अतिक, अश्रफची खबर मारेकऱ्यांना कशी मिळाली, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गँगस्टर अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांना 15 एप्रिल रोजी रुग्णालयात नेण्यात येणार आहे याची खबर मारेकऱ्यांना कशी मिळाली? त्यांना घेऊन जाणारे वाहन थेट रुग्णालयात का नेले नाही, असे खरमरीत सवाल सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला करत पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित करत सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितले. याप्रकरणी पुढील सुनावणी आता तीन आठवडय़ांनंतर होणार आहे.

अतिक-अश्रफ हत्याकांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरत सदर हत्याकांडाचा विस्तृत अहवाल मागवला. त्या दिवशी काय घडले, आतापर्यंतच्या तपासात किती प्रगती झाली, हे सरकारने सांगावे. तसेच 24 एप्रिल रोजी झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील आरोपींच्या एन्काऊंटरचा अहवालही न्यायालयाने मागवला. अतिक-अश्रफची कोल्विन रुग्णालयाबाहेर तीन जणांनी गोळय़ा घालून हत्या केली होती. लवलेश तिवारी, सनी सिंग, अरुण मौर्य यांनी गोळय़ा झाडल्यानंतर तत्काळ आत्मसमर्पण केले होते. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.