
पूर्व विदर्भाची जबाबदारी मिळाल्या नंतर शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हे पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
”आज बाळासाहेब हयात पाहिजे होते. त्यांची चामडी लोळवली असती बाळासाहेबांनी. सोडलं नसतं त्यांना. बाळासाहेबांचे विचार तुम्ही सांगतायं? तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करत आहात. जेव्हा शिवसेना-भाजपची युती झाली होती. भाजपने एक असा बॅनर दाखवावा. ज्या बॅनरवर नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. 2014 साली देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा नावाची घोषणा होईपर्यंत शिवसेनेचे तर सोडाच भाजपच्या बॅनरवर सुद्धा मोदींचा फोटो नव्हता. 2014 साली तुम्ही खुर्ची बसलात. तो पर्यंत तुमच्या बॅनरवर केवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो होता”, असे भास्कर जाधव म्हणाले.
आज चंद्रपूर येथील कार्यकर्ता मेळावात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, माझी कार्य पद्धती तुम्हाला कितपत पसंद पडेल हे आता सांगता येणार नाही. पण मी शब्द देतो. जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास शिवसैनिकांना दिला. यावेळी पदाधिकाऱ्यांसह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

























































