
दिव्यांग मूल असल्यास ‘बेस्ट’च्या पुरुष कर्मचाऱयांनाही आता 730 दिवसांची भरपगारी बालसंगोपन रजा मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पालिकेच्या महासभेने मंजुरी दिली आहे. पहिल्या दोन अपत्यांकरिता आणि संबंधित मूल वयाची 22 वर्षे पूर्ण करेपर्यंत ही सुविधा मिळणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज ही माहिती दिली.
विकलांग व्यक्तीचे हक्क अधिनियम 2016 च्या कलम – 2 (2) नुसार महिला किंवा पत्नी हयात नसलेल्या पुरुष कर्मचाऱयांना संपूर्ण सेवा कालावधीमध्ये दिव्यांग मुलाच्या संगोपनाकरिता संपूर्ण सेवा कालावधीमध्ये भरपगारी 730 दिवसांची रजा घेता येते. ही सुविधा ‘बेस्ट’च्या कर्मचाऱयांना मिळावी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे याबाबतच्या प्रस्तावाला ‘बेस्ट’ समितीने मंजुरी दिली होती. याबाबतच्या ठरावाला पालिकेच्या महासभेनेही मंजुरी दिली. या निर्णयामुळे दिव्यांग पाल्य असलेल्या कर्मचाऱयांना फायदा होणार असल्याचे ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, बाल संगोपन रजा मिळण्याकरिता अर्ज करण्यासाठी विकलांगतेबाबतचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आकश्यक आहे. तसेच बाल संगोपन रजा ‘हक्क’ म्हणून दावा करता येणार नाही. सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्वमान्यतेनेच रजेचा लाभ घेता येणार असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा असणार अटी…
– विशेष बाल संगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्यापूर्वी जेवढे वेतन प्राप्त होत असेल तेवढेच वेतन रजा वेतन म्हणून देण्यात येणार आहे. अपत्याच्या गंभीर परिस्थितीमुळे रजा घेणे आवश्यक असल्यास याबाबत रजा मंजूर करणाऱया सक्षम प्राधिकारी यांना समाधानकारक उत्तर देणे आवश्यक आहे.
– महिला/पुरुष कर्मचाऱयांची एका विभागांमधून दुसऱया विभागामध्ये बदली करण्यात आली तरी सेवेच्या एकूण कालावधीमध्ये कर्मचारी 730 दिवसांच्या या रजेसाठी पात्र असणार आहे. कोणत्याही अन्य रजेकरिता अर्ज केल्यास, ही रजा विशेष बाल संगोपन रजेला जोडून घेता येईल. मात्र अशा कोणत्याही रजेचा कालावधी एक वर्षापेक्षा अधिक असणार नाही.
– विकलांग अपत्य संबंधित कर्मचाऱयांवर अवलंबून असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित कर्मचाऱयांना सादर करणे आवश्यक आहे. मूल 40 टक्के विकलांग असणे गरजेचे आहे. वयाच्या 22 वर्षांपर्यंत ही रजा मिळणार आहे.
































































