भाजपवर टीका करणाऱ्या हेरंब कुलकर्णींवर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, लेखक, मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली असून या जीवघेण्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. नगरमध्ये शनिवारी दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्याचे राज्यभरात तीक्र पडसाद उमटल्यानंतर तब्बल 48 तासांनी राज्य सरकार आणि पोलिसांना जाग आली. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप कुलकर्णी यांच्या पत्नीने केला आहे. दरम्यान, भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात कुलकर्णी सातत्याने भूमिका मांडतात, टीका करतात. त्यामुळे या हल्ल्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

हेरंब कुलकर्णी हे आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. त्यांनी सर्वाधिक सेवा नगर जिह्यातील अकोले तालुक्यात केली आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे काम आहे. दारूबंदी, बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. सहा महिन्यांपूर्वी नगरमधील हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून हेरंब कुलकर्णी रूजू झाले.

शाळेभोवतीचे अतिक्रमणे हटविली

सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रूजू झाल्यानंतर कुलकर्णी यांनी आपले सामाजिक व शैक्षणिक काम नेटाने सुरू ठेवले. शाळेभोवती टपऱ्यांचे, हातगाडय़ांचे मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण होते. पान टपऱ्यांवर गुटख्याची विक्री होते. मुलांनी व्यसनापासून दूर रहावे यासाठी कुलकर्णी यांनी अतिक्रमणे हटविण्यासाठी पाठपुरावा केला. ही अतिक्रमणे काढल्यानंतर याची चर्चा नगर शहरात मोठय़ा प्रमाणावर झाली होती.

रस्त्यात गाडी अडवून प्राणघातक हल्ला

हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा यांनी हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘शनिवारी हेरंब कुलकर्णी हे शिक्षक मित्र सुनिल कुलकर्णी यांच्या दुचाकीवरून शाळेतून घरी येत होते. दुपारी 12.18च्या सुमारास रासनेनगर येथे जोशी क्लासेसजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. हल्लेखोरांनी कुलकर्णी यांच्या पायांवर, हातावर आणि डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. हल्लेखोर रॉडचा दुसरा फटका डोक्यावर मारणार तेवढय़ात सुनिल कुलकर्णी यांनी हाताने रॉड अडवला त्यामुळे हेरंब कुलकर्णी थोडक्यात बचावले. हल्ला झाल्यामुळे डोक्यातून रक्त येत होते. कुलकर्णी रस्त्यावर कोसळले. त्यांना तातडीने सुरूवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मॅक्स केअर या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या हाताला, पायाला डोक्याला दुखापत झाली आहे. डोक्याला टाके टाकण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.’ दरम्यान, हल्ल्याचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला असला तरी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही.

भाजपच्या काळात महाराष्ट्र गुंडांसाठी नंदनवन झाले – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांची भेट घेतली आणि धीर दिला. ‘तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत गुह्याचा तपास लागत नाही, गुन्हेगारांना अटक होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करू’, असे सुळे यांनी यावेळी सांगितले. सरकार फोडा, आमदार फोडा याशिवाय या खोके सरकारला दुसरे काय जमते? ट्रिपल इंजिन सरकारला सर्व बाबतीत अपयश आले आहे. नागपूरातही मोठय़ा प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी रोहिणी खडसे, आमदार प्राजक्त तनपुरेंसह राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.

‘एएस’ने एकटय़ाने महाराष्ट्रात फिरावे!

‘देशात ‘एएस’ म्हणजे ‘अदृश्य शक्ती’ कार्यरत आहे. या अदृश्य शक्तीने एकटय़ाने महाराष्ट्रात फिरावे, म्हणजे त्यांना खरा महाराष्ट्र समजेल आणि लोकांच्या भावनाही कळतील,’ असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव न घेता दिले.

पोलीस ठाण्यात चार तास बसवून ठेवले

विद्यार्थ्यांना त्रास होतो म्हणून मी अतिक्रमणाविरुद्ध रीतसर पोलीस आणि पालिकेकडे तक्रार दिली आणि आवाज उठवला. पोलिसांनी चारचाकी गाडय़ांविरुद्ध दंड वसूल केला. काही  विघ्नसंतोषी लोकांनी माझ्यावर हल्ला केला. मी रक्तबंबाळ झालो. मी कसाबसा यातून वाचलो. मी तोफखाना पोलीस ठाण्यात गेलो; पण पोलिसांनी मला चार तास बसवून ठेवले. दुसऱ्या वेळेला माझी फिर्याद घेतली पण काहीच केले नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना फोन आणि पोलिसांचा दबाव

हल्ल्याची घटना घडल्यानंतर पोलीस माझी दखल घेत नसतील तर सर्वसामान्यांचे काय? राज्यात कोण सुरक्षित आहे, असा सवाल हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. मी स्वतः फोन करून मुख्यमंत्र्यांना हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी माझ्यावरच दबाव आणला. मोठय़ांपर्यंत का गेलात, असा उलट प्रश्न मलाच करू लागले, अशी धक्कादायक माहिती हेरंब कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, कुलकर्णी यांच्या हल्ल्याचे वृत्त राज्यभर पसरले. सोशल मीडियावर तीक्र प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर पोलीस जागे झाले. नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कुलकर्णी यांची भेट घेऊन विचारपूस केली.