प्रेमी युगुलांच्या शोले स्टाईल ड्रामा, लग्नासाठी पाण्याच्या टाकीवर ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या लग्नाला घरच्याकडून संमती मिळावी म्हणून प्रेमी युगुलांनी शोले स्टाईल ड्रामा केला. तब्बल दहा तास पाण्याच्या टाकीवर ठिय्या मांडला. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचे कुटुंब आणि पोलीस समजूत काढत होते. कुटुबियांनी लग्नाला होकार हे प्रेमीयुगुल अखेर खाली उतरले.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील तरूण कामानिमित्त हिंगोलीमध्ये वास्तव्यास राहायला आहे. हिंगोलीच्या वास्तव्याच्या दरम्यान त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. या प्रेमसंबंधाची कुणकुण मुलाच्या कुटुंबियांना झाली. ती महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत, हे ही त्यांना कळाले. मुलाच्या कुटुंबियांनी त्याला परत बीडला घेऊन आले. मात्र हा तरूण बीडमधून पुन्हा पळून गेला. यानंतर पुन्हा महिनाभराच्या शोधानंतर कुटुंबियांनी त्याला बीडमध्ये आणले. दरम्यान प्रेमसंबंध निर्माण झालेली महिला रविवारी बीडमध्ये आली. दोघांची भेट झाली. आपल्या लग्नासाठी होकार मिळावा म्हणून हे प्रेमीयुगुल शहरातील अंबिका चौक भागात असणाऱ्या अमृत अटल योजनेच्या पाण्याच्या टाकीवर चढले. आपण टाकीवर चढलो आहोत आणि लग्नासाठी आत्महत्या करणाार आहोत, असा फोन मुलाने आपल्या कुटुंबियांना केला. तरूणाचे कुटुंबीय हादरले. पाण्याच्या टाकीकडे त्यांनी धाव घेतली. शिवाजीनगर पोलिसांनाही घटनेची माहिती कळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हळूहळू बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली. साडेनऊ वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. अखेर कुटुंबियांनी लग्नाला होकार दिल्यानंतर हे प्रेमीयुगुल खाली उतरले.