बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाचे दैवतच -प्रा.शशिकांत गाडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे राज्याच्या राजकारणात इतका दिर्घकाळ एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व अन्य कुठल्याही राजकीय नेत्याने केले नाही हे सत्य आहे. निर्भिड, बेधडक व सडेतोडपणा या त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे तसेच प्रेमळ व तितकाच मायेचा आधार देणाऱ्या स्वभावामुळे शिवसैनिक त्यांना आपले दैवत मानत. त्यांचा शब्द म्हणजे शब्दच असायचा. त्यामुळेच इतका दीर्घकाळ त्यांनी मराठी जनतेच्या हृदयावर राज्य केले. असा नेता पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.

नगर जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे, समन्वयक घनश्याम शेलार, उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, पं.स.सभापत रामदास भोर, जि.प.सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, संदिप गुंड, प्रविण कोकाटे, सुंदर मोकाटे, योगेश लांडगे, जीवा लगड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व शिवसैनिक राबवतात. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचेच काम पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. बाळासाहेबांनी अनेकांना उभे करण्याचे काम केले. मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच आज शिवसैनिक ताठ मानेने उभा आहे.

याप्रसंगी घनश्याम शेलार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत, त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच शिवसैनिक काम करत आहे. त्यामुळे आज सर्वस्तरामध्ये शिवसेना काम करत आहे. सर्वसामान्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी चेतना जागृत करुन शिवसैनिक तयार केला आहे आणि तो कधी मोडणार नाही, झुकणारही नाही. बाळासाहेब ठाकरे हे सर्वसामान्यांना न्याय देणारे होते, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी रावसाहेब खेवरे, अनिल कराळे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांनी केले तर जिवा लगड यांनी आभार मानले.