
>> डॉ. अ. ल. देशमुख
स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा अंतर्भाव दिसून आला. एक म्हणजे ज्ञानाचा स्फोट, दोन लोकसंख्येचा प्रस्फोट आणि तीन उगवत्या आकांक्षांची वाढ. या तीन गोष्टींमुळे शिक्षणामधून गुणवत्ता वाढून परिस्थिती अधिकाधिक गुंतागुंतीची बनत गेली. आज ज्ञानाच्या विस्फोटाबरोबर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात रोज नव्याने भर पडत आहे. कालच्या ज्ञानाला आज मागणी राहीलच याची खात्री नाही. तंत्रज्ञान रोजच्या रोज बदलते आहे. रोजच्या जीवनात नव्याने घडणारे बदल विचारात घेऊनच विविध नव्या गोष्टी, नवी कौशल्ये ही ताबडतोब आत्मसात व्हावीत असे अभ्यासक्रम देणारी शिक्षण प्रणाली आज समाजाला अपेक्षित आहे.
शिक्षणाची व्याख्या गुणवत्तेमध्ये बदल घडवून आणणारी प्रक्रिया अशी आहे. ज्यावेळी आपण गुणवत्तेचा विचार करतो त्यावेळी ती साखळी राष्ट्राची, समाजाची, कुटुंबाची व वैयक्तिक या पातळीपर्यंत जाते. याशिवाय कालानुरूप अवगत केले जाणारे बदल, आव्हानांना-संकटांना धीराने सामोरे जाणारी सुदृढ मानसिकता, वैचारिक प्रगल्भता, मनाची समृद्धता, भावनांची उदात्तता म्हणजे शिक्षण. त्याचप्रमाणे एकमेकांप्रति निर्माण होणारा विश्वास व आदरभाव आणि बौद्धिक पातळीतील वाढ याही गोष्टी आपण शिक्षणाबाबत विचारात घेतो.
उद्याच्या शिक्षणाचा विचार करताना साधारणपणे काल आणि आज यांच्यासंदर्भात शिक्षणाने जे काही मिळवले, व्यक्ती आणि समाज यांच्या वर्तनातून जे काही जाणवले, त्याचे वर्गीकरण करून त्यातील इष्ट ते वाढवत जायचे आणि इष्ट व वास्तव यातील अंतर कमी करत जाण्याची प्रक्रिया सुरू ठेवायची हा वैज्ञानिक मार्ग उद्याच्या शिक्षणाचा विचार करता डोळ्यांपुढे येतो. शिक्षणाचे धोरण ठरवतानाही सर्वसामान्यांपासून विद्वानांपर्यंत काय हवे आणि प्रत्यक्षात समाजाच्या विकासाच्या दृष्टीने काय आवश्यक आहे असे निर्णय घ्यावे लागतात. धोरण आणि त्याचे निर्णय सर्वसामान्य माणसांच्या आकांक्षांना योग्य ती दिशा देणारे आणि त्या समाजाची गुणात्मक विकसन होण्याची प्रक्रिया निश्चित करणारे असले पाहिजेत.
प्राचीन काळापासून शिक्षणाचा विचार केल्यास आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती. गुरूच्या घरी राहून, काम करून त्यामधून शिकणे हा सिद्धांत आणि प्रात्यक्षिक यांचा एकत्रित अनुभव घेण्याची ती पद्धत होती. या पद्धतीला मोगलांच्या आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये नव्या शिक्षणाने खो दिला. ब्रिटिशांच्या नव्या शिक्षण पद्धतीमुळे शिकणे व काम करणे यांच्यात एक तऱहेचं युद्धच जोपासले गेले. काम ही बहुजनांनी करायची गोष्ट मानली गेल्यामुळे श्रम प्रतिष्ठा ही मूलतः माहीत असूनही शिक्षण व्यवस्थेत मात्र श्रमाला कधीच प्रतिष्ठा मिळालेली नाही. इंग्रजीमधून पाश्चात्त्य संस्कृतीचे शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात अनेक संकल्पना या अनुभवायला न मिळाल्यामुळे त्या केवळ लक्षात ठेवूनच आत्मसात करण्याची फार मोठी पद्धत शिक्षणामध्ये आली. त्यामुळे उत्तम यश संपादन करायचे असल्यास उत्तम स्मरण आणि पाठांतर या चक्रामध्ये नकळत संपूर्ण शिक्षण प्रक्रिया अडकली. यासाठी शिक्षण प्रक्रियेने परीक्षा पद्धती स्वीकारली.
