
>> शिबानी जोशी
अरुण दाते यांच्या पुत्राने म्हणजेच अतुल दाते यांनी देवांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘स्वर आले दुरूनी’ या यशवंत देवांच्या 70 वर्षांच्या सूरमयी प्रवासाची जादू उलगडणार्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
मराठी संगीत क्षेत्रातला देवमाणूस 30 ऑक्टोबरला देवाघरी गेला, परंतु मराठी भावगीत क्षेत्रात आपली अवीट छाप त्यांनी अशी काही सोडली आहे की, या सहजसोप्या रसाळ संगीताच्या रूपाने हा देवमाणूस म्हणजे ‘यशवंत देव’ अमर झाले आहेत. भावगीताचे बादशहा अरुण दाते यांच्याशी त्यांचे अगदी करीअर सुरू झाले तेव्हापासून संबंध होते. म्हणजे अरुण दाते यांनी रेडिओवर एक गझल गायली होती. त्यांचा आवाज ऐकून यशवंत देव यांनी श्रीनिवास खळे यांना ‘‘या मुलाची गझल उद्या पुन्हा रेडिओवर लावणार आहोत, तुम्ही ऐका’’ असे सांगितले होते आणि ती ऐकून खळेंनी अरुण दातेंना बोलावून घेतले आणि ‘शुक्रतारा मंद वारा’ या गाण्याचा जन्म झाला होता आणि म्हणूनच अरुण दाते यांच्या पुत्राने म्हणजेच अतुल दाते यांनी देवांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘स्वर आले दुरूनी’ या यशवंत देवांच्या 70 वर्षांच्या सूरमयी प्रवासाची जादू उलगडणार्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. अरुण दाते यांचा ‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम त्यांनी नव्या दमाच्या गायक- निवेदकांबरोबर सुरूच ठेवला आहे आणि आता त्यांच्याच काळातले यशवंत देव यांच्या संगीताचा नजराणा उलगडणारा ‘स्वर आले दुरूनी’ हा कार्यक्रम ते रंगभूमीवर आणत आहेत. यशवंत देवांवरच कार्यक्रम करावासा का वाटला याची अनेक कारणे अतुल दाते सांगतात. अरुण दाते यांच्या निवर्तण्यापूर्वी दोन दिवस आधीच त्यांच्या शेवटच्या गाण्याला देव यांनी चाल दिली होती व ते रिलीज झाले होते. ते गाणे रामूभैया दाते यांच्यावर मंगेश पाडगावकर यांनी लिहिले होते. ते गाणे रिलीज व्हावे अशी अरुण दाते यांची इच्छा होती म्हणून देवांकडे अतुल दाते सकाळी 10 वाजता गाणे घेऊन गेले होते. 90 वर्षांच्या देवांनी संध्याकाळी 5 वाजता फोन करून सांगितले होते, ‘‘गाणं तयार आहे.’’
देवसाहेबांचे त्यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी निधन झाले तर अरुण दाते यांचे त्यांच्या वाढदिवसानंतर दोन दिवसांनी निधन झाले होते. अनेक वर्षांचे देव-दाते कुटुंबाचे ऋणानुबंध व्यक्त करावेत म्हणून ‘स्वर आले दुरूनी’ची निर्मिती झाली आहे असे अतुल दातेंनी सांगितले. 70 वर्षांत वेगवेगळ्या प्रकारची गीतं देव यांनी सादर केली. त्याच्या कथा, गमतीजमती असा सर्व पट यातून उलगडून दाखवला जाणार आहे.
‘स्वर आले दुरूनी’, ‘कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे’ अशी देवांनी लिहिलेली अनेक गाणी चिरस्मरणात राहण्यासारखी आहेत. जसं गदिमा-फडके यांचे ‘गीतारामायण’ होतं तसेच गदिमा- सचिन शंकर बॅलेच्या ‘कथा ही राम-जानकीची’ या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिलं होतं. ‘अशी पाखरे येती’, ‘अखेरचे येतील माझ्या’ अशी देव यांनी संगीत दिलेली असंख्य गीतं मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
यशवंत देव यांच्याकडे सुमन कल्याणपूर यांच्यापासून अनेक गायिकांनी गाण्याचे मार्गदर्शन घेतले व आज त्या नामवंत गायिका म्हणून घडल्या आहेत. तसेच अरुण दाते यांच्याबरोबर
‘शुक्रतारा’ या कार्यक्रमातून 115 गायिकांनी सह-गायिका म्हणून साथ दिली. या दोघांमधील साधर्म्य, त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आपल्याला माहीत आहेत आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत्या 23 नोव्हेंबरला देव यांना पहिली स्वरांजली वाहिली जाणार आहे. पहिला कार्यक्रम रसिकांसाठी खास विनामूल्य ठेवला आहे. अरुण दातेंबरोबर गायलेले मंदार आपटेसारखे कलाकार डॉ. श्रीरंग भावे, अर्चना गोरे, सुवर्णा कागल ही गीते गाणार आहेत. तसेच देव यांची गाणी, किस्से, आठवणींचा जागर अनघा मोडक जागवणार आहेत.




























































