वांद्रे-कुर्ला भाभा, राजावाडी रुग्णालयातही आयसोलेशन थर्मल स्क्रिनिंग ओपीडी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना’चा सामना करण्यासाठी पालिकेने आता वांद्रे भाभा रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातही थर्मल क्रिनिंग ओपीडी, आयसोलेशन विभाग आजपासून सुरू केला आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांसह वांद्रे भाभा – 10 खाटा, कुर्ला भागा – 10 आणि राजावाडी रुग्णालयात 25 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘कोरोना’चा वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर कस्तुरबा, सेव्हन हिल्स रुग्णालयासह पालिकेने खासगी रुग्णालयांमध्ये क्वारेंटाइन-उपचारांसह आरोग्य सुविधा देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये खासगी रुग्णालयांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून क्वारेंटाइनसाठी मुंबई विमानतळ परिसरातील पाच हॉटेलमध्ये व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी क्वारेंटाइनमध्ये असणाऱयांवर पालिकेच्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येत आहे. शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयात 540 रुग्ण तपासणीसाठी आले. 114 रुग्ण संशयित आढळले. यातील 83 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून शिल्लक राहिलेल्यांचे अहवाल उद्यापर्यंत येणार आहे. दरम्यान, परदेशातून येणाऱया प्रकाशांची तपासणी केली जात असून त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लक्षणे नसली तरी परदेशातून आलेल्यांनी 14 दिवस काळजी घ्यावी, इतरांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

‘केईएम’मध्ये लॅब सुरू

‘कोरोना’ चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात लॅबची सुविधा आहे. आता ही सुविधा पालिकेच्या ‘केईएम’ रुग्णालयातही सुरू करण्यात आली आहे. गरज भासल्यास खासगी लॅबमध्येही कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य-केंद्र सरकारच्या परवानगीनंतर या लॅब सुरू करण्यात येणार आहेत.