
पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून दोनजणांनी एकाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना नगर तालुक्यातील चास येथे घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल कनका मोरे (वय 19, रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. हनुमंत नरसू गायकवाड (वय 24), सूरज लक्ष्मण मोरे (वय 22, दोघे रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
मंगळवारी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास आरोपी आणि मोरे यांच्यामध्ये वाद झाले होते. यावेळी राहुल मोरे याने सूरज मोरे याच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले. या रागातून हनुमंत गायकवाड आणि सूरज मोरे या दोघांनी दोरीने गळा आवळून राहुल मोरे याचा खून केला. यानंतर आरोपींनी मृतदेह त्याठिकाणीच ठेवला होता. बुधवारी सकाळीच आरोपी हनुमंत गायकवाड याने शहरातील कोतवाली पोलीस ठाणे गाठत खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. यासंदर्भात कोतवाली पोलिसांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली.
नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. नगर तालुका पोलिसांनी राहुल मोरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. आरोपी सूरज मोरे याला बाबुर्डी घुमट येथून नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

























































