
यजमान ऑस्ट्रेलियाला आपल्या सलामीच्या लढतीतच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आज मार्क स्टोयनिसने 18 चेंडूंतच 58धावा ठोकल्या. त्याने 4 चौकार आणि 6 षटकारांची आतिषबाजी करीत आपल्या संघाला पर्थमध्ये विजयपथावर नेले. यजमानांनी श्रीलंकेचे 158 धावांचे आव्हान 7 विकेट आणि 21 चेंडू राखत सहजगत्या गाठले.
श्रीलंकेकडून मिळालेले 158 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 16.3 षटकांत सहज पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नर (11) व त्याच्या जागेवर आलेला मिचेल मार्श (18) यांनी संथ सुरुवात केली. दुसरा सलामीवीर कर्णधार ऍरोन फिंचही संयमानेच खेळत होता. ग्लेन मॅक्सवेल 12 चेंडूंत 23 धावा काढून बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची 12.2 षटकांत 3 बाद 89 अशी अवस्था झाली होती. इथपर्यंत सामना दोलायमान स्थितीत होता. मात्र त्यानंतर आलेल्या मार्क्स स्टोयनिसने 18 चेंडूंत नाबाद 59 धावांची खेळी करीत ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला. त्याच्या धडाकेबाज खेळीला 6 टोलेजंग षटकारांसह 4 सणसणीत चौकारांचा साज होता. फिंचने 42 चेंडूंतील नाबाद 31 धावांच्या खेळीत एक षटकार लगावला. श्रीलंकेकडून धनंजया डिसिल्व्हा, चमिका करुणारत्ने व महिश थिक्षषा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रीलंकेला 157 धावांत रोखले
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 6 बाद 157 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. यात सलामीवीर पथुम निसांका (40), धनंजया डिसिल्व्हा (26) व चरिथ अस्लंका (नाबाद 38) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने 12 वाईड धावांसह एकूण 23 अवांतर धावांची खुराकही श्रीलंकेला बहाल केल्याने या संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. कुसल मेंडिससह (5), भानुका राजपक्षे (7) व कर्णधार दासून शनाका (3) हे स्टार फलंदाज अपयशी ठरल्याने श्रीलंकेला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एश्टन एगर व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऍडम झम्पाला कोरोनाची लागण
स्टार फिरकी गोलंदाज ऍडम झम्पाला कोरोनाची लागण झाल्याने ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्धच्या लढतीपूर्वी मोठा धक्का बसला. आयसीसीच्या नवीन कोविड-19 नियमानुसार कोरोना झालेल्या खेळाडूला खेळण्याची परवानगी आहे, मात्र ऑस्ट्रेलियाने झम्पाला विश्रांती देऊन त्याच्या जागेवर एश्टन एगरला संधी दिली. ऍडम झम्पाला कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने तो लवकरच ताजातवाना होऊन संघात परतेल, अशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आशा आहे.




























