गेल्या दोन वर्षांत कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या शिक्षण पद्धतीतील सर्वच उणिवा एकदम उघडय़ा पडल्या. अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन हा शिक्षणातला त्रिकोण विस्कळीत झाला, किंबहुना एकदमच ढासळला गेला. सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टही गळून पडले. गेली अनेक वर्षे आपण नुसते परीक्षार्थी शिक्षण म्हणून चर्चा करत आहोत; पण त्यात मुळापासून बदल घडवून आणण्याबाबत आपण चर्चेशिवाय काहीही केलेले नाही. आता आपल्याला संधी आली आहे किंवा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आज आपल्याला उद्याच्या शिक्षणासाठी शिक्षण प्रक्रियेत मुळापासूनच बदल केले पाहिजेत. वर्षभरापूर्वी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालेले आहे. अजून त्याची कार्यवाही व्यवस्थितपणे सुरू झालेली नाही. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला आवश्यक त्या गोष्टींची भर घालता येईल.
कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण ही नवी पद्धत विकसित झाली. यापूर्वी आपल्याकडे अत्यल्प प्रमाणात व मर्यादित संख्येत विद्यार्थी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करत होते, पण गेल्या वर्षभरात त्याची आपली साक्षरता थोडी अधिक वाढलेली आहे. यामध्ये काही अडचणी प्रकर्षाने पुढे आलेल्या आहेत. त्यातील मुख्य अडचण म्हणजे सुरक्षित आणि शहरी वातावरणात वाढलेली धनिकांची मुले आणि असुरक्षित, हलाखीच्या ग्रामीण भागात वाढलेली गरीबांची मुले असे दोन गट आपल्याला प्रकर्षाने जाणवले आहेत. यातील दुसऱ्या गटातील विद्यार्थी डिजिटल साक्षरही नाहीत. त्यांना डिजिटली सक्षम करण्यासाठी शासनाने, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी ‘माहिती तंत्रज्ञान ः ओळख व वापर’ हा विषय बालवाडीपासून सक्तीचा केला पाहिजे. शाळेबरोबर या विषयाची जाणीव, जागृती शिक्षक व पालकांमध्ये मोठय़ा प्रमाणात करण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रानेच हे काम केले पाहिजे; नव्हे शिक्षण प्रक्रियेचा तो अविभाज्य घटक आहे. शैक्षणिक साधन म्हणून प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्याजवळ स्मार्टफोन, टॅब आणि लॅपटॉप असला पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांना सीएसआर फंडातून ही साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर टाकली पाहिजे. डिजिटल सक्षमतेचा वयोगटानुरूप स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा. त्यामध्ये थिअरीचा भाग कमी असावा व शैक्षणिक अॅप, पोर्टल तयार करणे, यूटय़ूब, झूम आणि गुगल मीट, व्हिडीओ कॉल, इन्स्टाग्राम, फेसबुक, जीपीस याबाबतीतील सर्व प्रात्यक्षिकांचा जास्तीत जास्त समावेश असावा. कारण पुढच्या काळात जो विद्यार्थी डिजिटल सक्षम असेल तोच टिकेल, तोच विकसित होईल आणि त्याचेच करीअर घडेल.
शिक्षणातून अपेक्षित असा वैचारिक, भावनिक, तार्किक व कौशल्यात्मक बदल घडवून येण्याची प्रक्रियाच सध्या सदोष झाली आहे. समाजाला ज्या प्रकारचे मनुष्यबळ हवे त्या तऱहेचे धैर्यवान, वेगळा विचार करणारे, स्वयंनिर्णय घेणारे, कल्पक मन असलेले, सहकारी वृत्ती असणारे आणि संवेदनशील मनुष्यबळ शिक्षण व्यवस्था देत नाही हे उघड झाले आहे.
