राम मंदिराच्या संपूर्ण उभारणीसाठी आणखी तीन वर्षे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक तितकेच म्हणजेच रामरायाला विराजमान करण्याइतपत बांधकाम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम फक्त होणार आहे. रामरायाच्या दर्शनासाठी सुविधा 22 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे; परंतु प्रत्यक्षात संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होण्यासाठी आणखीन तीन वर्षांचा कालावधी लागेल असे श्रीराम जन्मूभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी स्पष्ट केले.

मंदिराच्या दोन मजल्याची उभारणी व्हायची आहे. परकोटय़ाच्या आत सहा मंदिरे होणार आहेत आणि परकोटय़ाच्या बाहेर सात मंदिरे होणार आहेत. असे सांगून गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, प्राणप्रतिष्ठsसाठी आवश्यक तितकेच म्हणजेच रामरायाला विराजमान करण्याइतपत बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. हे ऐतिहासिक मंदिर असून त्याचे काम तीन वर्षात पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. मंदिराच्या वरच्या मजल्याचे काम चालू राहील. प्रभू रामरायाने कपडय़ाच्या तंबूमध्ये अनेक वर्षे काढली. त्यामुळे लवकरात लवकर रामरायला प्राणप्रतिष्ठा करून विराजमान करण्याची आम्हालाही घाई आहे. गणपती मंडळाने एखादा देखावा उभा करावा अशा प्रकारचे हे काम नाही. हजारो वर्षे टिकेल असे मंदिर उभे करायचे आहे. त्यासाठी वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले.

आमचा दृष्टिकोन भक्तीभावाचा

अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भाजपकडून घाई केली जात आहे या प्रश्नावर स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे विचार करीत असतो. आमचा दृष्टिकोन भक्तीभावाचा असून, ज्यांचा राजकारणाचा आहे, त्यांना असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु राम मंदिर दर्शन सर्वांसाठी 22 जानेवारीपासून अव्याहतपणे राहील.