>> दिलीप ठाकूर
काही यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथेचा वृक्ष कितीही बहरला, सदैव टवटवीत राहिला, त्याला अनेक फांद्या फुटल्या तरी ते आपली पाळेमुळे कधीच विसरत नाहीत. विजय कदम अगदी अस्साच होता. 10 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 67व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले तेव्हा सर्वप्रथम लक्षात आले ते अखेरपर्यंत तो आपण गिरणगावातील लोककला, लोकसंगीत यातून घडलो हे विसरला नव्हता.
सत्तर व ऐंशीच्या दशकात मराठी मनोरंजन क्षेत्रात एकतर गिरगावातून हौशी कलाकार येत वा गिरणगावातून असेच धडपडे कलाकार येत. सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या अनेक ठिकाणच्या मंडपांत दहा दिवसांत आपली कला सादर करण्यातील त्यांचा आनंद कमालीचा. आपल्या कामावरचे लक्ष कायम ठेवून, छोटय़ा छोटय़ा भूमिका साकारत अनेकांनी वाटचाल करत करत तो नावारुपास आला. विजय दत्ताराम कदम हे त्याचे पूर्ण नाव. आपण कायमच विद्यार्थी दशेत आहोत हे तो सतत आवर्जून सांगे. जुन्या अनुभवातून आवश्यक ते शिकणे आणि नवीन काही करता येईल का याचा विचार करणे हे त्याचे स्वभाववैशिष्टय़.
विजय कदमच्या वाटचालीबाबत सांगावे तेवढे थोडेच. अगदी अलीकडची त्याची त्याला नवीन अनुभव देणारी भूमिका अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनडी’ या चित्रपटात मिळाली. विजय कर्जतला ‘ती परत आलीय’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात रमला असतानाच एका कास्टिंग दिग्दर्शकाच्या सहाय्यक युवतीचा याच भूमिकेसंदर्भात फोन आल्याने त्याला आश्चर्य वाटले. कारण त्याने स्वतःहून यासाठी काहीच प्रयत्न केले नव्हते. पण या चित्रपटातील ‘नॉन करप्ट’ अशा आदर्श आमदाराच्या भूमिकेसाठी विजय कदमचे नाव ठरले होते. या चित्रपटाच्या केरळ येथील चित्रीकरणासाठी तो गेला असता सेटवर चक्क नऊ सहाय्यक दिग्दर्शक पाहून त्याला आश्चर्य वाटले. हा अनुभव त्याला नवीन होताच, पण आपण नेमके कोणाचे ऐकायचे हा त्याच्यासमोर प्रश्न होता.
याच वेळेस त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत काही नवीन शब्दप्रयोग आल्याचीही ओळख झाली. रोल कॅमेऱ्याला स्पीड म्हणणे वगैरे. थोडेसे फ्लॅशबॅक जात सांगायचे तर शालेय वयात ज्यांचे चित्रपट पाहिले ते शरद तळवलकर,राजा गोसावी हे कलाकार त्याचे आदर्श होते. त्याने लहान वयातच ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पाऊल टाकले. दरवर्षी आंतरशालेय वैयक्तिक अभिनय व एकांकिका स्पर्धेत सहभाग घेणे त्याने कायम ठेवले. कलावंत म्हणून विजय कदमची जडणघडण झाली ती परेलच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये. या शाळेतील तळाशीलकर, सावंत महाजन आणि परब सर यांचे मार्गदर्शन त्या वेळी विजय कदमला मिळाले. त्याने महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून घेतले. ‘तत्वज्ञान’ हा गंभीर विषय घेऊन तो पदवीधर झाला. मूळ स्वभाव तसा गंभीर पण कलाकार म्हणून वावरताना मोकळाढाकळा. महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्याची पहिला विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून निवड झाली होती.
‘अपराध कुणाचा’ हे विजय कदमचे पहिले व्यावसायिक नाटक. आता त्याची पावले पुढे पडू लागली. नवीन जगात तो आला. ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा कलावंतांसोबत काम करावयास मिळाल्याने तो घडत गेला… रथचक्र, घरटे आमुचे छान, वासुदेव सांगती अशी व्यावसायिक नाटके करता करता पुरुषोत्तम बेर्डेच्या ‘टूरटूर’ या नाटकाने अनेक कलाकारांना आत्मविश्वास व लोकप्रियता दिली. कलाकार म्हणून स्थिरावण्यास आधार दिला. विजय कदम त्यातीलच एक. दादा कोंडके यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या अफाट लोकप्रिय लोकनाटय़ाचे त्याने पुनरुज्जीवन केले. या लोकनाटय़ाचे 1986पासून 750हून जास्त प्रयोग झाले. ‘हल्का फुलका’ या नाटकात त्याने सात भिन्न व्यक्तिरेखा साकारल्या. मनोरंजन क्षेत्रातील आपल्या अनुभवावरील ‘खुमखुमी’ हा त्याचा आपल्याच ‘विजयश्री’ या संस्थेचा एकपात्री प्रयोग देशविदेशात पोहचला. खुमखुमीच्या माध्यमातून त्याने अनेक सामाजिक संस्थांना व गरजू अपंगांना मदत केली होती.
हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघं राजा राणी, सारेच सज्जन, राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लावू का लाथ, गोळाबेरीज, वासुदेव बळवंत फडके, रेवती, देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी, कोकणस्थ, मामला पोरीचा, धडक बेधडक हे त्याचे काही चित्रपट. नागेश दरक दिग्दर्शित गावातील गोष्ट असलेल्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’मध्ये त्याने अश्विनी भावेच्या पतीची भूमिका साकारली. ग्रामीण भागातील टूरिंग टॉकीज, तंबू थिएटर्स यात या चित्रपटाने भरपूर यश प्राप्त केले. विजय कदमने पार्टनर, गोटय़ा, दामिनी, सोंगाडय़ा बाज्या, इंद्रधनुष्य घडलंय बिघडलंय, ती परत आलीय अशा मराठी मालिका व श्रीमान श्रीमती, मिसेस माधुरी दीक्षित, अफलातून, घर एक मंदिर या हिंदी मालिकेत तसेच अनेक जाहिरातींत अभिनय केला.
विजय कदमची पत्नी ‘पद्मश्री जोशी’ अभिनेत्री आहे. यावर तो कायमच गंमतीने म्हणे, मला पद्मश्री मिळाली. विजयचा मुलगा गंधार हा संगीत क्षेत्रात आहे. विजय कदमचे ‘हलकं फुलकं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. फार पूर्वी अनेक कलाकारांना नोकरी सांभाळून कला क्षेत्रात काम करावे लागे. विजय कदमने बँकेतील नोकरी बराच काळ कायम ठेवली. इतकेच नव्हे तर कारकीर्द सुरू केल्यावर बारा वर्षांनी पहिली गाडी घेतली… तोपर्यंत बेस्ट बस, लोकल ट्रेन, रिक्षा यानेच आवडीने प्रवास करत असे. अलीकडे विजय कदम काही महिने कर्करोगाने आजारी होता. त्यातून तो बरादेखील झाला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळीच पटकथा असावी… मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना आता यापुढे वाढदिवसाच्या दिवशी विजय कदमच्या शुभेच्छांच्या फोनची रुखरुख राहील.