मिंधे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष, दिव्यांग निधीसाठी उपोषण करणाऱया बालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याची राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे मिंधे सरकार आठ दिवसांतच तोंडावर पडले आहे. दिव्यांगांना देण्यात येणारा निधी मिळत नसल्याने चिखर्डे येथे उपोषणास बसलेल्या संभव रामचंद्र कुरुले या अल्पवयीन दिव्यांग मुलाचा आज मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वी त्याची बहीण वैष्णवीचाही उपोषणादरम्यानच मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे जिह्यात खळबळ उडाली असून, मुर्दाड मिंधे सरकार आणि बेजबाबदार प्रशासनाने दोन उपोषणकर्त्या अल्पवयीन दिव्यांगांचा बळी घेतल्याचा आरोप केला जात आहे.

बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे राहणारे कुरुले कुटुंबीय ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना देण्यात येणारा निधी मिळत नसल्याने चिखर्डे येथील स्मशानभूमीत संभव रामचंद्र कुरुले (वय 10) याच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसलेले होते. 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या दिव्यांगांच्या मागणीकडे ना सरकारने लक्ष दिले, ना स्थानिक प्रशासनाने. उपोषणादरम्यानच संभवची प्रकृती खालावल्याने त्याला बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, कुरुले यांच्या कुटुंबातीलच दिव्यांग मुलगी वैष्णवी हिचा 28 ऑगस्ट रोजी उपोषणादरम्यानच मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रशासनाने 15 दिवसांत मुख्यमंत्री साहाय्यता निधी व राजीव गांधी साहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत उपोषण स्थगित करण्यास भाग पाडले होते. गेल्या चार महिन्यांत उपोषणकर्त्यांना दिलेली आश्वासने राज्यशासन व स्थानिक प्रशासन पूर्ण करू शकले नाही. प्रशासनाच्या निषेधार्थ व दिव्यांग निधी मिळविण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून रामचंद्र कुरुले, मयत संभव कुरुले, अमर पाटील, नंदकुमार मिरमकर, ज्ञानेश्वर बळी उपोषणास बसले होते. बंदोबस्तासाठी पोलीसही तैनात होते, तरीही अल्पवयीन दिव्यांग मुलाचा उपोषणादरम्यान बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. उपोषणकर्ते कुरुले कुटुंबीयांनी संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.