
सामना ऑनलाईन । अयोध्या
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. अयोध्यावासीयांबरोबरच संत-महंतांमध्ये उदंड उत्साह आहे. देशभरातून दाखल होणारे असंख्य शिवसैनिक आणि कार्तिक स्नानासाठी दूरवरून आलेले हजारो भाविक यांनी अयोध्यानगरी व्यापली आहे. प्रत्येक चौक आणि वळणावर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कमानी उभारल्या गेल्या आहेत. फैजाबादपासून अयोध्येपर्यंत होर्डिंग्ज, बॅनर्स आणि पोस्टर्स झळकली आहेत. बाबरी उद्ध्वस्त करणारे शिवसैनिकच आता रामजन्मभूमीवर रामलल्लाचे भव्य मंदिर उभारतील, अशी खात्री तमाम हिंदू भाविक आणि संत-महंत व्यक्त करत आहेत.
अयोध्येतील लक्ष्मण किला येथे होणाऱया सन्मान सोहळा आणि आशीर्वादोत्सव कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन चाणक्य परिषदेच्या वतीने शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी शिवसेना नेते व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, खासदार राजन विचारे, पंडित अमरनाथ मिश्रा आदी उपस्थित होते.
सर्व संत महंतांनी शिवसेनेच्या या निमंत्रणाचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. राममंदिर निर्मितीचा संकल्प घेऊन येणारे उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात आपण निश्चितच सहभागी होऊ असे संतमहंतांनी सांगितले. बरोबरच शिवसेनाच अयोध्येत राममंदिर उभारू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी हजारोंच्या संख्येने संतमहंत उपस्थित राहतील असे पंडित अमरनाथ मिश्रा यांनी सांगितले.
पुणे येथून आलेले निवृत्त न्यायाधीश अरुण बच्छा यांनी राममंदिर निर्मितीसाठी शिवसेनेने घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली. अयोध्या हे हिंदूंचे प्रमुख तीर्थस्थळ असल्याने इथे श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले गेलेच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अयोध्येत शरयू नदीत कार्तिक स्नानासाठी आलेले वांद्रय़ाच्या खेरवाडीचे मलकान सैनी यांनी राम मंदिराला भाजप जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचे सांगितले. मंदिर उभारले गेले तर आपल्या हाती काहीच मुद्दा उरणार नाही, अशी भीती भाजपाला वाटत असल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱया शरयू आरतीला आपणही उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निमंत्रणपत्रिकेनुसार 24 नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता लक्ष्मण किला येथे सन्मान सोहळा व आशीर्वादोत्सव होणार आहे. त्यात उद्धव ठाकरे हे यजमान असतील आणि संतमहंत त्यांना विधिवत आशीर्वाद देतील. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. पंडित अमरनाथ मिश्र आहेत. रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत श्री नृत्यगोपालदास महाराज हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यांच्यासोबत लक्ष्मण किलाधीश महंत मैथिलीशरणजी महाराज आणि प्रमुख अतिथी म्हणून श्री वल्लभाकुंजचे अधिकारी व वासुदेव घाटाचे रामकुमारदास महाराज उपस्थित राहणार आहेत.
वैकुंठ मंडप कटराचे श्यामनारायणाचार्य महाराज, द्वारकाधीश मंदिराचे सूर्यनारायणाचार्य महाराज, दिगंबर आखाडाचे महंत सुरेशदास महाराज, उदासीन रानोपालीचे डॉ. भरतदास महाराज, हरिद्वारीपट्टी हनुमान गढीचे मुरलीदास महाराज, श्रीरामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी सतेंद्रदास महाराज, आंजनेय सेवा संस्थानचे महंत शशिकांतदास महाराज, रामकोटचे महंत रामदास महाराज, हनुमान गढीचे महंत धर्मदास महाराज आणि महंत गौरशंकरदास महाराज, श्री शरयू मंदिर राम की पैडीचे नेत्रजा प्रसाद मिश्र, स्वर्गद्वारचे महंत रामचरित्रदास महाराज, पत्थर मंदिराचे महंत मनीषदास महाराज, रामनगर येथील क्षीरेश्वरनाथ मंदिराचे महंत रामाज्ञा प्रसाद मिश्र, मातगैडचे बाबा शिवशंकरदास आणि सोनादेवी मार्गचे संत एम. बी. दास महाराज हे या कार्यक्रमाचे मुख्य संरक्षक संतजन आहेत.
