
>> अस्मिता प्रदीप येंडे
कविता स्फुरण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण शक्ती, आकलन क्षमता आणि स्फूर्ती यासोबतच काव्यप्रतिभा असणं आवश्यक आहे आणि ही वैशिष्टय़े, काव्यप्रतिभा कवयित्री माधुरी वैद्य यांच्याकडे उपजतच आहे. याची प्रचीती त्यांचे साहित्य वाचताना जाणवते. ‘मनमीत’ आणि ‘स्वप्नझुला’ या कवितासंग्रहानंतर त्यांचा ‘युरेका’ हा तिसरा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला.
या कवितासंग्रहात एकूण 36 कविता समाविष्ट केल्या असून त्या कवितांमध्ये सर्व घटकांविषयी भाष्य केले आहे. स्वप्न, स्व या प्रतिमांऐवजी समाजातील समस्या, विसंगती, माणुसकीच्या प्रतिमा, स्त्राr जीवनाचे रंग, परमेश्वराप्रति भाव, हरवत चाललेली माणुसकी, एकाकीपण अर्थात मनातील तळमळ, वेदना, खंत व्यक्त करणारा हा कवितासंग्रह आहे. यातील काही कवितामधून यमक साधले आहे, तर काही मुक्तछंदातील कविता आहेत. कवयित्री माधुरी वैद्य आपल्या आजूबाजूच्या सामाजिक स्थित्यंतरांकडे किती डोळसपणे पाहतात, याची जाणीव होते. अगदी नेमकेपणाने आणि तटस्थपणे त्या प्रत्येक घटकांकडे पाहतात.
एक दिवस स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या महान व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करून त्यानंतर समाजात सुरू असलेली अराजकता, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली फसवणूक यावर ‘स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा’ या कवितेद्वारे कवयित्रीने तिरकसपणे भाष्य केले आहे. ‘तूच अन्नदाता’ कवितेतून कवयित्री पावसाला अधिकारवाणीने विनवणी करत आहे. ‘युरेका’ ही शीर्षक कविता सत्य परिस्थितीवर भाष्य करणारी आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे, पण दुसरीकडे तेच पाणी शेतकऱयाच्या डोळ्यात आहे. शेतकऱयांच्या आत्महत्या, पाणीटंचाई या विषयांवर कवयित्रीने उपहासात्मक प्रहार केला आहे. जीवनाकडे तसेच आजूबाजूच्या घटकांकडे व्यापक दृष्टीने पाहण्याची सजग दृष्टी कवयित्रीकडे आहे, त्याच दृष्टीने टिपलेला हा भवताल ‘युरेका’ कवितासंग्रहात अनुभवायला मिळेल.
युरेका कवितासंग्रह कवयित्री : माधुरी वैद्य
प्रकाशक : शारदा प्रकाशन मूल्य : 100 रुपये































































