दहा रूपयांसाठी वादातून रिक्षाचालकाला भोसकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पनवेल

अवघ्या दहा रुपयांवरून झालेल्या वादातून पनवेल स्थानकाजवळ एका रिक्षाचालकाला भोसकण्यात आले आहे. पोलिसांनी या रिक्षाचालकावर हल्ला करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनी केलेल्या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला एमजीएम रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे.

रविवारी अक्षय शिंदे याने त्याच्या करंजाडे इथल्या घरी जाण्यासाठी पनवेल स्थानकाजवळून शेख याची रिक्षा केली. शेख याने अक्षयला ६० रूपये भाडं होईल असं सांगितलं होतं जे अक्षयने मान्य केलं. मात्र घराजवळ उतरताच अक्षयने आपल्याकडे फक्त ५०च रुपये असल्याचं सांगितलं. यावरून शेख याने अक्षयशी वाद घातला. तिथे या दोघांमध्ये हाणामारी देखील झाल्याचं सांगण्यात येतंय. यानंतर शेख तिथून निघून गेला. अक्षयने शेखला धडा शिकवण्यासाठीत्याच्या दोन साथीदारांना बोलावले आणि पुन्हा पनवेल स्टेशन गाठले. या तिघांनी शेखला शोधून काढलं आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

शेखला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघताच अक्षय आणि त्याचे मित्र पळून गेले. इतर रिक्षाचालकांनी शेखला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.