बिस्कीटाचं वजन कमी भरलं, पतंजलीला सव्वा लाखाचा दंड

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीविरोधात वजन नियामक विभागाने कारवाई केली असून या प्रकरणात कंपनीला सुमारे सव्वा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना इंदूर येथील डी-मार्टमध्ये हे प्रकरण उघडकीला आलं.

नोव्हेंबर 2023 मध्ये महेंद्र जाट नावाच्या ग्राहकाने कनाडिया येथील डी मार्ट या स्टोअरमधून 800 ग्रॅमचा पतंजलीचा बिस्कीटाचा पुडा खरेदी केल होता. त्यासाठी 125 रुपयेही मोजले होते. मात्र, शंका आल्याने जाट यांनी संबंधित पुड्याचं वजन करून तशी तक्रार ग्राहक न्यायालयाला केली. ग्राहक समिती न्यायालयाने हे प्रकरण वजन नियामक विभागाकडे वर्ग केलं.

तपासणीअंती 800 ग्रॅम असं छापील वजन असणाऱ्या पुड्याचं वजन प्रत्यक्षात 746.70 ग्रॅम इतकंच भरलं. पुड्याचं वजन तब्बल 53 ग्रॅमने कमी भरलं होतं, त्याची किंमत 7 रुपये इतकी होती. त्यानंतर विभागाने पतंजली आणि डी-मार्टला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्यांनी वजन कमी असल्याचं मान्य केलं. त्यामुळे विभागाने पतंजली कंपनीवर एक लाख 20 हजार रुपयांचा तर डीमार्टवर 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला.