
एका भरधाव सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच अंत झाल्याची घटना आज दुपारी दहिसर टोलनाक्याजवळ घडली आहे. सौरभ विश्वकर्मा असे मृत मुलाचे नाव असून तो शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत दुचाकीवरून घरी जात होता.
दहिसर टोलनाक्याजवळ दुचाकीला पाठीमागून आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले. यावेळी सौरभ ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात सौरभचे वडील जखमी झाले आहेत. सौरभचा अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचा तपास काशिमीरा पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे दहिसर टोलनाका परिसरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




























































