बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ होणार; लोकसभेसाठी जदयूच्या जागा घेण्याचा प्रयत्न

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे नाते जुने आहे. या दोघांनीही विद्यार्थीदशेतच राजकारणात पहिले पाऊल ठेवले होते. नितीशकुमार यांनी मात्र राष्ट्रीय जनता दलाशी (आरजेडी) काडीमोड घेत भाजपबरोबर घरोबा केला. आरजेडी आणि जदयूमध्ये नितीशकुमार यांच्याकडे मोठ्या भावाची जबाबदारी होती. मात्र, आता भाजपशी घरोबा केल्याने भाजपची वाटचाल मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याने नितीशकुमार यांना लहान भावाची भूमिका घ्यावी लागणार आहे.

बिहारमध्ये भाजप आता मोठ्या भावाच्या रूपात पुढे येत आहे. राज्यात मागास आणि अति मागास वर्गातील मते पक्षाकडे खेचून घेण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. भाजपने बिहारमध्ये राज्यसभेपासून विधानपरिषदेवर या दोन जातींना प्राधान्याने प्रतिनिधित्व देऊन पुढील दिशा काय असेल, हे स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. त्यातील जास्तीत जागा भाजप लढण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या गेल्या वेळच्या निवडणुकीत भाजप आणि ‘जेडीयू’कडे प्रत्येकी 17 जागा होत्या. लोक जनशक्ती पक्षाला (एलजेपी) सहा जागा मिळाल्या होत्या. तर एक जागा काँग्रेसला मिळाली होती.

यंदाच्या निवडणुकीच्या ‘जदयू’कडील जागा कमी करून भाजप स्वतःकडे 17 किंवा जास्त जागा ठेवून पक्षाचे उमेदवार उभे करण्याची तयारी करीत आहे. जदयूचे सध्या 16 खासदार आहेत. यावेळी त्यांना केवळ 14 जागा दिल्या जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजपची वाटचाल मोठ्या भावाच्या भूमिकेकडे होत असताना दिसत आहे.