थोडासा विचार केला तर लक्षात येईल की, आज शाळेमधून नुसती माहिती मिळवणे आणि ती पाठ करणे एवढे पुरेसे नाही; तर तिचा वापर कसा करणार हे महत्त्वाचे आहे. एका क्लिकने जगातील माहितीचा सागर समोर येत असलेल्या काळात या माहितीचा वापर कसा करुन घ्यायचा हे जमले पाहिजे. शिक्षणामधून विद्यार्थ्यांना हे शिकवले पाहिजे. आपले अभ्यासक्रम, अध्यापन आणि मुल्यमापन यात आपण बदल केला नाही, तर आपले अस्तित्वच धोक्यात येणार आहे. शिकणे आणि जगणे यात पडलेली दरी आपल्याला कमी करावीच लागेल.
स्वातंत्र्यप्राप्तीपासून आपण फक्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास एवढय़ावरच लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी काही प्रमाणात बौद्धिक साक्षर होतो; परंतु दैनदिन जीवनाला सामोरे जाण्यासाठी तो कमकुवत राहतो ही वस्तुस्थिती आहे. वागणे, बोलणे, समाधानी राहणे, परस्पर सामंजस्य, इतरांबरोबर जुळवून घेणे, इतरांचे ऐकणे, नकार पचवणे, संकटाला धैर्याने सामोरे जाणे, शिस्त, आदरभाव पाळणे, चांगल्या सवयी विचार, छंद अवगत करणे यामध्ये आपले विद्यार्थी कमी पडताना दिसतात. या सर्व बाबतीत त्यांची मानसिकता बऱ्याच अंशी नकारात्मक झालेली आहे. शिक्षणामधून ती आपल्याला सकारात्मक करता येईल का, त्यादृष्टीने काही प्रयत्न करता येतील का? याचा विचार करणे गरजेचे आहे. खरे म्हणजे शिक्षणाचा पायाच मुळी मानसशास्त्र आहे.
याखेरीज कोरोना काळचा अनुभव लक्षात घेता आपल्याला मूल्यमापन पद्धतीत क्रांतिकारी बदल करावा लागेल. मूल्यमापनासाठी वेगळी मूल्यमापन पेंद्रे असावीत. त्यांची गुणवत्ता व दर्जा याबाबतीत त्यांना स्वायतत्ता द्यावी. त्यावर नियंत्रण मात्र शासनाचे असावे.
- एकविसाव्या शतकात शिक्षण ही बदलाच्या प्रक्रियेतील फार मोठी किल्ली आहे. शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठे इथेच फक्त शिक्षण मिळते एवढय़ापुरता मर्यादित विचार करून चालणार नाही. शिक्षणाच्या बाबतीत खालील तीन गोष्टींमधून विचार करावा लागेल- 1. शिक्षण 24 तास उपलब्ध असावे. 2. शिक्षण सर्वत्र उपलब्ध असावे. 3. पाठय़क्रम व्यक्तिगत विकासानुवर्ती असावेत. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती व आकलन क्षमता वेगवेगळी आहे. त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. यासाठी आपणासमोर वर्ग अध्यापन हा एक पर्याय आहे. त्याचबरोबर आभासी शिक्षण हा दुसरा पर्यायही आहे. एकविसाव्या शतकात आपल्याला या दुसऱ्या पर्यायाचा अधिक विचार करावा लागेल. ब्लॉकचेन तंत्रज्ञान, डेटा लर्निंग व अॅनालिसिस, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट इत्यादी गोष्टींची ओळख व वापर, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरापर्यंत त्यांचा अंतर्भाव करण्याची गरज आहे. आभासी शिक्षणामधून या गोष्टी आपल्याला साध्य करता येतील.
(लेखक शिक्षणतज्ञ आहेत)
























































