातून शिक्षण घेऊन पदवी मिळवली. त्याच कालावधीत सेंट्रल बँकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांचा प्रश्न निर्माण झाला होता. SSC उत्तीर्ण असूनही काही कर्मचाऱयांनी सातवी पास प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळविली होती. त्यावेळी बँकेला फसवून नोकरी मिळवली असा आरोप ठेवून सेंट्रल बँक व्यवस्थापनाने या कर्मचाऱयांना नोकरीतून कमी करण्याची नोटीस बजावली. अशा कठीण प्रसंगात कर्मचाऱयांच्या बाजूने सुभाष सावंत ठामपणे उभे राहिले आणि कर्मचाऱयांना नोकरीवरून काढू नये, यासाठी प्रयत्न सुरू केले. व्यवस्थापनाशी बोलणी सुरू झाली. यावेळी सावंत यांनी मुद्दा मांडताना स्पष्टपणे सांगितले की, जर एखाद्या प्रवाशाकडे प्रथमवर्गाचा पास असेल आणि तो जर दुसऱया वर्गातून प्रवास करीत असेल तर तो गुन्हा होत नाही. मात्र, दुसऱया वर्गाचा पास असणाऱयाने प्रथमवर्गातून प्रवास केल्यास तो गुन्हा ठरतो, हे मान्यताप्राप्त तत्त्व आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने उच्च शिक्षण असूनही कमी शिक्षण असलेल्या जागेवर नेमणूक स्वखुशीने स्वीकारली तर तो गुन्हा होऊ शकत नाही. सावंत यांच्या या मुद्दय़ावर व्यवस्थापन विचारात पडले व त्यांनी या युक्तिवादाला मान्यता देत कर्मचाऱयांना दिलेली नोटीस मागे घेतली. परिणामी त्या सर्व कर्मचाऱयांची नोकरी अबाधित ठेवण्यात सावंत यांना यश आले. याच घटनेमुळे सुभाष सावंत यांचा कामगार क्षेत्रात प्रवेश झाला. पण… मुंबईत सहजासहजी काही मिळत नाही, संघर्ष करावाच लागतो. सुभाष सावंत यांनाही याचा अनुभव आला. याच मुद्दय़ावरून सेंट्रल बँकेत सावंत आणि AIBEA (All India Bank Employees Association)चे सरचिटणीस तारकेश्वर चक्रवर्ती यांच्यात वाद निर्माण झाला व इगो दुखावलेल्या चक्रवर्तीने सावंत यांच्या मुंबई युनियनची संलग्नता रद्द केली, पण सावंत डगमगले नाहीत. त्यांनी 1982 साली कम्युनिस्ट युनियनमधून फारकत घेतली आणि इंटकप्रणीत बँक कर्मचारी फेडरेशनला संलग्नता घेतली. सावंत हे सेंट्रल बँक मुंबई युनियनचे गेली 37 वर्ष सातत्याने सरचिटणीस म्हणून निवडून येत होते. या पदावरून सावंत यांना खाली खेचण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण सावंत यांना अखेरपर्यंत कोणीच हरवू शकले नाही. इतकी प्रचंड कर्मचाऱयांची ताकद त्यांच्या मागे होती. केवळ त्यांचा प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा हेच त्याचे एकमेव कारण होते. याच प्रमाणिकपणाच्या जोरावर ते ऑल इंडिया सेंट्रल बँक एम्प्लॉईज काँग्रेसचे अखिल भारतीय स्तरावर सरचिटणीस म्हणून निवडून आले.

