आर्टसर्कलचा संगीत महोत्सव दिमाखात संपन्न; नृत्य, ताल, सुरांच्या त्रिवेणी संगमाची अनुभूती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थिबा राजवाडा परिसरात आर्टसर्कल रत्नागिरीच्या वतीने संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन गायिका यशश्री सरपोतदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यशश्री सरपोतदार यांनी यमन राग आळवत महोत्सवाला प्रारंभ केला.

संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ संवादिनीवादक अजय जोगळेकर, एसबीआयचे सुहास प्रभुदेसाई, माधव पटवर्धन आणि आर्टसर्कल रत्नागिरीचे अंजोर प्रभुदेसाई उपस्थित होते. यशश्री सरपोतदार यांनी सुरुवातीला यमन राग सादर केला. त्यानंतर शहाणा कानडा रागातील मध्यलय एकताल आणि दूतलय एकतालमधील बंदिशी सादर केल्या. यशस्वी सरपोतदार यांनी मैफिलीचा समारोप राम बरवा कृष्ण बरवा या भजनाने केला. त्यांना प्रणव गुरव यांची तबलासाथ आणि अथर्व कुलकर्णी यांची संवादिनीसाथ मिळाली. तसेच त्यांच्या शिष्या राधा आणि मयुरी यांनी तानपुरासाथ दिली. त्यानंतर पुनीत बालन ग्रुप प्रायोजित तालचक्र कार्यक्रम सादर झाला.

तबला, संवादिनी, संतुर, गायन आणि कत्थकनृत्य या चारही कलांच्या संगमाने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तबलावादक विजय घाटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला गेला. ताकहिरो अराई यांचे संतुरवादनही मंत्रमुग्ध करून गेले. सुरंजन खंडाळकर यांचे गायन, तर अभिषेक सिनकर यांची संवादिनी आणि सागर पाटीकर यांनी तालचक्रमध्ये सुंदर रंग भरले. शीतल कोळवलकर यांच्या पदन्यासाने मैफिल पूर्ण झाली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मेहताब अलिमियाजी यांचे सतारवादन झाले. त्यांना स्वप्नील भिसे यांनी तबलासाथ दिली. महोत्सवाचा समारोप पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार यांच्या स्वरांनी केला. राग बसंत बहार त्यांनी सादर केला. त्यांना संवादिनी साथ अजय जोगळेकर तर तबलासाथ भरत कामत यांनी दिली.