त्रिपुरातील ‘वि. ल.’ पॉवर!

56

>> पंजाबराव मोरे

वेगवेगळ्या समस्या असलेल्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सध्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या डॉ. वि. ल. धारुरकर यांची नियुक्ती झाली आहे. अल्पावधीत त्यांनी त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने या विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्रिपुरा राज्याच्या वित्त आणि नियोजन आयोगावरही धारुरकर सरांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिपुरासारख्या ईशान्येकडील राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी ही ‘वि. ल.’ पॉवर नक्कीच उपयोगी पडेल!

त्रिपुरा… ईशान्य हिंदुस्थानातील एक निसर्गसंपन्न आदिवासीबहुल राज्य. तेथील आगरताळा विद्यापीठाची धुरा सध्या एक मराठी व्यासंगी व्यक्तिमत्त्व यशस्वीपणे सांभाळत आहे. हे व्यक्तिमत्त्व आहे मराठवाडय़ातील आणि डॉ. वि. ल. धारुरकर ही त्यांची ओळख. मराठवाडाच नव्हे तर देशाच्या अनेक विद्यापीठांत, शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळय़ा विषयांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा डॉ. वि. ल. धारुरकर यांनी उमटविला आहे. इतिहास, पत्रकारिता या हक्काच्या क्षेत्रांबरोबर इतरही अनेक क्षेत्रांत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभाग आणि नंतर पत्रकारिता विभागाचे प्रमुखपद त्यांनी भूषविले. त्यानंतर दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठासह अनेक ठिकाणी आपल्या अध्यापनाची चुणूक त्यांनी दाखविली. विविध विषयांवरील त्यांची पकड आणि व्यासंग पाहून त्रिपुरातील आगरताळा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची धुरा सांभाळण्याची संधी त्यांना मिळाली. 16 जुलै 2018 रोजी त्यांनी तेथील कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली. 1985 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आढावा डॉ. धारुरकर यांनी घेतला. या परिसरातील चार तलाव, झाडीवेली आणि पडीक जमिनीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. यासाठी काहीतरी केले पाहिजे याचा ध्यास घेत त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरात 600 झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरवले आणि कामही सुरू केले. आज हे काम बऱयापैकी प्रगतीपथावर आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयाकडे सर्वांनीच पाठ फिरविल्याचे चित्र होते. धारूरकर यांच्यासारख्या प्रचंड वाचन आणि व्यासंग असलेल्या अध्यापकाला ही गोष्ट खटकली नसती तरच नवल होते. त्यांनी ग्रंथालयाला भेट दिली. त्याच्या विकासासाठी काही सूचना केल्या आणि सर्व विभागप्रमुखांना सूचनापत्रे पाठवून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ग्रंथालयात येणे सक्तीचे केले. साहजिकच ग्रंथालय नंतरच्या काळात विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी फुलून गेले. विद्यापीठाच्या वसतिगृहाला भेट दिली तेव्हा तेथील खानावळीचा (मेस) खर्च अवाढव्य असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच विद्यापीठाच्या शेतजमिनीत बटाटे, कोबी, मिरची, टमाटे, पालेभाज्या यांचे उत्पादन घेण्याचे आदेश दिले. यातून विद्यार्थ्यांच्या मेसचा खर्च अकराशे रुपयांवरून सातशे रुपयांवर आला. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांची गरज भागवून या ठिकाणी तयार होणारा भाजीपाला विकण्यासाठी विद्यापीठात स्टॉल लावण्यात आले. बाजारभावापेक्षा निम्म्या दराने भाजीपाला विकण्यात आला. नागरिकांनी विद्यापीठाच्या स्टॉलवर रांगा लावल्या. यातून आलेले उत्पन्न विद्यापीठाच्या तिजोरीत जमा झाले. मोठय़ा पदाची खुर्ची ही सुळावरची पोळी असते हे लक्षात घेत मिळालेल्या संधीचे सोने करण्यात हातखंडा असलेल्या डॉ. धारूरकर यांनी विद्यापीठात फलोद्यान, औषधी वनस्पती लागवड, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रश्न सोडविणे, महिला सशक्तीकरणावर कार्यशाळा आयोजित करणे, सौरऊर्जेचा प्रकल्प राबविणे, विद्यापीठ परिसरातील विजेचा प्रश्न सोडविणे अशी अनेक कामे केली. तसेच त्रिपुरा राज्याच्या विकासासंदर्भात विविध परिसंवाद व चर्चा घडवून आणत त्रिपुरा राज्याच्या विकासाचे नवीन प्रारूप कसे असावे याची मांडणी केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध विकास योजना आणि विद्यापीठ प्रशासनाचा समन्वय करण्याचे मौलिक कार्य ते करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा, ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्याच्या विकासात उपयोग व्हावा या उद्देशाने त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी धारुरकर सरांची राज्याच्या वित्त व नियोजन आयोगावर सदस्य म्हणून निवड केली आहे. मराठी माणसाला संधी मिळते, तेक्हा मराठी माणूस देशाच्या कानाकोपऱयात जाऊन महाराष्ट्र धर्माची प्रचीती देत असतो, असा अनुभक मला त्रिपुरामध्ये गेल्यानंतर आल्याचे धारुरकर नम्रपणे सांगतात. त्रिपुराच्या नियोजन आयोगावर निवड झाल्याने राज्यातील गरीब, आदिवासी नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठीही काय करता येईल याचा विचार ते करीत आहेत. या भागात मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते ते अननस आणि इतर फळांचे. त्यांचीच विक्री, निर्यात आणि फळप्रक्रिया उद्योग या माध्यमातून या आदिवासींचे जीवनमान कसे उंचावता येईल या दृष्टिकोनातून योजना आखण्याचा आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकारकडून करून घेण्याचा धारुरकर यांचा मानस आहे. त्रिपुराच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी धारुरकर नावाच्या मराठी ‘वि.ल.’ पॉवरचा हातभार लागतो आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या