
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. इंडिया टुडे वृत्तवाहिनीनं निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या मदतीनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
नोव्हेंबरचा दुसरा आठवडा ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणामध्ये 2018 मध्ये गेल्या वेळेप्रमाणे एकाच टप्प्यात मतदान होऊ शकतं, असं देखील निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं.
छत्तीसगडमध्ये, 2018 मध्ये जसं मतदान झालं त्याचप्रमाणे दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पाचही राज्यांच्या मतदानाच्या तारखा वेगळ्या असू शकतात. 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पाच राज्यांमध्ये एकत्रितपणे मतमोजणी होणार असंही कळतं आहे.
मिझोरमच्या विधानसभेचा कार्यकाळ या वर्षी 17 डिसेंबर रोजी संपत आहे. भाजपचा मित्रपक्ष मिझो नॅशनल फ्रंट (MNF) ईशान्येकडील राज्यात सत्तेत आहे. तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपतो.
के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (BRS) तेलंगणात सत्तेवर आहे. तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारं आहेत.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी, निवडणूक आयोगानं राजस्थान, मिझोराम, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
निवडणूक आयोगानं निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी रणनीती आखण्यासाठी शुक्रवारी निरीक्षकांची बैठक बोलावली आहे.




























