सुभाष सावंत हे सुरुवातीपासूनच चोवीस तास बँक कर्मचाऱयांचा विचार करत असत. कुठलाही कर्मचारी त्यांच्याकडे समस्या घेऊन गेला की, मार्ग काढून त्याला न्याय देत असत. बँक कर्मचारी आणि त्यांच्या समस्या याबाबत त्यांचा गाढा अभ्यास होता. किंबहुना, बँक कर्मचाऱयांचे ते एक चालतेफिरते विद्यापीठ होते. पेन्शन असो की वेतनवाढ असो, सुभाष सावंत त्यातून मार्ग काढणारच हा कर्मचाऱयांना विश्वास होता. पेन्शनचा दुसरा पर्याय सावंत यांनीच बँक कर्मचाऱयांना उपलब्ध करून दिला. बँकिंग क्षेत्रात 1992 मध्ये पेन्शनचा पर्याय देण्यात आला होता. त्यावेळच्या व आजच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीमध्ये खूपच फरक पडलेला आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱयांना पेन्शनचा दुसरा पर्याय द्यावा अशी सावंत यांनी मागणी केली. यासाठी कोर्टकचेऱया, खुले चर्चासत्र आणि राष्ट्रीय इंटकच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारवर दबाव टाकणे या आयुधांचा वापर केला. त्यामुळे नवव्या द्विपक्षीय करारात पेन्शनचा दुसरा पर्याय बँक कर्मचाऱयांना खुला झाला. पूर्वीच्या करारामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार कर्मचाऱयांनी पेन्शनचा पर्याय स्वीकारला होता. दुसरा पर्याय दिल्यावर तीन लाख पंचेचाळीस हजार कर्मचाऱयांनी पेन्शनचा पर्याय स्वीकारला.

कोकणात जन्मलेल्या माझ्या या वरिष्ठ मित्राने जगातील कामगार चळवळीतही आपले विचार मांडले. इटली, जर्मनी, स्वित्झर्लंड या देशांना भेट देऊन तेथील कामगार प्रश्नांचा अभ्यास केला. रशियातील कामगार कायदे व सेवाशर्तींचा अभ्यास करण्यासाठी इंटकने सुभाष सावंत यांची निवड केली होती. पोर्तुगाल येथे आयोजित केलेल्या ‘फायनान्शियल इन्फॉर्मेशन’ विषयांवरील चर्चासत्रात त्यांनी भाग घेतला होता. त्याचप्रमाणे कोलंबो येथे झालेल्या ‘फायनान्शियल सेक्टर युनियन काऊन्सिलिंग’ या चर्चासत्रात त्यांनी आपले विचार मांडले होते. सध्या गाजत असलेल्या बँकांच्या बुडीत कर्जाचा विषय सर्वप्रथम सावंत यांनी 2014 साली मांडला. या विषयावर तोपर्यंत बँकिंग क्षेत्रात कोणीच बोलत नव्हते. पण सावंत यांनी चर्चगेट ते आझाद मैदान असा मोर्चा काढून या विषयाला जनतेसमोर आणले. अखेर या मुद्दय़ावर आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी युनियनने उठवलेला आवाज मान्य केला आणि बुडीत कर्जदारांना वठणीवर आणण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे असे मत मांडले. परिणामी चिडलेल्या बँक व्यवस्थापनाने सूडबुद्धीने सावंत यांच्यावर खातेनिहाय चौकशी सुरू केली व निवृत्तीनंतरही चौकशी चार वर्षे सुरू ठेवली. सावंत यांची हक्काची पेन्शन थांबविण्याचा इशाराही व्यवस्थापनाने दिला. पण सावंत डगमगले नाहीत. निवृत्तीनंतरही ते कर्मचाऱयांसाठी तब्बल दहा वर्षे लढत राहिले. गेली चार दशके त्यांनी बँक कर्मचाऱयांच्या मनावर अधिराज्य केले. वेतनवाढीच्या चौथ्या द्विपक्ष करारापासून अलीकडच्या अकराव्या द्विपक्ष कराराच्या MOU पर्यंत कर्मचाऱयांच्या सेवाशर्तीसाठी ते अविरत झटले. कोरोनाच्या संसर्गामुळे बँक कर्मचाऱयांचा मृत्यू होतोय यासाठी मागील चार महिन्यांपासून व्यवस्थापनाशी लढणाऱया कॉम्रेड सावंतांचा अखेर कोरोनानेच बळी घेतला आणि एक लढवय्या नेता लढता लढता काळाच्या पडद्याआड गेला.

आपली प्रतिक्रिया द्या