भागुबाई खिचडिया क्रिकेट स्पर्धा : स्वामी विवेकानंद शाळेला विजेतेपद

बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेने खार जिमखाना आयोजित भागुबाई खिचडिया या 16 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी रिझवी स्प्रिंग फील्ड, वांद्रे या शाळेवर 5 विकेट्सनी मात करून विजेतेपदाचा गवसणी घातली. रिझविला 131धावांत गुंडाळणाऱ्या स्वामी विवेकानंद शाळेने विजयाचे लक्ष्य केवळ 5 विकेट्स गमावून 18.2 षटकांत पार केले. राष्ट्रीय क्रिकेट निवडसमितीचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. खार जिमखान्याच्या अध्यक्ष विवेक देवनानी (पॉली), द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड, एम.सी.ए. कमिटी मेंबर अभय हडप, भागुभाई खिचडिया स्पर्धेचे चेअरमन इक्बाल भाभा, खार जिमखाना चे सचिव साहिब सिंग लांबा, स्पर्धा सचिव उदय टंक, खार जिमखाना क्रिकेट सचिव सतीश रंगलानी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद शाळेने नाणेफेक जिंकून रिझवीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामन्याच्या पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर बाली मिळविणाऱ्या आदित्य सोनघरे याने आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला पुरते नामोहरम केले. त्याने या लढतीत 49 धावांत 5 बळी मिळवून रिझवी स्प्रिंगफिल्ड संघाला 131 धावांतच गुंडाळण्याची करामत केली. त्याला अर्णव लाड याने 40 धावांत 3 बळी मिळवत मोलाची साथ दिली. रिझवी तर्फे कर्णधार देवेश राय यानेच झुंजार फलंदाजी करीत 48 धावांची खेळी केली. मात्र त्यांच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली. शुभम पलाई (16) आणि मीट पटेल (17) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्वामी विवेकानंद शाळेने 29धावांत 2 बळी गमावले होते.मात्र युग असोपा (54) आणि अद्वैत कांदळकर (47) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी करून प्रतिस्पर्धी संघाच्या आव्हानात हवाच काढून टाकली. केवळ 18.2 षटकांत त्यांनी 5 विकेट्स गमावून विजयी लक्ष्य गाठले.