या कार्यक्रमाच्या मुख्य संरक्षक मंडळात श्रीरामजन्मभूमी विराजमान श्रीरामललाजी, श्री कनकभवन सरकार, हनुमान गढीचे हनुमान महाराज, श्री नागेश्वरनाथ, श्री देवकाली आणि श्री शरयू महाराणी आहेत. कार्यक्रमाच्या आयोजन मंडळात अखिल भारतीय चाणक्य परिषदेचे पंडित कृपानिधान तिवारी, करणी सेनेचे महासचिव शिवेंद्र सिंह, बसंत बिहाय महाराज, अयोध्या वाचक संघाचे अध्यक्ष चतुर्भुजाचार्य, मैथिली रमण सेवा संस्थेचे अध्यक्ष जयरामदास महाराज, अयोध्या समन्वय समितीच्या उपाध्यक्ष नेहा सिंह, महामंत्री रजनीकांत मिश्र, अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे अवनीश सिंह, कौशलेंद्र सिंह, भूपेंद्र सिंह, वेदाचार्य चैतन्य द्विवेदी, शिवशक्ती संघटनेचे वेंकटाचारी राजगोपाल, कायस्थ समन्वय समितीचे शेखर कुमार, अखिल भारतीय हिंदू महासभेचे चंद्रप्रकाश मिश्र, अच्युत शंकर शुक्ल, पंडित चंद्रप्रकाश कौशिक, अखिल भारतीय युवा सोनकर सभेचे संजय सोनकर, अखिल भारतीय यादव महासभेचे ओ. पी. यादव, उत्तर प्रदेश व्यापारी सभेचे अरुण मिश्र, अखिल भारतीय कुर्मी महासभेचे अनिरुद्ध देव त्रिपाठी आणि चंद्रप्रकाश वर्मा, अखिल भारतीय वाल्मकी समितीचे सुरेश विजय वाल्मीकी आणि आशुतोषानंद त्रिपाठी तसेच समस्त अयोध्यावासी रामभक्त आहेत.
विविध संस्थांनीही या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले आहे. त्यात आंजनेय सेवा संस्थान, अयोध्या कथा वाचक संघ, अयोध्या संस्कृत शिक्षक मंडळ, श्री नागेश्वरनाथ मंदिर सेवा ट्रस्ट, अखिल भारतीय चाणक्य परिषद, अयोध्या तीर्थ पुरोहित समाज, श्रीरामजन्मभूमी सेवा समिती, श्री क्षीरेश्वरनाथ महादेव सेवा समिती, अखिल भारतीय मैथिली सेवा संस्थान, अवध वेद प्रचार सेवा संस्थान, माँ शरयू नित्य आरती सेवा समिती, आंतरराष्ट्रीय शिवभक्ती भक्त संघटना, कायस्थ समन्वय समिती, अखिल भारत हिंदू महासभा, अखिल भारतीय युवा सोनकर समाज, राजपूत करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा युवा, उत्तर प्रदेश व्यापारी मंडळ, अखिल भारतीय कुर्मी महासभा, राजपूत करणी सेना, अखिल भारतीय भोजपुरी समाज, अखिल भारतीय वाल्मीकी समिती आणि श्री प्रेम प्रभा कुंज धर्मार्थ सेवा ट्रस्ट यांचा समावेश आहे.
चर्चा आणि प्रतीक्षा फक्त उद्धव ठाकरे यांचीच
अयोध्यावासीय उद्धव ठाकरे यांची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अयोध्येत फक्त एकच चर्चा आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची. यापूर्वी कोणत्याही राजकीय नेत्याला असे भाग्य लाभले नाही असे खुद्द अयोध्येतील नागरिक सांगत आहेत. मंदिर निर्मितीसाठी शिवसेनेने उचललेल्या या पावलाची अयोध्यावासीय प्रशंसा करत आहेत. उद्धव ठाकरेच राम मंदिर उभारू शकतील, असा विश्वास स्थानिक मूर्तिकार विष्णू विश्वकर्मा यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे अयोध्येला येणार, अशी माहिती मिळताच उत्तर प्रदेशच्या विविध भागांतून हिंदू बांधव अयोध्येला पोहोचत आहेत. गोरखपूर येथून आलेले चौहान कुटुंबीय यांनी राममंदिराची निर्मिती हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न असल्याची प्रतिक्रिया दिली.
संत-महंतांनी आदरपूर्वक स्वीकारले शिवसेनेचे निमंत्रण
रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृत्यगोपालदास यांना आज ही निमंत्रण पत्रिका देण्यात आली. याशिवाय रंग महलचे महंत राम शंकर दास, तिवारी मंदिर तीन कलशवाले येथील महंत गिरीशपती त्रिपाठी, रामचरित्र मानस भवनचे महंत अर्जुनदास, हनुमानगढीच्या अनी आखाडय़ाचे राष्ट्रीय महासचिव महंत गौरीशंकर दास, रामजन्मभूमीचे पक्षकार महंत धर्मदास यांनाही आशीर्वादोत्सव कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण खासदार संजय राऊत यांनी दिले.

























































