आष्टीचा रांगडा गडी राष्ट्रवादीच्या तोफा गारद करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी। बीड

आगामी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तोफा गारद करत त्यांचे आक्रमण थोपवण्याची जबाबदारी राष्ट्रवादीतील सर्व बड्या नेत्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास असणारे भाजपा आमदार सुरेश धस यांच्या खांद्यावर टाकली जाणार आहे. भाजपा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचाराची मोठी भिस्त धसावर असणार आहे .प्रत्येक आरोप – प्रत्यारोपाचा समाचार घेण्यासाठी धस यांचा वापर केला जाणार असल्याने बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे.

गत लोकसभा निवडणुकीत दस्तुरखुद्द स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात मैदानात उतरणारे सुरेश धस या निवडणुकीत भाजपा कडून बीड लोकसभेचे सारथ्य करणार आहेत, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत विजय मिळवत सुरेश धसाना भाजपा कडून आमदारकी मिळाली. बीड जिल्ह्याच्या राजकारणात हुकमी एक्का म्हणून धस यांच्याकडे पाहिले जाते , गावरान आणी शिवराळ भाषेत त्यांनी केलेल्या टीकेला विरोधकांना निरुत्तरच व्हावे लागते, याचाच फायदा बीड लोकसभेसाठी भाजपा घेणार आहे, राष्ट्रवादीच्या तोफा गारद करण्याची जबाबदारी सुरेश धस यांच्यावर असणार आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार प्रकाश सोळुंके हे राष्ट्रवादीचे प्रमुख अस्त्र असणार आहेत. यांची आक्रमणे फक्त सुरेश धस हेच थोपवू शकतात, राष्ट्रवादी मध्ये दहा वर्षांचा कालखंड घालवल्यामुळे सर्वांच्या कुंडल्या धस यांना माहीत आहेत, विधानपरिषदेत अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी जी भूमिका बजावली तीच भूमिका या निवडणुकीत ते बजावणार आहेत त्यामुळे आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी आणि निवडणुकीतील टीका कोणत्या पातळीवर जातात हे आगामी काळात दिसून येणार आहे.