आशियाई स्थापत्य वैभव – जपानमधील बौद्ध धर्माचा प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. मंजिरी भालेराव

साधारणपणे इ.स.च्या 5 व्या-6 व्या शतकानंतर बौद्ध धर्म जपानमध्ये पोचला असे आपण म्हणू शकतो.
मूलत तो चीनमधून गेला असल्याने सुरुवातीला तो चिनी संस्कृतीचाच भाग आहे असे अनेक लोकांना वाटत असे. तत्कालीन जपानच्या सामाजिक जीवनावर चिनी संस्कृतीचा प्रचंड पगडा होता.

आज जगातील अनेक क्षेत्रांत आघाडीवर असणाऱया जपान या देशाचा आणि बौद्ध धर्माचा संपर्क येण्याच्या आधी जपानमध्ये शिंतो धर्म लोकप्रिय होता हे आपण मागच्या भागात पाहिले होते. त्या धर्माच्या देवदेवतांचा प्रचंड प्रभाव स्थानिक लोकांवर पडला होता. जगातील सर्व देशांच्या पुराकथांमध्ये जशी त्या त्या देशाच्या उत्पत्तीची कथा असते तशी जपानच्या बाबतीतसुद्धा आहे. ‘कोजिकी’ या ग्रंथानुसार स्वर्ग आणि पाताळ यांच्या निर्मितीनंतर देवतांच्या सात पिढय़ा झाल्या. त्यात पहिल्या दोन पिढय़ांमध्ये एकेकटय़ा देवांनीच जन्म घेतला. पण पुढे मात्र एक पुरुष आणि एक स्त्री अशा बहीण-भावांनी जन्म घेतले. ते एकमेकांचे पती-पत्नीही होते. यापैकी शेवटची जोडी म्हणजे इझानागी आणि इझानामी. यांनी आमातेरासू (सूर्य), त्सुकुयोमी (चंद्र) आणि सुसानोओ (वादळाचा देव) या तीन मुलांना (देवांना) जन्म दिला. ‘निहोन शोकी’ या ग्रंथानुसार थोडी वेगळी कथा येते आणि संपूर्ण जपान या, 4 मुख्य बेटे आणि 3400 लहान लहान बेटांनी बनलेल्या द्वीपसमूहाची तसेच अनेक देवदेवतांची निर्मिती या इझानागी आणि इझानामी यांनी केली, असे मानले जाते.

जपानच्या इतिहासाच्या कथा जशा चीनमधील हानवंशीय राजांच्या काळातल्या ग्रंथात आढळतात, त्याचप्रमाणे ‘कोजिकी’ आणि ‘निहोन शोकी’ या ग्रंथांमध्ये येतात हे आपण मागच्या भागात पहिले. तशाच प्रकारचा अजून एक ग्रंथ चीनमधील लियांग घराण्याचा (इ.स. 502 ते 557) इतिहास सांगण्यासाठी इ.स. 635 मध्ये लिहिला गेला. ‘लियांग शु’ (ँददक् द थ्ग्aह) असे त्याचे नाव होते. त्या ग्रंथातील नोंदीनुसार ‘हुई शेन’ नावाचा एक बौद्ध भिक्षू काबुलमधून इ.स. 450 मध्ये चीनमध्ये आला आणि 458 मध्ये ‘वा’ (म्हणजे जपान) येथे आणि ‘फुसांग’ येथे गेला होता. ‘फुसांग’ हे काहींच्या मते एका वृक्षाचे नाव आहे तर काहींच्या मते एका प्रदेशाचे नाव आहे. ‘लियांग शु’मध्ये अशी नोंद आहे की, इ. स. 467 मध्ये काबुलहून पाच बौद्ध भिक्षू जहाजाने जपानमध्ये आले होते. त्यांनी त्यांच्याबरोबर बौद्ध ग्रंथ, तत्त्वज्ञान, धार्मिक विधी इ. गोष्टी आणून स्थानिक लोकांना शिकवल्या. त्यांना आपल्या भौतिक जीवनातील मोह, तृष्णा यांचा त्याग करायला सांगितला. त्यांच्यावर या सर्वांचा खूप प्रभाव पडल्याने फुसांगमधील लोकांच्या परंपरा मोठय़ा प्रमाणावर बदलल्या. साधारणपणे इ.स.च्या 6 व्या शतकात बौद्ध धर्म जपानमध्ये पोचला असे सर्वसमान्यपणे मानले जाते. पण जर या ग्रंथाचा पुरावा ग्राह्य धरला तर तो प्रवेशाचा काळ मागे जाऊ शकतो.

साधारणपणे इ.स.च्या 5 व्या-6 व्या शतकानंतर बौद्ध धर्म जपानमध्ये पोचला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मूलत तो चीनमधून गेला असल्याने सुरुवातीला तो चिनी संस्कृतीचाच भाग आहे असे अनेक लोकांना वाटत असे. तत्कालीन जपानच्या सामाजिक जीवनावर चिनी संस्कृतीचा प्रचंड पगडा होता. त्यामुळे जेव्हा चीनमधून बौद्ध धर्म जपानमध्ये आला, तेव्हा जशा चिनी संस्कृतीच्या अनेक गोष्टी जपानमधील उच्चभ्रू लोकांमध्ये लोकप्रिय होत्या, त्यासारखा बौद्ध धर्मही सुरुवातीला जपानमधील राज दरबारातील अमीर-उमराव यांच्यामध्ये लोकप्रिय होऊ लागला. अनेक लोकांना बराच काळ गौतम बुद्ध हा एक ‘कामी’ म्हणजे अनेक (शिंतो धर्मातील) देवांसारखा एक देव वाटत होता. बौद्ध धर्म म्हणजे नेमके काय हे अनेकांना कळत नव्हते. जरी बऱयाच उच्चपदस्थ लोकांना या धर्माचे आकर्षण वाटत होते तरी त्यांच्यापैकी काही लोक, तसेच खुद्द सम्राटसुद्धा या नवीन पंथाकडे वळण्यास इच्छुक नव्हता. त्याचे सार्वभौमत्व हे शिंतो धर्माचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व एकच असण्याच्या संकल्पनेवर आधारित होते. पण जर त्यालाच धक्का लागला असता तर तेही धोक्यात आले असते. या विचाराने सुरुवातीला काही उमराव आणि राजा हे या नवीन विचारांचे स्वागत करायला तयार नव्हते.

चीनमधून आलेला हा नवीन धार्मिक विचार किंवा पंथ आपल्या रोजच्या जीवनातील समस्या सोडवायला मदत करेल अशा प्रकारची धारणा असलेलाही एक मोठा गट तेव्हा जपानमध्ये होता. त्यांना गौतम बुद्धाच्या देखण्या पुतळ्याचे खूप आकर्षण होते. त्याची पूजा करून त्यांच्या शारीरिक व्याधी, आयुष्यातले दु:ख आणि गरिबी हे दूर होईल अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे अनेक लोकांना या नवीन देवाची उपासनाही करायची होती. शेवटी लोकांच्या आग्रहाखातर राजाने या नवीन देवाची उपासना करायला परवानगी दिली, पण ती खाजगीमध्ये. सार्वजनिक पातळीवर उपासना करण्याची परवानगी नव्हती. अशा प्रकारे जपानमध्ये हळूहळू गौतम बुद्धाच्या उपासनेचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. यानंतरचा इतिहास आपण पुढच्या भागात पाहू.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट
प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)