
स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला पराभूत करत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले. तब्बल साडेपाच तास रंगलेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेवचा 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 असा पराभव केला. या विजेतेपदासह नदालच्या खात्यात आता सर्वाधिक 21 ग्रँडस्लॅम जेतेपदे झाली असून त्याने इतिहास रचला आहे.
पहिला सेट सहज जिंकल्यानंतर मेदवेदेवला दुसरा सेट जिंकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या सेटमध्ये नदालने चांगली सुरुवात केली होती आणि तो मेदवेदेवच्या पुढे होता. मात्र, नंतर मेदवेदवेने पुनरागमन केले आणि 6-6 अशी बरोबरी साधली. यानंतर अखेरच्या मिनिटात त्याने चांगला खेळ करत दुसरा सेट 7-6 असा जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये मेदवेदेव नदालला पुन्हा मागे टाकेल, असे वाटत होते. पण नदालने आपल्या अनुभवाचा पुरेपुर वापर करत खेळात नियंत्रण राखले. त्याने या सेटमध्ये जास्त चुका न करता हा सेट 6-4 असा नावावर केला. पुढच्या सेटमध्येही नदालने चांगला खेळ केला. मेदवेदेव काही गुण घेत राहिला, पण नदालने चौथा सेटही 6-4 असा जिंकला. पाचव्या सेटमध्ये सामना 5-5 अशा स्थितीत आल्याने चुरस वाढली होती. मात्र, नदालने पाचवा सेट 7-5 असा जिंकत विजय नावावर केला. या विजयामुळे 21 ग्रँडस्लॅम त्याच्या नावावर झाली आहेत. असा विक्रम करणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला आहे. टेनिसमधील रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.




























































